अग्निसुरक्षेवरुन न्यायालयाकडून राज्य सरकारची कानउघडणी

20 Apr 2022 09:25:07

fire
 
मुंबई उच्च न्यायालयाने दि. ११ एप्रिलला राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. अग्निसुरक्षेकरिता विशेष नियमावली ‘मुंबई विकास आराखडा-२०३४’मध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने कायदेशीर पावले उचलून दि. १८ जुलैला न्यायालयाला त्याची माहिती द्या, असा आदेश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एम. जी. सेवलीकर याच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला.
अग्निसुरक्षेबरोबर अन्य मानवनिर्मित संकटांवर उपाय म्हणून २००९ मध्ये अग्निसुरक्षेकरिता विशेष नियमावलीचा प्रारुप मसुदा तयार करण्यात आला होता. पण तो मसुदा करुनही त्यासंबंधी राज्य सरकारने पुढे काहीच हालचाल केली नाही, याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने दि. ११ एप्रिलला राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. ही नियमावली ‘मुंबई विकास आराखडा-२०३४'मध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने कायदेशीर पावले उचलून दि. १८ जुलैला न्यायालयाला त्याची माहिती द्या, असा आदेश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एम. जी. सेवलीकर याच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा असेच उद्गार २०१८ मध्ये काढले होते. देशातील सर्व राज्य सरकारांनी ‘नॅशनल बिल्डिंग कोड’ला अनुसरून अग्निशमनाकरिता वा अन्य संकटांकरिता सर्व सुरक्षेचे निकष पाळायले हवेत, असे बजावले होते. मुंबईत वारंवार आगीच्या घटना घडूनही राज्य सरकारने आजतागायत अंतिम विशेष नियमावली प्रसिद्ध केली नाही, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका मुंबईतील वकील आभा सिंग व अ‍ॅड. आदित्य प्रताप यांनी केली आहे. मुंबईत लोकांचे अग्निप्रलयात जीव जात असताना सरकारकडून या प्रश्नाकडे गंभीरपणे बघितले जात नाही, असे निदर्शनास आल्यावर न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यानुसार नगररचना विभागाच्या उपसंचालकांनी अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले व त्यात नियमावली नव्याने तयार करण्याबाबत पुन्हा तज्ज्ञ समिती नेमण्याचा विचार आहे, असे न्यायालयाला कळविले.
 
अग्निसुरक्षेची साधने व सुटकाकरण्याच्या नव्या पद्धती आणणार
 
मुंबई मनपा यावर्षीच्या अर्थसंकल्पात अत्यावश्यक बाब म्हणून अग्निशमन दलाच्या कामाकरिता ७४५ कोटी रुपये राखून ठेवणार आहे. यासंबंधीच्या प्रकल्पामध्ये अग्निशमनाबाबत/धुराबाबत, अग्निशमनाकरिता ड्रोन व रोबोचा वापर कसा करावयाचा व बायकर इत्यादींबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कांदिवलीच्या ठाकूर गावात नवीन व आगीचे संकट जीवंत वाटणारे असे अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांकरिता शिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. त्यात मोठ्या ज्वाळा, जास्त तापमान असणारे व काळ्या धुराचे लोट आणणारे, अशी जीवंत कामे प्रशिक्षणाकरिता बनविणार आहेत. प्रशिक्षण घेणार्‍यांचा प्रत्यक्ष विकास कसा होत आहे, तेही नोंदणार आहे. या आगीच्या देखाव्यात रसायनगृहात व शयनगृहातील आगी व इतर ठिकाणच्या बंद वा मोकळ्या खोलींच्या आगींचा अभ्यास केला जाईल.
 
 
मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब याबाबत म्हणाले की, या प्रशिक्षणाकरिता आग प्रत्यक्ष चित्रीकरणाबरोबर ती विझविण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक व उपयुक्त असे ड्रोन मुंबईतील भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने ताफ्यात घेतले जाणार आहेत. मुंबईत सध्या उंच इमारतींचे पेव फुटले आहे व त्यातील आगी विझविताना शिड्या तोकड्या पडतात, तेव्हा ड्रोनचा उपयोग जलद व सोईचा ठरेल. अर्थसंकल्प आराखड्यातील मान्य रकमेपैकी ६५ कोटींचा निधी उपकरण खरेदीसाठी व मिनी अग्निशमन केंद्रे बनविण्यासाठी वापरला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करी रोड येथील ‘अविघ्न’ इमारतीमधील अग्निशमनाकरिता ड्रोनचा यशस्वी वापर केला होता.अग्निशमन दलाकडे अग्निसंकटाशी लढण्याकरिता सध्या एक रोबो आहे, त्याची मोठ्या आगी विझवण्यासाठी फार मदत होते. म्हणूनच आणखीन काही विशेष आधुनिकता असलेले रोबो घेतले जाणार आहेत.
सुरक्षितता व संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने अग्निशमन दल यापुढे डिझेल वाहनाऐवजी विजेची वाहने वापरण्यास सुरुवात करणार आहे. जुनी वाहने बदलून अग्निशमन व आगीत सापडलेल्यांची झटपट सुटका करणारी योग्य अशी वाहने घेतली जाणार आहेत. याशिवाय संकटाच्या ठिकाणी अग्निट्रकच्या आधी व लवकर पोहोचण्यासाठी २४ ‘फायरबाईक्स’ घेतली जाणार आहेत. ३.७१ कोटी रक्कम ही ‘डिझास्टर मॅनेजमेंट’च्या कामाकरिता ठेवली जाणार आहे. सहा नवे ‘वॉटर टॉवर’, ‘हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म’ आदींचा खरेदीमध्ये समावेश असणार आहे.
 
