‘आधी प्रकल्प तर पूर्ण करा; नामांतराचा घाट कशासाठी?’

05 Apr 2022 12:50:06
 

chawl 
 
 
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईतील बीडीडी चाळींच्या नामकरणाची घोषणा गृहनिर्माणमंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आता स्थानिकांकडून जोरदार विरोध होताना दिसतो आहे. नायगाव बीडीडी चाळी, वरळी बीडीडी चाळी आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील नागरिकांशी आणि काही संघटनांशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला असता नागरिकांनी नामकरणाच्या निर्णयाला जाहीर विरोध दर्शविला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचा निर्णय विधानसभेत जाहीर केला. यावेळी वरळी बीडीडी चाळीचे नामकरण शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे नगर, नायगाव बीडीडीला शरद पवार नगर तर ना.म. जोशी चाळीला राजीव गांधी नगर, असे नाव देण्यात येणार असल्याचे घोषणा केली. मात्र, या नामकरांवरून एक नवा वाद निर्माण झाला आहे.
 
 
नायगावचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी नायगावमधील चाळींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “माझ्या याभागात बाबासाहेबांचे दहा हजार अनुयायी आहेत. इथल्या जनतेचीही हीच मागणी आहे की, बीडीडीच्या पुनर्विकासात झालेल्या इमारतींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव असावे. म्हणून अशी मागणी मी सभागृहात केली. हे भावनात्मक राजकारण आहे. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांमुळे मंत्री आहेत. त्यांनी त्याचं कर्तव्य केले. पण, स्थानिक आमदार म्हणून मी माझे कर्तव्य केले. राजकारणाची समीकरण आज आपण टीव्हीवर बघतो आहे. कधी काय होईल, सांगता येत नाही. त्यामुळे नाव पण नक्की राहील ते सांगता येत नाही.”
 
 
शरद पवार यांचे बीडीडीसाठी योगदान काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाला आमचा तीव्र विरोध आहे. पवार साहेबांनी नावाचा अट्टाहास करू नये. जेणेकरून त्यांच्यात आणि आमच्यात संघर्ष निर्माण होईल. आमची गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोट तिडकीने विचारण आहे की, पवार साहेबांचे या नायगाव भूमीसाठी योगदान काय?
- स्थानिक नागरिक, नायगाव
 
 
बीडीडी प्रकल्पासंदर्भात गौडबंगाल
प्रकल्पाचे नामकरण होण्यासाठी अगोदर प्रकल्प पूर्व व्हावा लागतो. प्रकल्पासंदर्भात गौडबंगाल आहे. आमच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या, ते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगावे. आम्हाला विश्वासात घेतो म्हणून सांगत आहेत आणि विश्वासात न घेता नामकरण वगैरे सुरू आहे, असे बरे नाही. जसा प्रकल्प आमच्यावर लादला, तसे नामकरण ही आमच्यावर लादले जात आहे. राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होते. संगणक रुपाने त्यांनी देशाला गती दिली. परंतु, या प्रकल्पाला गती देण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करते आहे का? याच उत्तर आधी त्यांनी द्यावे.
- स्थानिक नागरिक, ना. म. जोशी मार्ग बीडीडी
 
 
नामांतर करण्याची एवढी घाई का?
 
प्रकल्पाचे नामकरण करताना या सरकारने आपापल्या पक्षाच्या नेत्यांना तीन विभागांमध्ये वाटून घेतले. आम्हा सर्व रहिवाशांचा प्रश्न आहे की, हे नामांतर करण्याची एवढी घाई का? आमचा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही. जर तुम्हाला खरोखर बाळासाहेब ठाकरे हे नाव द्यायचे असेल, तर आम्हा सर्व वरळीकरांची मागणी एवढीच आहे की, ज्या पद्धतीने त्यांचा एकेरी उल्लेख करून हे नाव देण्याचा घाट घातला, त्याला आमचा विरोध आहे. बाळासाहेबांची ओळख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही आहे. इथल्या नागरिकांचे बाळासाहेबांवर त्यांच्या विचारांवर अतोनात प्रेम आहे. त्यामुळे या नगरचे नाव हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे नगर असेच पूर्ण द्यावे, ही आमची सरकारकडे मागणी आहे.
- स्थानिक नागरिक, वरळी बीडीडी
Powered By Sangraha 9.0