भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना सुपारी!
29 Apr 2022 15:03:55
मुंबई : मुंबईतील हिंसक घडामोडी, शिवसेना-भाजपमधील विकोपाला गेलेला संघर्ष, राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई आणि मुंबईतील विविध मुद्द्यांवर आ. अमित साटम यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.“महाराष्ट्रात संविधानातील नियमांची पायमल्ली सर्रास केली जात आहे. महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती निर्माण झालेली आहे. ‘न भूतो न भविष्यति’ अशा स्वरूपात मुंबई आणि महानगराचीकायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे.
मुंबई पोलीस दलाचे राजकियीकरण झाल्याने आज शहरात ही स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे पूर्णतः ‘कॉम्प्रमाईज्ड’ म्हणजेच ‘मॅनेज’ झालेले असून भाजपच्या नेत्यांवर हल्ले करण्यासाठी आणि त्यांना अडकविण्यासाठी संजय पांडे यांनी सुपारी घेतली आहे,” असा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबई पोलीस आयुक्तांवर केला आहे. मुंबईतील हिंसक घडामोडी, शिवसेना-भाजपमधील विकोपाला गेलेला संघर्ष, राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई आणि मुंबईतील विविध मुद्द्यांवर आ. अमित साटम यांनी दै. मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
‘पोलखोल अभियान’ आता मुंबईकरांच्या हाती!
‘पोलखोल अभियाना’वर होणार्या हल्ल्यांविषयी आ. अमित साटम म्हणाले की, “मुंबई भाजपच्या ‘पोलखोल अभियाना’मुळे कुणाच्या तरी पायाखालची वाळू सरकली आहे, कुणाला तरी धडकी भरली आहे. मुंबई महापालिकेतील आपले काळे धंदे आता उघड होण्याची काहींना भीती वाटू लागली आहे. त्यातूनच भाजपच्या या अभियानावर हल्ले करण्याचे प्रयत्न वारंवार शिवसेनेकडून केले जात आहेत. भाजपच्या नेत्यांवर हल्ले होणे, झुंडीने भाजप नेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक करणे या घटनांमधून भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना सुपारी!
येत्या मुंबई महापालिकेचे निकाल काय लागणार आहेत, ते स्पष्ट झाले आहे. भाजपतर्फे चालविले जाणारे अभियान असो वा भाजपकडून मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राबवली जाणारी मोहीम असो, हे सर्व आता भाजपपुरतेमर्यादित राहिले नसून ही लढाई आता मुंबईकर जनतेने आपल्या हातात घेतली आहे. मुंबईकर आपल्या अधिकारासाठी, न्यायासाठी, आपल्या हक्कांसाठी आणि मागील २५ वर्षांत जी मुंबईकरांची लुबाडणूक झाली, त्या विरोधात आता मुंबईकर स्वतःच मैदानावर उतरला असून, हे ‘पोलखोल अभियान’ जनतेने आपल्या हातात घेतल्याचे मिळत असलेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे.
...हा तर पालिकेच्या पापांचा कबुलीजबाब!
“मागील २५ वर्षांपासून जे मुद्दे मुंबई महापालिकेच्या कारभारामुळे उत्पन्न झाले आहेत. त्याची पुराव्यांसह मांडणी भाजप करत आहे. मात्र, भाजपने मांडलेल्या एकाही मुद्द्याचे उत्तर शिवसेनेकडे नाही. महापालिकेच्या गैरकारभाराविषयी आम्ही उपस्थित केलेल्या विषयांवर महापालिकेने अधिकृतरीत्या दिलेल्या उत्तरांनी एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची ७० टक्क्यांनी घसरलेली पटसंख्या असो, गेल्या दहा वर्षांत ३८ हजार ८९९ झाडे तोडण्यासाठी मुंबई महापालिकेने दिलेली परवानगी असो, गेल्या २५ वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर खर्च करण्यात आलेले २१ हजार कोटी असो, हे सर्व मुद्दे मुंबई महापालिकेने अधिकृतरीत्या दिलेल्या माहितीमधून समोर आलेले आहेत. महापालिकेने दिलेली उत्तरे म्हणजे एकप्रकारे पालिकेने केलेल्या पापांचा कबुलीजबाब असून या मुद्द्यांवर आता शिवसेना निरुत्तर झाली आहे,” असे आ. अमित साटम यांनी म्हटले आहे.
मुंबईसह महाराष्ट्राचा बंगाल करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न!
“भाजपकडून करण्यात आलेल्या या आरोपांवर शिवसेनेने सप्रमाण स्पष्टीकरण द्यावे, मुद्द्याला मुद्द्याने आणि तथ्यात्मक बाबींचा आधार घेत मेरिटवर प्रत्युत्तर द्यावे, असे माझे शिवसेनेला खुले आव्हान आहे. पण शिवसेना असे काही करणार नाही. या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडे काहीही नसल्यानेच भाजपच्या नेत्यांवर असे भेकड हल्ले केले जात आहेत आणि त्यातून मुंबईसह महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे,” असा गंभीर आरोपही आ. अमित साटम यांनी यावेळी केला आहे.