मुंबई(प्रतिनिधी): भारतातून ‘जम्पिंग स्पायडर’च्या दोन नव्या प्रजातींची नोंद झालेली असताना, त्यात आता आणखीन एका कोळ्याची भर पडली आहे. चीनमध्ये आढळणाऱ्या ‘डेक्सिपस पेंगी’ (वांग आणि ली २०२०) या कोळ्याची प्रथमच भारतामधून नोंद करण्यात आली आहे. भारताच्या ईशान्य प्रदेशातील मेघालयातील संशोधन मोहिमेदरम्यान संशोधकांना हा कोळी आढळून आला.
‘डेक्सिपस पेंगी’ ही उडी मारणार्या कोळ्यांच्या एका मोठ्या कुळातील आहे. या कुळाचे नाव ‘साल्टिसीडे’ असे आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोळ्यांच्या या कुटुंबात ६०० पेक्षा जास्त भिन्न प्रजाती आणि ६००० हून अधिक वर्णित जाती आहेत. पूर्वी ‘डेक्सिपस पेंगी’ ही प्रजात केवळ चीनमधील दोन ठिकाणी आढळून येत होती. ‘डेक्सिपस’ वंशातील संपूर्ण आशियामध्ये आढळणाऱ्या चार प्रजातींपैकी भारतात आढळणारी ही तिसरी प्रजात आहे. या बाबतची माहिती देणारा शोधनिबंध दि. ३० एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय ‘पीअर रिव्ह्यू’ केलेल्या ‘आर्कनॉलॉजी जर्नल’ ‘पेकहॅमिया’मध्ये प्रकाशित झाला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळचे संशोधक गौतम कदम आणि केरळातील क्रिस्त कॉलेजच्या ऋषिकेश त्रिपाठी यांनी हा शोधनिबंध प्रकाशित केला आहे.
फेब्रुवारीमध्ये संशोधकांनी वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यातील काही लेण्यांजवळ सर्वेक्षण करत होते. बरेच अंतर सर केल्यावर दुपारहून ते एका ठिकाणी थांबले असताना अचानक एक कोळी झाडावरून झुडुपाकडे उडी मारताना त्यांना दिसला. ‘फिल्ड’-वर असताना या प्रजातीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याचा नमुना प्रयोगशाळेत नेऊन तपासणी करण्यात आली. मेघालयातील पश्चिम जैंतिया आणि दक्षिण गारो हिल्समधून याच कोळ्याचे आणखी दोन नमुने आढळून आले. शोध पूर्ण झाल्यावर संशोधकांनी डेव्हिड हिल नावाच्या एका अमेरिकन संशोधकाशी संपर्क साधला आणि त्यांच्या पेकहॅमिया नावाच्या जर्नलमध्ये हा शोध प्रकाशित केला.
या शोध मोहिमेचे ठिकाण ‘इंडो-मलयान’, ‘इंडो-चायनीज’ आणि भारतीय जैव-भौगोलिक प्रदेशांच्या संयोगस्थानी स्थित आहे. तसेच ‘टॅक्सा’च्या विस्तृत अस्तित्व आणि जैव-भौगोलिक सातत्य दर्शवते. यामुळे हा भाग जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट असल्याचे त्रिपाठी सांगतात. “भारताचा ईशान्य प्रदेश हा समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. ‘सेवेन सिस्टरस’ राज्यांमध्ये अशा संशोधन उपक्रमांमुळे अधिकाधिक नवीन प्रजाती प्रकाशात येत आहेत. ईशान्य भारताचे पालनपोषण आणि संरक्षण करणे आवश्यक आहे, याचे हे आणखी एक प्रमुख कारण आहे.” अशा आशयाचे निवेदन गेल्या आठवड्यात शोधनिबंध लेखकांनी दिले. त्यामुळे या प्रदेशातील कोळ्यांची यादी अद्याप अपुरी आहे, असे त्रिपाठी म्हणाले.