प्रशांत यांचा ‘किशोर’ मार्ग

23 Apr 2022 19:54:20

Prashant Kishore
 
 
 
प्रशांत किशोर मार्ग हा ‘प्रशांत मार्ग’ नाही, म्हटलं तर तो ‘किशोर मार्ग’ आहे. काँग्रेसपुढील आव्हाने कोणती, हे ‘जी-२३’ गटाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. काँग्रेसला पक्ष चालविण्याची शतकाहून अधिक परंपरा आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यापूर्वी एक राष्ट्रीय विचारधारा बळकट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा हा सर्व वारसा फार मोठा आहे. खरं म्हणजे काँग्रेसला कठोर आत्मचिंतनाची गरज आहे आणि देशभर जी आता हिंदू जागृतीची लाट निर्माण झालेली आहे, ती योग्य प्रकारे समजून घेण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर हे सध्या बातम्यांत आहेत. मराठी बातम्यांमध्ये त्यामानाने कमी आहेत आणि मराठी वर्तमानपत्रातही अगदीच नगण्य आहेत. कारण, मराठी माध्यमांत बातम्यांची जागा नको त्या विषयांनी व्यापलेली आहे. ‘सिलव्हर ओक’वरील हल्ला, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, अमोल मिटकरी, नवनीत राणा, इत्यादी मोठी माणसे आणि मोठ्या माणसांची घरे आपल्याकडील बातम्यांचा मुख्य विषय झालेल्या आहेत, अशा बातम्या वाचून आपले कोणते राजकीय प्रशिक्षण होते किंवा आपल्याला यातून काय मिळते, असले प्रश्न विचारायचे नाहीत. पण, प्रशांत किशोर हे जेव्हा बातमीचे विषय होतात तेव्हा राजकीयदृष्ट्या ती एक गंभीर आणि विचार करणारी बाब असते. प्रशांत किशोर हे २०१४ साली मोदींबरोबर होते. नंतर त्यांनी नितीशकुमार यांना निवडणूक रणनीती आखून दिली. ममता बॅनर्जी यांचेदेखील ते निवडणूक रणनितीकार झाले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या शब्दांत सांगायचे, तर त्यांचे नाव एक ‘ब्रॅण्ड नेम’ झालेले आहे. ते बातमीचा विषय होण्याचे कारण असे की, ते काँग्रेसला संजीवनी देण्याचा विषय त्यांनी हाती घेतला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि काँग्रेसचे मुख्य निवडणूक रणनितीकार होणार अशा बातम्या साधारणतः रोजच येत असतात.
 
 
 
काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी काँग्रेसच्या मुख्य नेत्यांपुढे त्यांनी ६०० ‘स्लाईडस’च्या माध्यमातून काँग्रेसचे पुनरुज्जीवन कसे होऊ शकते, हा विषय मांडला. या ६०० ‘स्लाईड्स’ बघत बसणे हा खूप थकविणारा विषय आहे. त्या ‘स्लाईडस’ काँग्रेसच्या नेत्यांनी पाहिल्या. यानंतर सात जणांची एक समिती बनविण्यात आली. या समितीत प्रियांका वाड्रा, के. सी. वेणुगोपाळ, रणदीप सुरजेवाला, पी. चिंदबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक यांचा समावेश करण्यात आला. या समितीत राहुल गांधी नाहीत. असे काही झाले की, तो बातमीचा विषय होतो. समितीत कोण आहेत, यापेक्षा कोण नाहीत यावरून बातम्या होतात. या सातजणांच्या समितीने आपला अहवाल काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला. अहवाल सादर करण्याचे काम के. सी. वेणुगोपाळ आणि प्रियांका वाड्रा यांनी केले. येथेही राहुल गांधी नाहीत. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला ज्या अनेक सूचना केल्या आहेत, त्यातील एक सूचना काँग्रेसचा अध्यक्ष ‘गांधी’ नसावा, ही आहे. वरील समितीतून राहुल गांधींना वगळले, याचा अर्थ काँग्रेेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आता घेतले जाणार नाही, असा विचार राजकीय विश्लेषक करीत राहतील.
 
