जागतिक व्यापार आणि रामातिबोधी राजा

30 Apr 2022 13:08:55

jagatik vyapar
 
 
 
राजा रामातिबोधीने १६७७ साली फ्रेंच इंजिनिअर डि लेमार याला बोलावलं आणि सयाम देशाचा नकाशा दाखवून म्हटलं की, सयामचा दक्षिणेकडचा भूभाग जिथे सर्वात चिंचोळा आहे, नेमक्या त्या ठिकाणी, त्या दांडावर एक कालवा खणायचा नि पॅसिफिक महासागराला हिंदी महासागर जोडायचा. कल्पना तर अद्भुत होती.
 
 
 
छत्रपती शिवराय हे महान रणधुरंधर सेनापती आणि अत्यंत कुशल राजकारणपटू मुत्सद्दी तर होतेच; पण ते उत्तम प्रशासकही होते. राजकारण आणि रणांगण यांमुळे राज्य वाढतं, बलशाली होतं; पण राज्य समृद्ध व्हायला हवं असेल, तर राज्याचं उत्पन्न, महसूल वाढला पाहिजे. त्यासाठी शेती, व्यापार, व्यवसाय सुरक्षित राहिले पाहिजेत. सुरक्षितता आणि शांतता यांची पक्की हमी राज्यकर्त्याकडून शेतकर्‍यांना, व्यापारांना, व्यावसायिकांना मिळाली की, ते उत्साहाने कामाला लागतात. यातून राज्याचं उत्पन्न-महसूल वाढतो. प्रजा समृद्ध, तर राज्य आपोआप समृद्ध. हे सूत्र जितकं शिवछत्रपतींनी ओळखलं होतं, तितकं त्यांचे समकालीन राज्यकर्ते असणार्‍या मुघल, आदिलशाही, कुतुबशाही इत्यादी राजसत्तांनी ओळखलेलं दिसत नाही. परंतु, सततच्या लढाया, स्वार्‍या, मोहिमा यातून राज्याची आबादी करण्यासाठी शिवरायांना वेळच मिळाला नाही. आग्र्याहून सुटून आल्यावर म्हणजे १६६६ ते १६७० एवढा चारच वर्षं त्यांना काहीशी शांतता मिळाली. त्या चार वर्षांत शेती आणि व्यापाराच्या वाढीसाठी त्यांनी जे उपक्रम राबवले, ते पाहिले तर थक्क व्हायला होतं. गंमत म्हणजे, इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत युरोपातले राजेलोकही असेच फक्त एकमेकांशी लढत राहून राज्यविस्तार करण्यातच मग्न असलेले दिसतात. जे राज्य आपल्या आधीच ताब्यात आहे किंवा जो भूभाग आपण नव्याने जिंकून आपल्या राज्यात सामील केलाय, तिथली प्रजा समृद्ध आणि सुखी व्हावी; त्यातून आपल्या राज्याचा महसूल वाढावा, यासाठी त्यांच्याकडे काही योजना, धोरणं होती असं दिसत नाही.
 
 
 
१५ व्या शतकानंतर मात्र यात बदल झालेला दिसतो, म्हणजे राजेलोकांच्या मनोवृत्तीत बदल झाला असं नव्हे; पण आपण प्रगती केली पाहिजे, आपण पुढे गेलं पाहिजे, असं लोकांनाच वाटू लागलं. यातूनच विज्ञान आणि संशोधन यांचं नवं युग निर्माण झालं. शेती आणि व्यापार यांना नवी चालना मिळाली. अर्थात, यात राजकारण आणि विशेषतः धर्मकारण मिसळलेलं होतंच. धाडसी दर्यावर्दी प्रवासी ख्रिस्तोफर कोलंबस हा सन १४९२ साली त्यावेळची आधुनिक जहाजं घेऊन भारताकडे जाणारा नवा जलमार्ग शोधायला निघाला. त्याला युरोपचा आशिया खंडाशी व्यापार वाढवायचा होता. पण, या सफारीसाठी त्याला आर्थिक मदत हवी होती. तेव्हा स्पेनची राणी इझाबेला ही पुढे आली. तिने आपला नवरा राजा फर्डिनंड याला पटवून कोलंबसला मदत देऊ केली. आता इझाबेलाला कोलंबसच्या सफारीत काय स्वारस्य असेल? तर कोलंबसाने भारतात जाऊन तिथे स्पेनच्या राजाला अनुकूल असं वागावं आणि ख्रिश्चन धर्माचा होईल तितका प्रचार-प्रसार करावा, असा तिचा अगदी उघड उद्देश होता. म्हणजेच व्यापाराबरोबरच राजकीय आणि धार्मिक स्वार्थही होते. पुढच्या काळात स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज आणि जेवढे म्हणून व्यापारी भारतात आले; पुढे ब्रह्मदेश, सयाम, इंडोनेशिया, चीन, जपानपर्यंतपसरत गेले. त्या सर्वांचे हेच धोरण होतं. व्यापाराच्या मिषाने शिरकाव करायचा नि शेवटही राजकीय सत्ता मिळवून धर्मप्रसार करायचा. पुढे १९ व्या शतकात औद्यागिक क्रांती झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रसारासमोर धर्मप्रसार हा विषय जरासा मागे गेला. राजकारण आणि व्यापार हे विषय मात्र भलतेच फोफावले. व्यापारवृद्धीतून राजकारण किंवा व्यापारासाठी राजकारण असा खेळ सुरू झाला. आशिया खंडाशी व्यापार करायला अटलांटिक महासागरातून दक्षिणेला जात आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला म्हणजे ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून हिंदी महासागरात प्रवेश करणं हा लांबचा मार्ग होता. मग एखादा जवळचा मार्ग शोधता येईल का, असा विचार युरोपच्या व्यापारी राजसत्ता करू लागला आणि त्यांना मार्ग मिळाला. हिंदी महासागराचा एक भाग असलेला तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र हे एकमेकांना जोडायचे. पण कसे, तर इजिप्त देशाच्या सुवेझ नावाच्या गावाजवळ या दोन समुद्रांच्यामध्ये एक अगदी अरूंद चिंचोळा असा जमिनीचा पट्टा आहे. ज्याला इंग्रजीत ‘इस्थमस’, प्रौढ मराठीत ‘संयोगभूमी’ आणि व्यवहारिक भाषेत ‘दांडा’ किंवा ‘दांड’ म्हणतात. असा सुमारे १९३ किमी लांबीचा जमिनीचा पट्टा खणून काढायचा आणि त्याचा कालवा बनवायचा.
 
