मुंबई(प्रतिनिधी): ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(डी. सी.जी.आय.) ने 'भारत बायोटेक'च्या 'कोवॅक्सिन'ला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. ही लस ६ ते १२ वयोगटातील मुलांसाठी असेल. तसेच, १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी 'झायडस कॅडीलाची' 'झायकोविड डी' ही लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे.
(डी. सी.जी.आय.)च्या विषयतज्ञ समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला दोन ते बारा वर्षे वयोगटातील मुलांच्या कोवॅक्सिनच्या वापराबद्दल डेटा विचारण्यात आला होता. सध्या १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांना 'कॉर्बेवॅक्स' लस दिली जात आहे. तर १५-१७ वर्षे वयोगटातील मुलांना 'कोवॅक्सिन'चा डोस दिला जात आहे. आज मिळालेल्या मंजुरीनंतर देशात ६-१२ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील बालकांसाठी एकूण 3 कोरोना लसी मंजूर करण्यात आल्या आहेत.
कॉर्बेवॅक्स मंजुरीच्या प्रतीक्षेत
(डी. सी.जी.आय.)च्या विषय तज्ञ समितीने नुकतीच ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांवर कॉर्बेवॅक्स लसीचा तात्काळ वापर करण्याची शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी या विषयावर तज्ज्ञ समितीचीची बैठक झाली होती. कॉर्बेवॅक्स ही हैदराबादस्थित कंपनी 'बायोलॉजिकल ई' द्वारे स्वदेशी विकसित केलेली 'आर बी डी' 'प्रोटीन सब-युनिट' लस आहे.
देशात एकूण १२.६६ कोटी बालकांचे लसीकरण
देशातील लहान मुलांसाठी कोरोनाची लस ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. सुरुवातीला, कोवॅक्सिन फक्त १५-१७ वर्षे वयोगटातील मुलांना दिले जात होते. मात्र, नंतर 16 मार्च रोजी 12 वर्षांवरील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १२-१४ वयोगटातील मुलांसाठी १६ मार्च २०२२ रोजी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत त्यांना २.७ कोटी (पहिला डोस) आणि ३७ लाख (दुसरा डोस) देण्यात आला आहे. त्याच वेळी, ५.८२ कोटी पहिला डोस आणि ४.१५ कोटी दुसरा डोस १५-१८ वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात आला आहे