बीज अंकुरे अंकुरे - भाग-४

05 Apr 2022 12:24:32
PCOS 
 
 
गर्भधारणा होण्यासाठी स्त्री शारीरिक व मानसिकरित्या सक्षम असणे गरजेचे आहे. मासिक रज:प्रवृत्ती सुरू होऊन ती संपेपर्यंतची वयोमर्यादा ही गर्भधारणेसाठीचा काळ असतो. पण, बर्‍याच कारणांमुळे मासिक स्राव नियमित होत नाही. मागील दोन लेखांमधून यातील प्राथमिक कारणे आपण जाणून घेतली. आजच्या लेखातून अनियमित रज:स्राव व अन्य तक्रारी व कारणे जाणून घेऊया.
 
 
प्राथमिक कारण म्हणजे रज:प्रवृत्ति व्यवस्थित नसण्याला अन्य दुसरे काहीही कारण नसणे. रज:प्रवृत्ती नियमित करण्यासाठी विविध औषधोपचार केल्यास (शोधनचिकित्सा, शमन चिकित्सा व सपुनर्भव चिकित्सा) ती नियमित होते व गर्भधारणा होते.
पण, अन्य कारणांमध्ये तसे नसते. रज:प्रवृत्ती नियमित न होणे, हे एक लक्षण असते व तसे होण्यास कारणीभूत हेतू अन्य असतो. अशावेळेस केवळ लाक्षणिक चिकित्सा करून चालत नाही. तशी केल्यास त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो व काही महिन्यांनी पुन्हा त्रास उद्भवतो, लक्षणे उत्पन्न होतात.

PCOSs 
 
गर्भधारणा न होण्यामधील महत्त्वाची अन्य कारणे म्हणजे 'pcos’, 'uterine fibroids’ व 'endometrial polyp' याबद्दल आयुर्वेदात काय सांगितलंय, ते आज बघूयात. ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (pcos) हा बीजकोषांमध्ये (ओव्हरीज) होणारी दुष्टी आहे, तर 'endometrial polyp' आणि ’, 'uterine fibroids ’ myonas’, leid myonas हे दोन्ही त्रास गर्भाशयामध्ये होणार्‍या विकृतीमुळे, बिघाडामुळे घडते.
 
 
'pcos' - अंत:स्रावी ग्रंथीच्या विकृतीमुळे घडणारे हे एक बहुसामान्य सिंड्रोम आहे. ज्या स्त्रियांमध्ये बीजाची निर्मिती व वाढ नीट होत नाही, त्यामधील ७०टक्के महिलांमध्ये ’pcos’ हे कारण आहे.pcos मुळे विविध लक्षणे उत्पन्न होतात. सर्वात महत्त्वाची म्हणजे, नियमित रज:प्रवृत्तीमध्ये बिघाड. काही वेळेस अवेळी रज:प्रवृत्ती, वारंवार अत्याधिक मात्रेत रज:प्रवृत्ती, तर कधी मासिक रज:प्रवृत्तीचा संपूर्णपणे अभाव. बर्‍याच किशोर वयातील मुलींमध्ये मासिक रज:प्रवृत्ती १०-१२वर्षे या वयात सुरू होते. ती काही वर्षे नियमित चक्र चालते व नंतर अचानक ते चक्र बिघडते. असा जेव्हा अचानक बदल घडतो, तेव्हा बरेचदा ’pcos हे कारण असे शकते. या अनियमित ऋतुचक्राबरोबरच शारीरिक व मानसिक तसेच अन्यही लक्षणे उत्पन्न होतात. male pattern baldness सुरू होणे, नको असलेले केस,जसे दाढी-मिशी-कानाजवळ केस, राठ, दाट व कडक वाढू लागणे. अचानक वजन वाढणे, स्थौल्यता येणे, चीडचीड किंवा उदासीनता (anxiety or depression) वाढणे, सतत आळस व अत्याधिक झोप येणे, त्वचा तेलकट होऊन तारुण्यपीटिकांचे प्रमाण खूप वाढणे, त्वचा काळवंडणे, मान-खाका व गुह्यांगाची त्वचा दाट राठ व काळी पडणे. डोक्यात खवडा (डॅन्ड्रफ) होणे, ओटीपोटात जड वाटणे, सतत बारीक बारीक दुखत राहणे. याचबरोबर ‘कोलेस्टेरॉल’चे प्रमाणात रक्त तपासणीतून वाढलेले दिसणे. उच्च रक्तदाबाची सुरुवात होणे, मधुमेहाची लक्षणे उत्पन्न होणे इ. सार्वदैहिक लक्षणेदेखील ’pcos’मध्ये उत्पन्न होताना दिसतात.
 
