सामान्यातील असामान्य व्यक्तीची गोष्ट

03 Apr 2022 20:29:12

manasa
वंदना यांनी आतापर्यंत ‘डम्पिंग’, रस्त्यावरील खड्डे, सिग्नल अशा विविध मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. जाणून घेऊया सामान्यातील असामान्य वंदना सिंग-सोनावणे यांच्याविषयी...
समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. पण त्या विरोधात सर्वजण आवाज उठवितात, असे नाही. समाजातील चुकीच्या गोष्टीच्या विरोधात जे आवाज उठवितात, ते सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व ठरतात. अशाच एका सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या डोंबिवलीच्या वंदना सिंग-सोनावणे यांच्याविषयी जाणून घेऊया.
वंदना मूळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत. पण त्यांचा जन्म मुंबईतील मुलुंड येथे झाला. संपूर्ण बालपण मुंबईत गेल्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांचे शालेय शिक्षण ‘नूतन सरस्वती’ या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी ‘जयभारत इंग्लिश स्कूल’मधून आपले कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पदवीसाठी त्यांनी शीव येथील ‘गुरूनानक महाविद्यालया’ची निवड केली. अर्थशास्त्र विषयात पदवीदेखील प्राप्त केली. वंदना अभ्यासात हुशार होत्या. नेहमीच त्या प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण होत असत. जणू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचे त्यांना एक व्यसन होते. त्यासाठी त्या मेहनतही घेत असत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच त्यांनी लगेचच २००३ मध्ये लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह असल्याने घरातून पाठिंबा नव्हता. शिक्षण पूर्ण होताच लग्न केल्याने ‘करिअर’ करण्याची फारशी संधी त्यांना मिळाली नव्हती. पदवीशिवाय कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांनी केलेला नव्हता. त्यामुळे नोकरी शोधणेदेखील त्यांच्यासाठी कठीण होते. लग्नानंतरचा त्यांचा प्रवास खडतर होता. पण लग्नानंतर त्यांना एक नोकरी मिळाली. सुरुवातीला तीन हजार रुपये वेतन त्यांना मिळत होते. त्याच नोकरीच्या ठिकाणी त्या संगणकावर काम करायला शिकल्या. दिवसेंदिवस त्यांनी प्रगतीच केली. त्यांनी ‘ब्रॅण्डिंग मॅनेजर’ या पदापर्यंतचा प्रवास केला. दरम्यान, त्यांनी स्वत:ची एक कंपनीही सुरू केली. सध्या वंदना आणि त्यांचे पती ही कंपनी सांभाळत आहेत. ही कंपनी वंदना यांच्या नावावरच आहे. ‘शेअर मार्केट’चा त्यांनी अभ्यास केला. २००८ मध्ये त्यांनी स्वत:ची कंपनी काढल्याने आर्थिक स्थैर्य त्यांना मिळाले. त्यांनी २०१० मध्ये स्वत:चे घर घेण्यासाठी प्रयत्न केले. डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन येथील ‘देशमुख होम्स’ येथे त्यांनी घर घेतले.
वंदना यांच्यात लहानपणापासूनच अन्यायाविरोधात पेटून उठण्याची ऊर्मी होती. त्या महाविद्यालयामध्ये असताना एका मुलीचा विनयभंग एका मुलाने केला होता. त्या मुलाला मात्र महाविद्यालयाकडून पाठीशी घातले जात होते. त्यावेळी वंदना त्या मुलीच्या पाठीशी उभ्या राहिल्या. महाविद्यालयातील उपप्राचार्या या दीर्घकाळापासून तेथेच सेवेत होत्या. पण वंदना यांच्या दबावामुळे त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. वंदना या अन्यायाविरोधात लढल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत होते. या घटनेनंतर वंदना यांना विद्यार्थी संघटना आणि काही पक्षांकडून ‘ऑफर्स’सुद्धा आल्या. पण राजकारणात जायचे नाही, हा वंदना यांचा ठाम निर्णय होता. राजकारणात जाण्यासाठी त्यांनी लढा दिला नव्हता. केवळ एखादी चुकीची गोष्ट घडत असेल, तर ती त्या निमूटपणे पाहू शकत नव्हत्या.
 
वंदना राहत असलेल्या ‘देशमुख होम्स’ या सोसायटीला पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. त्यासाठी अनेक राजकारणी सोसायटीला पुरेसे पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करीत होते. पण पुढार्‍यांमध्येच तारतम्य नसल्याचे वंदना यांच्या लक्षात आले. पाणी ही मूलभूत गरज भागावी, एवढीच माफक अपेक्षा त्यांची होती. या लढ्यात वंदनादेखील उतरल्या. २०१५ साली काही प्रमाणात पाण्याची समस्या सुटली. पण आजही ‘देशमुख होम्स’ला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यासाठी त्या वारंवार ‘एमआयडीसी’ अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या भेटीगाठी करीत असतात. वेळप्रसंगी त्यांनी आंदोलनदेखील केले आहे.
शहरात खूप समस्या असतात. फक्त त्याकडे शिक्षित नागरिकांनी पाहिले पाहिजे. शिक्षित नागरिक मात्र त्याविरोधात आवाज उठवित नाहीत. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी वंदना पुढाकार घेत होत्या. एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा सुरू असताना वंदना यांना रिक्षांच्या अनेक समस्या समजल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी एका बैठकीचे आयोजनदेखील केले होते. ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटो’ हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप त्यांनी तयार केला. सध्या ‘पाम’ या नावाने हा ग्रुप ओळखला जातो. त्यांना या प्रवासात नागरिकांप्रमाणेच माध्यमांचीदेखील साथ मिळाली. त्यामुळे त्यांचा प्रवास सोपा होत गेला. एक-एक समस्या वंदना सोडवित होत्या. त्यांनी बसेस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले. २३ बसेस रस्त्यावर धावू लागल्या. त्यांच्या या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी केला. त्यांच्या मते नागरिकांच्या समस्या सुटाव्यात, एवढेच त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी श्रेयवादाच्या लढाईत न पडता कायमचा त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला रामराम ठोकला. नागरिक आपल्या अनेक प्रश्नासाठी वंदना यांना साद घालत असत. त्यामुळे ‘सेवा नाही तर कर नाही’ असा एक विषय लोकांनी हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी वंदना यांची मदत मागतिली. वंदना यांनी आतापर्यंत ‘डम्पिंग’, रस्त्यावरील खड्डे, सिग्नल अशा विविध मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. कल्याणमध्ये त्यांनी ११ मागण्यांसाठी चार दिवस उपोषण केले होते.
 
सध्या कल्याण-डोंबिवलीत पाण्यावरून राजकारण केले जात आहे, असा त्यांनी थेट आरोप केला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणे आणि शहरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे, हे प्रश्न आगामी काळात उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षित लोकांना मतदान ओळखपत्र देण्याचे कामदेखील त्यांनी केले आहे. कारण, शिक्षित मतदारांकडे मतदानाचे ओळखपत्र नसल्याचे लक्षात आले आहे. मतदान हे शिक्षित नागरिकांकडूनही झाले पाहिजे, असे वंदना यांचे मत आहे. या सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0