मुंबई (प्रतिनिधी): कर्नाटकातील जोगा आणि तुमकुरू या गावांमध्ये हेमिडाक्टाइलस प्रजातीतील पालींच्या दोन नव्या जातींचा शोध लावण्यात आला आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या जातींचे नाव हेमिडॅक्टाइलस महोनी आणि हेमिडाक्टाइलस श्रीकांथनी आहे. या बाबतचा शोधनिबंध दि. २७ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुटॅक्सा’ मध्ये प्रकाशित झाला.
‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’(बीएनएचएस)च्या संशोधकांनी २०१९ साली कर्नाटकातील सरीसृपांचे सर्वेक्षण केले होते. जोगा गावातील सांदूर टेकड्यांवर आणि तुमकुरू गावातील देवरायना दुर्गा टेकडी या परिसरात हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान मिळालेल्या पालींमध्ये संशोधकांना दोन नवीन पाली असल्याचे आढळले. सापडलेल्या नमुन्यांची शारीरिक रचना ‘हेमिडाक्टाइलस मुर्रेई क्लेड’ या समूहातील असल्याचे लक्षात आले. परंतु, त्या एकमेकांपासून वेगळ्या असल्याचे निरीक्षणाअंती समजले. या प्रजातींची शारीरिक ठेवणं तिच्या इतर जवळच्या जातींपेक्षा वेगळी आहे. गुणसूत्र चाचणीनंतर या दोन जाती अनुवांशिकदृष्ट्या वेगळ्या असल्याचे समोर आले. या नवीन जाती खडकाळ भागात अधिवास करतात. छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. हा शोध बीएनएचएस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, उस्मानिया युनिव्हर्सिटी आणि चेन्नई स्नेक पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता.
सध्याचा शोध हा या प्रदेशातील पालीच्या संख्येत भर घालणारी आहे. सध्या, भारतात हेमिडाक्टाइलस वंशाच्या ४९ प्रजातींची नोंद होती, जी या प्रजातीतील जागतिक विविधतेपैकी सुमारे २७% आहे. या नवीन प्रजातींच्या शोधामुळे हेमिडाक्टाइलस प्रजातींची एकूण संख्या ५१ वर पोहोचली आहे. “उत्क्रांतीवादी आणि शारीरिक ठेवणीत भिन्न असणाऱ्या या प्रजातींचा शोध हा भारतातील सरीसृपांबाबत झालेल्या थोडक्या अभ्यासावर प्रकाश टाकतात. या अधिवासातील जमिनींच्या उपयोगांमध्ये होणारे बदल हे तेथील जैवविविधतेच्या मूल्यांकनाची तातडीची गरज अधोरेखित करत असल्याचे, संशोधक ओंकार दिलीप अधिकारी यांनी सांगितले. ''अलीकडील जागतिक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मूल्यांकनात असे दिसून आले आहे की, २१ टक्के सरपटणारे जीव धोक्यात आले आहेत. मानवनिर्मित धोक्यांमुळे सर्व जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे." भारतातील कोरडया भूभागातील जैवविविधतेचे महत्व या संशोधनामुळे अधोरेखित होत असल्याचे मत या संशोधनातील सह-लेखक आणि 'बीएनएचएस’चे उपसंचालक राहुल खोत यांनी मांडले.