 
 
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, २०२४च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३७० जागांवर आपली शक्ती केंद्रीत करावी. हा ३७० आकडा कुठून आला असावा? त्याचे उत्तर सोपे आहे, ज्या मतदारसंघातून २०१४ पूर्वी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, ज्या मतदारसंघातील काँग्रेसच्या मतदारांची टक्केवारी फारसी घसरलेली नाही आणि ज्या मतदारसंघात काँग्रेसचे संघटन आजही अस्तित्त्वात आहेत, असे हे मतदारसंघ असावेत. निवडणूक रणनितीकार आकडेशास्त्राचा भरपूर उपयोग करीत असतात. एक मतदारसंघ घेतला, तर पहिला आकडा येतो मतदार किती? त्यात स्त्रिया किती आणि पुरुष किती? दुसरा विषय मतदारांचे धार्मिक विभाजन कसे? मुुस्लीम मतदार किती? अन्यधर्मीय किती? मतदारांचे जातीय विभाजन कसे असते? मतदारसंघात संख्येने अधिक असलेली जात कोणती? मतदारसंघात जेथे एकगठ्ठा मतदान होते, असे बूथ कोणते? छोट्या-छोट्या जाती, धार्मिक गट यांचे नेते कोण आहेत आणि त्यांची किंमत काय आहे? अशा सर्व गोष्टी निवडणूक व्यूहरचनाकाराला लक्षात घ्याव्या लागतात. प्रशांत किशोर यांनी अजूनपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, पण बातम्या मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा आहेत. त्यांच्या विषयीच्या अशाही बातम्या आहेत की, निवडणुकीची रणनिती ठरविण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. ते अध्यक्षांना जबाबदार असतील, जी काही रणनिती ठरेल तिची अंमलबाजावणी करण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असले पाहिजेत. अंतिम निर्णय ते आणि अध्यक्ष करतील. या त्यांच्या सर्व अटी मान्य करून जर त्यांच्याकडे निवडणूक रणनितीचे अधिकार दिले गेले, तर पक्षात काय होईल, याचादेखील विचार केला पाहिजे. ज्यांची पक्षात हयात गेली नाही आणि जो केवळ व्यावसायिक आहे, असा व्यवसायिक आपल्या डोक्यावर आणून बसविला ही खंत सर्व नेत्यांना जिव्हारी लागेल. रणनितीकाराचे डोके आकड्यांत चालते आणि लोकमानसाचे सर्वेक्षण करून भाषणाचे मुद्दे ठरविण्यासाठी चालेल.
 
 
 
राजकीय डोके मात्र अफलातूनच असते. ते असे चालेल की, प्रशांत किशोर कुठल्या गटात कधी गटांगळ्या खातील, हे त्या गटात गेल्यावरच समजेल. कुठल्याही पक्षात बाहेरचा माणूस पक्षकार्यकर्ते आणि नेतृत्त्व स्वीकारीत नाहीत. बाहेरून आलेला एखादा राजकीय नेता स्वतःबरोबर मतदार घेऊन येतो. प्रशांत किशोर काय आणणार आहेत? ते व्यावसायिक आहेत. एखाद्या कारखान्याचा व्यवसायिक रणनितीकार आणि राजकीय क्षेत्रातील व्यवसायिक रणनितीकार यांच्यामध्येे टोकाचे अंतर आहे. कारखान्याला आपला माल विकायचा असतो आणि राजकीय रणनितीकाराला मतं खेचून आणायची असतात. मतं खेचून आणण्याचे शास्त्र अजून परिपूर्ण झालेले नाही. मतदार कसा विचार करतील आणि कसे मतदान करतील, हे मतदानाच्या दिवशीदेखील समजत नाही. अनेकवेळा ते निकालानंतर समजते. भारतीय मतदार कुठल्याही साच्यात बसणारा मतदार नाही. मतदान करण्याचे त्याची प्रेरक अत्यंत वेगळी असतात. अमेरिका, इंग्लंडमधील मतदार राजकीय विचारकांच्या आधारे मतदान करतो. भारतीय मतदार तसे करीत नाही. तो नेतृत्त्व कोणाचे आहे, नेतृत्त्वाचे आकर्षण त्याला किती आहे, यावर मतदान करतो. अनेकवेळेला भावनिक विषय सर्व गणितं चुकीची ठरवितात. इंदिरा गांधींची हत्या झाली आणि मतदारांनी ठरवून टाकले की, राजीव गांधी यांनाच मतदान करायचे. विचारधारा, राजकीय कार्यक्रम अन्य सर्व विषय डब्ब्यात बंद झाले.
 