 
 
हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेपर्यंत एकोणिसावं शतक अर्ध उलटून गेलं. पण, फर्डिनंड डि लेसेप्स या फ्रेंच अभियंत्याने १८५८ साली या कामाला सुरुवात केली आणि जिद्दीने कामाचा उरका पाडत १८६९ साली सुवेझ कालवा वाहतुकीला खुला केला. युरोप खंड जलमार्गाने आशिया खंडाच्या एकदम जवळ आला. लंडन ते मुंबई यांच्यातलं अंतर तब्बल ८९०० किमीने कमी झालं. मग असाच विचार अमेरिका खंडाबाबतही सुरू झाला. अमेरिका खंडाच्या पूर्व बाजूला असलेला अटलांटिक महासागर आणि पश्चिम बाजूला असलेला पॅसिफिक महासागर हे असाच कृत्रिम कालवा खणून जोडता येईल का, असा विचार सुरू झाला. तशी जागा सापडली. कोलंबिया आणि पनामा या देशांच्यामध्ये सुमारे ८२ किमी लांबीची एक जमिनीची पट्टी खणून काढली, तर काम होईलं असं पाहून १८८१ साली फ्रान्सने कालवा खणायला सुरुवात तर केली. पण, असंख्य अडचणींमुळे काही काळाने काम बंद पडलं. मग १९०४ साली अमेरिकेने पुन्हा कामाला सुरुवात केली आणि १९१६ साली या पनामा कालव्यातून पूर्ण क्षमतेने जहाज वाहतूक सुरू झाली. सुवेझ आणि पनामा हे कृत्रिम कालवे आधुनिक जगातली ‘इंजिनिअरिंग वंडर्स’ किंवा ‘अभियांत्रिकी आश्चर्य’ मानली जातात. त्यांची संकल्पना व्यापारी कंपन्यांच्या सुपीक डोक्यातून निघाली आणि राजकीय सत्ताधार्‍यांनी त्यांना पाठिंबा दिला. अशाच प्रकारे पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर जोडण्याची कल्पना एका राजाच्या डोक्यातून या युरोपीय व्यापार्‍यांच्या २०० वर्षं आधीच निघाली होती. त्या राजाचं नाव होतं राजा रामातिबोधी तिसरा आणि तो शिवछत्रपतींना समकालीन होता.
 
 
 
सोबतचा नकाशा पाहा. भारताच्या पूर्वेकडे म्यानमार म्हणजे आधीचा ब्रह्मदेश आहे. ब्रह्मदेशाच्या पूर्वेला थायलंड, लाओस आणि व्हिएतनाम हे देश आहेत. थायलंड देशाला दक्षिणेकडे जणू एक सोंड फुटली आहे. ही सोंड मलेशिया देशाला जाऊन भिडली आहे. मलेशिया देशाचे दक्षिण टोक म्हणजेच सिंगापूर हा एक शहरीय देश आहे. मलेशिया-सिंगापूरच्या नैऋत्येला इंडोनेशिया देशाचं सुमात्रा हे भलंमोठं बेट आहे. दोघांच्यामध्ये मलाक्काची सामुद्रधुनी आहे. थायलंड-मलेशियाच्या पूर्वेला पॅसिफिक महासागराचा दक्षिण चिनी समुद्र हा भाग आहे, तर त्यांच्या पश्चिमेला हिंदी महासागराचा अंदमान समुद्र हा भाग आहे. म्हणजे मल्लकाची सामुद्रधुनी हा पॅसिफिक आणि हिंदी महासागर यांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. म्हणून तर या मार्गावरच्या सिंगापूर या बंदराला अतोनात महत्त्व आहे.
 
