राजस्थान : करौली दंगलीला तुष्टीकरणाचे धोरण जबाबदार!

05 Apr 2022 09:53:42

rajsthan
नववर्षानिमित्त करौली येथील हिंदू युवकांनी एका बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीसाठी शासनाची रीतसर परवानगी काढण्यात आली होती. त्यानुसार, ही बाईक रॅली निघाली. करौलीच्या हातवाडा बजार या मुस्लीमबहुल भागातील मशिदीजवळ ही शोभायात्रा आली असता त्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर दंगलखोरांनी हिंदूंची दुकाने आणि वाहने पेटवून दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना या देशाच्या काही भागातील अल्पसंख्य मुस्लीम समाज अजूनही फाळणीपूर्व मानसिकतेत वावरत असल्याचे दिसून येते. ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्यानंतरही काही भागांत हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत आले आहेत. अशा घटनांना बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात आले असले तरी ज्या राज्यात अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन केले जाते, तेथे अशा घटना घडताना दिसून येत आहेत. हिंदू समाजाने नवसंवत्सरानिमित्त राजस्थानमध्ये करौली येथे जी शोभायात्रा काढली होती, त्या शोभायात्रेवर काहीही कारण नसताना मुस्लीम समाजाकडून दगडफेक करण्याची घटना घडली. त्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक दुकानांची, घरांची जाळपोळ करण्यात आली.
नववर्षानिमित्त करौली येथील हिंदू युवकांनी एका बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीसाठी शासनाची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. त्यानुसार, ही बाईक रॅली निघाली. करौलीच्या हातवाडा बजार या मुस्लीमबहुल भागातील मशिदीजवळ ही शोभायात्रा आली असता त्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर दंगलखोरांनी हिंदूंची दुकाने आणि वाहने पेटवून दिली. या हिंसाचारात काही जण गंभीर जखमी झाले. हिंदू समाजाने नववर्षानिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे, असे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटले आहे. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण करण्याचे धोरण अवलंबित आहे. तसेच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असा आरोपही त्यांनी केला. भारतीय नववर्ष साजरे करणार्‍यांवर भारतातच हल्ले होत असतील, तर ती चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. राजस्थानमधील शांततापूर्ण भागात गुन्हेगारी वाढत असल्याकडे आणि महिलांवरील अत्याचार वाढत असल्याकडे केंद्रीय मंत्री शेखावत यांनी लक्ष वेधले.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या हिंसाचाराचा कडक शब्दात निषेध केला आहे. ‘विरोधी मानसिकता’ असलेल्या लोकांनी शोभायात्रेवर हल्ला केला, असे त्यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी, करौलीमध्ये शोभायात्रेवर झालेल्या घटनेचा निषेध करताना, अशा प्रकारची द्वेष पसरविणारा प्रवृत्ती राजस्थानात वाढू दिली जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात बजाविले. या घटनेस जबाबदार असणार्‍यांवर प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे, तर राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी, राजस्थान सरकारची अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याची जी धोरणे आहेत, त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असे म्हटले आहे. हिंदू नववर्षानिमित्त योजण्यात आलेल्या या मिरवणुकीवर नियोजनपूर्वक हल्ला करण्यात आल्याचा आरोप पुनिया यांनी केला.
दंगलीची घटना घडल्यानंतर प्रशासनाने करौलीमध्ये ‘१४४ कलम’ जारी केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, दंगलखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आणि जनतेलाही शांतता राखण्याचे आणि संयम पाळण्याचे आवाहन केले. हिंदू समाजाकडून ज्या मिरवणुकांचे आयोजन केले जाते, त्यावर ठरवून हल्ले होण्याचे प्रकार अजूनही भारतात घडत आहेत. देशातील काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते अल्पसंख्य समाजाचे तुष्टीकरण करण्याचे धोरण अवलंबित असल्यानेच अशा घटना घडत आहेत हे उघड आहे. केरळमधील संस्थेची पंजाबमध्ये मशिदी उभारण्यासाठी मदत पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेल्या तीन मशिदींसाठी केरळमधील एका स्वयंसेवी संस्थेने पैसा पुरविल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे. केरळमधील ‘रिलीफ अ‍ॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन’ने या मशिदीसाठी निधी दिल्याचे उघड झाले आहे. पण, या संस्थेने सदर मशिदीची उभारणी करण्यासाठी थेट पैसे न देता ते जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील दोघा व्यक्तींच्यामार्फत दिले, असे तपासात उघड झाले आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या फरीदकोट जिल्ह्यात या तीन मशिदी २०१५-२०१७ या कालावधीत उभारण्यात आल्या आहेत. केरळच्या ज्या संस्थेने ही मदत देऊ केली त्या संस्थेची पंजाबमध्ये एकही शाखा नसल्याचे दिसून आले आहे. या तीन मशिदी उभारण्यासाठी ७० कोटी रुपये खर्च आल्याचे सांगण्यात आले. केरळमधील त्या स्वयंसेवी संस्थेस मशीद उभारण्यासाठी विदेशातून पैसे प्राप्त झाले. त्या संस्थेने काश्मीरमधील आपल्या हस्तकांकरवी हे पैसे पंजाबमध्ये पोहोचविले, अशी माहिती गृह खात्यास प्राप्त झाली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या फिरोजपूर, तरण तारण, अमृतसर, गुरुदासपूर, पठाणकोट या भागात २०० हून अधिक मशिदी उभ्या असल्याची सुरक्षा दलांची माहिती आहे. त्यातील काही मशिदी अलीकडील काळात उभारण्यात आल्या आहेत. केरळमधील स्वयंसेवी संस्था दूरवर असलेल्या पंजाबमध्ये मशिदी उभारण्यासाठी कसे ‘उद्योग’ करीत आहे, त्याची यावरून कल्पना यावी. स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली देश पोखरण्याचे काम आणखी अनेक संस्था, संघटना करीत असतील. केंद्र सरकारने या जानेवारी महिन्यात संशयास्पद व्यवहार असलेल्या सहा हजार स्वयंसेवी संस्थांचा परवाना रद्द केल्याचे सर्वविदित आहेच. तरीही अजून अनेक संस्थांचा शोध घेणे बाकी आहे, असे या उदाहरणावरून दिसून येत आहे.
सर्वांच्या नजरा आता काशीवर!
काशिविश्वनाथ धाम परिसराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच उद्घाटन झाल्यानंतर काशिविश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी आणि नव्याने निर्मित असा भव्य परिसर पाहण्यासाठी भाविक या नगरीमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. केवळ देशातीलच नव्हे, तर विश्वातील भाविकांचे डोळे आता या नगरीकडे लागले आहेत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार काशिविश्वनाथ धाम परिसर विकसित करण्यात आला आहे. तसेच, त्यानुसार या परिसरातील बांधकामे उभारण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासन आणि या कामाशी संबंधित सर्व संस्थांनी उर्वरित विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्र्यानी संबंधितांना दिले. ‘नमामि गंगा’ प्रकल्पाचे कामही युद्धपातळीवर पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काशिविश्वनाथ धाम परिसर विकसित केल्याने या प्राचीन नगरीचे रूप पालटून गेले आहे. काशिविश्वनाथ धाम परिसर अनेक सोईसुविधांनी परिपूर्ण केल्याने भाविकांना गंगास्नान आणि त्यानंतर बाबा विश्वनाथाचे दर्शन घेणे सहजसुलभ शक्य झाले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0