उसात सापडलेली बिबट्याची चार पिल्ले विसावली आईच्या कुशीत !

06 Apr 2022 16:52:24
leop
 

मुंबई (प्रतिनिधी) :
जुन्नरमधील शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून देण्यात आली आहे. पुणे वनविभाग आणि 'वाइल्डलाइफ एस.ओ.एस' यांनी हे काम पार पडले असून जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी येथे ही पिल्ले आढळून आली होती.  



जुन्नरमध्ये सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. दरवर्षी या हंगामात ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले सापडतात. अशावेळी यासंदर्भातील माहिती वन विभागाला देऊन या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवली जाते. अशाच पद्धतीने कबाडवाडी येथील उसाच्या शेतात बिबट्याची चार पिल्ले बेवारस अवस्थेत सापडली होती. शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर
 'माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रा'चे पथक त्याठिकाणी हजर झाले. सापडलेल्या पिल्लांमध्ये दोन मादी आणि दोन नरांचा समावेश होता. या पिल्लांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांची आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ज्या ठिकाणी ही पिल्ले सापडली त्याच ठिकाणी पिल्लांना एका खोक्यात ठेवण्यात आले. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले. सरतेशेवटी मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या या पिल्लांना सुरक्षित अधिवासात घेऊन गेली.  



मादी बिबट्यासोबत पुनर्भेट केलेली ही पिल्ले दोन महिन्याची होती, अशी माहित 'वाइल्डलाइफ एस.ओ.एस'चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बांगर यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांमध्ये जुन्नरमध्ये उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले सापडण्याच्या सहा घटना वनविभागाकडे नोंदवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 
गावकरी हे वन्यजीवांबद्दल अधिक संवेदनशील होत आहेत, हे पाहून आम्हाला आनंद होत असल्याचे जुन्नर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे म्हणाले. 'वाइल्डलाइफ एसओएस'चे सह-संस्थापक आणि सीईओ कार्तिक सत्यनारायण यांनी या घटनेविषयी बोलताना म्हटले की "अशा स्वरुपाच्या मोहिमांमध्ये वेळ महत्त्वाचा असतो. कारण, पिल्ले आणि आई हे जितका जास्त वेळ वेगळे राहतात, तितके त्यांना पुन्हा एकत्र करणे कठीण होत जाते."



Powered By Sangraha 9.0