 
 
प्रशांत किशोर यांच्यात असे नेतृत्त्व उभे करण्याची क्षमता आहे का, ते काँग्रेसला जनप्रिय आणि लोकांना आकर्षित करणारा चेहरा देऊ शकतात का? काँग्रेसचे भावनिक आवाहन ते करू शकतात का? ते स्वतः तर काँग्रेसचा चेहरा बनू शकत नाहीत, चेहरा बनण्यासाठी जे वलय लागतं ते त्यांच्याकडे नाही. राजकीय त्याग-तपस्या नाही, विचारांची बांधिलकी नाही, बांधिलकी व्यवसायिक आहे, म्हणून कधी तृणमूल काँग्रेस, कधी नितेश कुमार, कधी राजशेखर, अशा परस्परविरोधी लोकांशी ते कास धरतात. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे आणि काँग्रेसनेही काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. राजकीय रणनितीकाराचा सल्ला घेणं यात काही गैर नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला हे करावे लागते. पण, कोणताही राजकीय पक्ष आपला पक्ष त्याच्या ताब्यात देत नाही. राजकीय पक्ष ही लोकशाहीची फार मोठी गरज असते. समर्थ राजकीय पक्ष लोकमतांचे नियंत्रण करतात. राजकीय स्थैर्याचा ते आधार बनतात. राजकीय पक्ष कालसुसंगत विचार देतात. विचाराला व्यवहारात आणणारा कार्यक्रम देतात. राजकीय सत्तेत सहभागी होण्याची इच्छा असणार्‍या समूहाला मार्ग देतात. या सर्व कामामुळे लोकशाही राज्यपद्धतीत सत्तेसाठी हिंसाचार होत नाहीत. एकमेकांच्या कत्तली केल्या जात नाहीत. राजेशाहीत किंवा हुकूमशाहीत हिंसाचार हा ठरलेला असतो. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहिला पाहिजे, नवविचारांनी उभा राहिला पाहिजे, नवनेतृत्त्वाने उभा राहिला पाहिजे.
 
 
 
त्यासाठी प्रशांत किशोर मार्ग हा ‘प्रशांत मार्ग’ नाही, म्हटलं तर तो ‘किशोर मार्ग’ आहे. काँग्रेसपुढील आव्हाने कोणती, हे ‘जी-२३’ गटाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. काँग्रेसला पक्ष चालविण्याची शतकाहून अधिक परंपरा आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यापूर्वी एक राष्ट्रीय विचारधारा बळकट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा हा सर्व वारसा फार मोठा आहे. खरं म्हणजे काँग्रेसला कठोर आत्मचिंतनाची गरज आहे आणि देशभर जी आता हिंदू जागृतीची लाट निर्माण झालेली आहे, ती योग्य प्रकारे समजून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा हिंदू दुर्बळ होता, तेव्हा मार खात होता. आता तो आपल्या अस्मितेने उभा राहत आहे. एकच एक जुने सर्वधर्मसमभावाचे तुणतुणे ऐकण्याच्या तो मनस्थितीत नाही. विझते दिवे भकभक खूप करतात, तशी भकभक करणारी तोंडे देशात खूप आहेत. त्यांचा जमाना संपत चाललेला आहे. हे ज्याला समजेल तो काँग्रेसचे यशस्वी नेतृत्त्व करील. मोदी यशस्वी झाले. कारण, हिंदू समाजाच्या बदलत्या मानसिकतेची नाडी त्यांना बरोबर समजली आणि राजकीय भाषणांतून, घोषणांतून समाजाची अभिव्यक्ती त्यांनी व्यक्त केली. हे सर्व समजण्याची क्षमता जर प्रशांत किशोर यांच्याकडे असेल, तर त्यांना काँग्रेस पक्षाचीही गरज नाही, ते स्वतःचाच पक्ष उभा करून मोदींना पर्याय देऊ शकतात. एका गोष्टीचा खेद झाल्याशिवाय राहवत नाही. एका व्यवसायिक राजकीय रणनितीकाराला देशातील सर्वात जुना पक्ष अगतिक होऊन शरण जातो, हेदुःखद आहे. त्याऐवजी आपल्याच पक्षातील ‘जी-२३’ राजनेत्यांनी जे विषय पुढे आणले आहेत, त्यावर चर्चा करून रणनिती ठरविणे काँग्रेसला आवश्यक होते. प्रशांत किशोर यांना बरोबर घेऊनच काँग्रेसने बुडायचे ठरविले असेल, तर त्याला आपण काय करणार!
 
 
 
Powered By Sangraha 9.0