‘पीके’ इन, राहुल आऊट?

21 Apr 2022 10:02:49
 
 
congress
 
 
पाच राज्यांमधील नामुष्कीपूर्ण पराभवानंतर ‘जी-२३’ गटासह काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी या पक्षाला नेतृत्त्वाबदलाची गरजही बोलून दाखवली. नेहमीप्रमाणेच त्यावर पक्षात सखोल चिंतन झाल्याचा आव आणला गेला. एवढेच नाही, तर सोनिया गांधी यांच्या नावाने बोटे मोडणार्‍यांचा काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर सूरच पालटला. त्यातच आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा पक्षात सक्रिय झाल्याच्या वगैरे बातम्या आल्या. म्हणजे एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ‘सक्रिय व्हावे’ हीच मुळी बातमी ठरत असेल, तर यावरून या पक्षाची सद्यःस्थिती लक्षात यावी. पण, यंदा सोनिया गांधी नुसत्याच म्हणे सक्रिय झाल्या नाहीत, तर त्यांनी देशातील सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना २०२४च्या निवडणुकीसाठी म्हणे सुपारीही देऊ केली आहे.
 
 
 
त्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षाला रणनीतीकाराची मदत घ्यावी लागते, यावरूनच खरंतर या पक्षाच्या दुरवस्थेची कल्पना यावी, तर अशा या ‘पीके’ महाशयांबरोबर काँग्रेस नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकाही सुरु झाल्या आहेत. यामध्ये म्हणे देशभरातील निवडक ३७० लोकसभा मतदारसंघांवर आणि केरळ, राजस्थान, छत्तीसगढ, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी काही राज्यांत काँग्रेसने एकट्याने आणि आघाडी करून जोर लावण्याचा सल्ला काँग्रेस पक्षाला दिला. पण, या बैठकांमध्ये सोनिया गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या पहिल्या फळीतील के. सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी वगैरे नेत्यांचा समावेश असला तरी राहुल गांधी मात्र अनुपस्थित होते. का तर ते नेहमीप्रमाणे सुट्ट्यांसाठी परदेशात रवाना झाले. आता पाच राज्यांपैकी एकाही राज्यात निवडणुका न जिंकल्यामुळे असेल कदाचित, पण ‘स्ट्रेस’ला वाट मोकळी करून द्यायला नको का?
 
 
 
असो तर राहुल गांधींशिवाय आता ‘पीकें’सोबत काँग्रेसचे नव्याने विचारमंथन सुरू झालेले दिसते. म्हणजेच काय तर काँग्रेसनेही कुठे तरी राहुल गांधींच्या अनुपस्थितीमुळे न थांबता पक्षाला गतिमान ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा संदेशच या कृतीतून ध्वनीत होतो, असे खरेच असेल आणि राहुल गांधींशिवाय काँग्रेसचे पान हलणार असेल, तर उत्तमच! पण, राहुलच काय सोनिया, प्रियांका आणि खरंतर कुठल्याच गांधींशिवाय जेव्हा काँग्रेस खर्‍या अर्थाने घराणेशाहीतून मुक्त होईल, तेव्हा कदाचित काँग्रेसमध्ये ‘अच्छे दिन’ अवतरतील!
 
 
‘डीएनए’च हिंदुत्वाचा हवा!
 
श्री राम नवमी, हनुमान जयंती हे सण पूर्वीपासूनच उत्साहात हिंदू बांधवांतर्फे साजरे होत होतेच. पण, यंदा मात्र कधी नव्हे ते राज ठाकरेंच्या घोषणांमुळे, भाषणांमुळे हे सण राजकीय पक्षांनाही आपल्या अजेंड्यावर घेऊन ‘आम्हीही हिंदुत्ववादी’ हे दाखवून देण्याची वेळ आली. खासकरून स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणून मिरवणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही हिंदुत्वाच्या या अजेंड्याला बगल देता आली नाही. या दोन्ही धर्मनिरपेक्षतेचे गुणगान गात हिंदुत्वाला एरवी बदनाम करायला टपलेल्या काँग्रेसींनी शेवटी मंदिरे गाठून, टाळ वाजवून रामनामाचा गजर केला. यावरून देशभरात २०१४, २०१९ आणि २०२२च्या योगींच्या पुनर्विजयानंतर हिंदुत्वाची लाट कायम असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
 
 
 
त्यामुळे गेल्या काही काळात महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय पातळीवरही हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला. पण, जुन्या खोडीप्रमाणे हिंदू बांधवांवरील अत्याचाराविषयी मात्र या पक्षांनी सपशेल मौन बाळगले. म्हणजे श्रीराम नवमी, हनुमान जयंतीचे तोंडदेखले कार्यक्रम काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी आयोजित करायचे. पण, हिंदू बांधवांच्या याच कार्यक्रमांच्या यात्रांवर जेव्हा धर्मांध जमाव चालून येतो, बंदुकी हातात घेऊन दंगली उसळवतो, त्यावर हे पक्ष मात्र मूग गिळून बसतात. त्यामुळे काँग्रेस असेल अथवा राष्ट्रवादी काँग्रेस, यांचे हिंदुत्व हे बेगडी आणि केवळ एक राजकीय गरजेचा भाग म्हणावा लागेल.
 
 
 
कारण, या काँग्रेसींना हिंदूंची इतकीच काळजी असती, तर राजस्थानातील काँग्रेस सरकारने किरौली हिंसाचारानंतर ठोस पावले उचलली असती. गांधी कुटुंबीयांनी त्याचा विरोध वगैरे केला असता. पण, अपेक्षेप्रमाणे तसे कुठेच घडताना दिसत नाही. मात्र, दंगल भडकाविणार्‍यांच्या घरावर जेव्हा ‘बुलडोझर’ फिरवले जातात, तेव्हा हीच मंडळी अल्पसंख्याकांच्या मानवाधिकाराचे हनन म्हणत अश्रू गाळताना दिसतात. तात्पर्य हेच की, मंदिरात (शून्य भक्तिभावाने) आरत्या करून, आम्ही जनुवेधारी ब्राह्मण आहोत, हे निवडणुकांपूर्वी वारंवार उच्चरवाने सांगून कोणी हिंदुत्ववादी होत नाही. त्यासाठी मुळातच हिंदुत्वाचा ‘डीएनए’ असावा लागतो. तो भाजपच्या आणि राज ठाकरेंच्या रक्तात आहे. म्हणूनच आता इतरांनी कितीही आव आणला तरी अशा हिंदुत्वाचे सोंग पांघरलेल्या ढोग्यांना हिंदू भुलणारे नाहीत!
 
Powered By Sangraha 9.0