 
’pcos’चे प्रमाण भारतात खूप वाढताना आढळत आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात सगळ्यांची शिस्त व चांगल्या सवयी हद्दपार झाल्या आहेत. परिणामी, ‘अनियमित जीवनपद्धती’चे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसते. 'pcos’ हाही एक अनियमित जीवनपद्धतीमुळे वाढणारा रोग आहे. त्यामुळे केवळ औषधोपचार करून भागणार नाही तर पोषकाहार, नियमित व्यायाम व तणावरहित राहणीमान व योग्य निद्रा या चतु:सूत्रीची ही जोड औषधोपचारांबरोबर देणे गरजेचे आहे.
 
 
बरेचदा औषधोपचार म्हटले की, डोळ्यांसमोर फक्त ‘इंटर्नल मेडिसीन’ (गोळ्या, काढे, चूर्ण इ. ) येतात. तसे नसून याबरोबर काही अन्य चिकित्सेची जोडही द्यावी लागते.त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. ’pcos’च्या चिकित्सेमध्ये बस्ती ही शोधन चिकित्सेतील चिकित्सा आहे. त्याचे खूप महत्त्व आहे. लक्षणे कमी करणे, आजार बरा करणे व पुन्हा उद्भवू नये, या सगळ्यासाठी बस्ती चिकित्सेतील वेगवेगळे बस्ती उपयोगी ठरतात (as curative, recorrective and to avoid recurrence)यामध्ये योग बस्ती क्रम, मात्रा बस्ती, उत्तर बस्ती इ. विविध बस्ती चिकित्सांचा समावेश होतो. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनानेच ही चिकित्सा घ्यावी. तसेच वमन, विरेचन, नस्य अशा पंचकर्मांचाही उपयोग काही वेळेस करावा लागतो. नियमित व्यायाम, योगासने, श्वसनाचे व्यायाम, ज्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते, योग्य-सुपाच्य आहाराचे नियमित वेळेत सेवन इ. चा समावेश पथ्य चिकित्सेत होतो. पथ्य म्हणजे केवळ काय खावे आणि काय खाऊ नये इथपर्यंतच मर्यादित नाही, तर कधी खावे, किती खावे, ऋतू व प्रकृतिसापेक्ष काय टाळावे इ. देखील पथ्य कल्पनेत येते.
 
 
अभ्यंग, स्नेहन-स्वेदन इ. चिकित्सा, जर अत्याधिक स्थौल्य असेल, तर करावे लागते. 'pcos’च्या चिकित्सेला दोन ते सहा महिने इतका काळ किमान लागू शकतो. धरसोड वृत्तीने चिकित्सा करू नये. नियमित रज:प्रवृत्ती होऊ लागल्यास अन्य लक्षणेही कमी होऊ लागतात. आभ्यंतर चिकित्सा रोगाच्या अवस्थेनुरुप बदलावी लागते. एका रुग्णाला जे औषध उपयोगी पडले, तेच दुसर्‍या रुग्णालाही तितकेच लागू पडेल, असे आयुर्वेदशास्त्रात होत नाही. तेव्हा ‘सेल्फ मेडिकेशन’, ‘ओव्हर-द-काऊंटर ट्रिटमेंट’, ‘इन्कम्प्लिट-इंटरमिटंट ट्रिटमेंट’ करू नये. (क्रमश:)
 
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९
Powered By Sangraha 9.0