 
 
थायलंड किंवा सयाम देश म्हणजेच मूळ संस्कृत नाव ‘श्याम देश.’ याचा राजा रामातिबोधी तिसरा हा १६५६ साली गादीवर आला आणि १६८८ साली मरण पावला. त्याला सयामी भाषेत ‘सोमदेत फ्रा नाराई महारात’ असं म्हणतात. सोमदेत म्हणजे सोमदत्त आणि महारात म्हणजे महाराज. ‘फ्रा नाराई’ हा कसला अपभ्रंश असावा समजत नाही. तर या राजा रामातिबोधीने १६७७ साली फ्रेंच इंजिनिअर डि लेमार याला बोलावलं आणि सयाम देशाचा नकाशा दाखवून म्हटलं की, सयामचा दक्षिणेकडचा भूभाग जिथे सर्वात चिंचोळा आहे, नेमक्या त्या ठिकाणी, त्या दांडावर एक कालवा खणायचा नि पॅसिफिक महासागराला हिंदी महासागर जोडायचा. कल्पना तर अद्भुत होती. आपण ज्या आशियाई लोकांना काळे, रानटी, मागास म्हणतो, त्यांच्यातल्या एकाने आपल्याही डोक्यात न आलेली कालवा खणण्याची कल्पना मांडलेली पाहून तो कथित आधुनिक फ्रेंच इंजिनिअर थक्कच झाला. १६७७ साली फ्रेंच लोक विज्ञान-तंत्रज्ञानात सयामच्या नक्कीच पुढे होते. पण, १०२ किमी लांब, ४०० मीटर रुंद आणि २५ मीटर खोल कालवा खणण्याइतके आधुनिक नव्हते. त्यामुळे कल्पना बारगळली. मग ही कल्पना पुनःपुन्हा पुढे येत राहिली. १८८२ साली सुवेझ कालवा बांधणारा फर्डिनंड डि लेसेप्स थायलंडमध्ये आला. पण, त्याचं आणि तत्कालीन राजाचं पटलं नाही. पुढे इंग्रजांनी, सिंगापूरचं महत्त्व कमी होऊ नये, म्हणून थायलंडच्या राजाला असा कालवा बांधायला मनाई केली. १९९० नंतर चीनने हा विषय रेटायला सुरुवात केली. महासत्ता बनू पाहणार्‍या चीनला अरब देशांचं तेल हवं आहे. थायलंड कालवा झाला, तर समुद्री अंतर कमी होतं. प्रवासाचे दिवस कमी होतात. म्हणजे एकंदर खर्च कमी होतो. पण, कालवा खणायला मुहूर्त मिळेना. मग तिकडे एक प्रचंड मोठा व्यापारी महामार्ग बांधायला सुरुवात झाली. पण, तो प्रकल्पही रेंगाळला आहे.
 
 
 
आता २१ व्या शतकात चीनला अरबांच्या तेलासकट इतरही व्यापारासाठी हा ‘क्रा कालवा’ किंवा ‘थाई कालवा’ हवाच आहे. पण, आता त्याची नावीक महत्त्वाकांक्षा जागृत झाली आहे. ‘क्रा कालव्या’तून आरमारी जहाज आणून भारताची कोंडी करायची, भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागरात मध्यावरच वसलेल्या ‘दिएगो गार्सिया’ या अमेरिकेच्या भव्य नाविक अड्ड्याला शह निर्माण करायचा नि सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान या सगळ्याच देशांच्या व्यापारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवायचं, असे त्याचे बहुविध उद्देश आहेत. थायलंडचे सध्याचे पंतप्रधान प्रयुत जान-ओ-चा हे २०१४ साली सत्ताधारी झाले. त्यापूर्वी ते लष्करप्रमुख होते. २०१८ साली त्यांनी जाहीर केलं की, ‘क्रा कालवा’ प्रकल्प हा आमचा प्राधान्याचा विषय नाही. थोडक्यात, पाकिस्तानच्या ‘ग्वादार’ प्रकल्पाप्रमाणे चीनच्या हातातंल बाहुलं बनण्यास त्यांनी नकार दिला. चीनच्या मदतीप्रमाणेच, या कालव्याच्या बांधणीमुळे पर्यावरणाची होणारी हानी, असाही मुद्दा आहेच. मात्र, व्यापारी जगाच्या मागणीमुळे हा विषय पुन:पुन्हा चर्चेतही येत असतो. हा कालवा झाल्यास नुसते तेल व्यापाराचेच वर्षाला किमान ४९ लक्ष डॉलर वाचतील, असं म्हटलं जातं. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0