 
१४ एप्रिल ते २० एप्रिल‘सुरक्षितता सप्ताह’ म्हणून पाळणार
१४ एप्रिल, १९४४ रोजी ‘व्हिक्टोरिया डॉक’मधील भीषण आगीत ७१ जवान हुतात्मा झाले होते. याकरिता ‘राष्ट्रीय अग्निसुरक्षा दिवस’ म्हणून पाळा व कामातील उत्पादकता वाढवा, हे ब्रीद म्हणून हा आठवडा साजरा करुया, असे मुंबई अग्निशमनदलाने ठरविले आहे. यात विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. गृहनिर्माण संस्था, गगनचुंबी इमारतींमध्ये प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. त्यात अग्निशमन दलाची कार्यपद्धती दाखवितानाच दलासमोरील आव्हाने, प्रत्यक्ष बचावकार्यात उपकरणांचा केला जाणारा वापर आदींचा समावेश असणार आहे. १४ एप्रिल रोजी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल व अतिरिक्त उपायुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत प्रार्थनासभेचे आयोजन केले जाणार आहे. हुतात्मा स्तंभाच्या ठिकाणी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. दि. १७ एप्रिलला जनजागृती अभियानात अग्निशमन दुचाकी व सायकल रॅलीचे आयोजन केले जाईल. ही रॅली अग्निशमन केंद्रस्थानी ठेवून मुंबई पालिका मुख्यालयातून १०१ किमींवर अंतराकरिता काढली जाणार आहे.
 
 
मुंबईतील सद्यस्थिती काय आहे?
मुंबईतील वस्ती वाढून शहर अवाढव्य झाले आहे व गगनचुंबी इमारतीही वाढल्या आहेत. पण, अग्निशमन व इतर संकटांची व्यवस्था व्हायला पाहिजे तेवढी ती सुधारलेली नाही. रोज दोनच्यावर छोट्यामोठ्या आगी लागतात, पण अजून पक्की नियमावली बनविण्यात आली नाही. त्यामुळे इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा लावली जात नाही व अनेक जण नाहक बळी पडतात, काहीजण बेघर होतात (ताडदेवच्या आगीत होरपळलेल्यांना अजून घरे मिळाली नाहीत) व अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. काही वर्षांपूर्वी कमला बिल्डींगला आग कोणत्या कारणाने लागली, हे अजून समजलेले नाही.
 
 
 
 
काही इमारतींना गेल्या काहीदिवसांत आगी लागल्या होत्या
 
 
अग्निशमन दल म्हणते की, अग्निशमन यंत्रणा पुरेशी ठेवायला हवी. ६३९ रुग्णालयांनी अग्निसुरक्षा कार्यान्वित केली आहे, पण २४ रुग्णालयांना नोटीस पाठवून १२० दिवस दिले होते, तरी त्यांनी अग्निशमन यंत्रणा बनविली नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गेल्या दहा महिन्यांत रुग्णालयांना सहा मोठ्या आगी लागून ५५ माणसे मृत्यू पावले होते. या आगी लागतात कशा? बिल्डरला पैसे वाचवायचे असतात की सोसायटीच्या माणसांना कळत नाही? काही बिल्डरचे, तर काही महापालिकेचे नक्की चुकते. कठोरपणे कार्य करणारी योग्य ती यंत्रणा उभारायला हवी. मुंबई अग्निशमन दलाच्या जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२१ काळातील नोंदणीतून दिसते की, मुंबईतील ३२४ गगनचुंबी इमारतीत अग्निशमन यंत्रणा पुरवलेली नव्हती. २५ वर्षांपूर्वी ‘उपहार’ चित्रपटगृहाला आग लागली तेव्हा ५९ माणसांचा गर्दीत गुदमरून मृत्यू झाला, हे माहीत असूनही अजून रुग्णालये अग्निशमन यंत्रणेशिवाय बांधली आहेत.
 
 
मुंबईतील गेल्या दोन महिन्यांतीलआगीच्या घटना
 
जुहूच्या ‘सी प्रिन्सेस’ हॉटेलला फेब्रुवारीत ‘लेव्हल 1’ची आग लागली होती, पण सुदैवाने कोणीही मृत्यू पावले नाही.भांडुपच्या ‘ड्रीम मॉल’ला यावर्षी मार्चमध्ये पुन्हा आग लागली. २५ मार्च, २०२१ ला ‘सनराईज’ कोरोना रुग्णालयाला आग लागली होती व ११ जणांना आगीत मृत्यू झाला होता व तेव्हापासून हा मॉल बंदच आहे.भायखळ्याच्या ‘विठ्ठल निवास’ या रहिवासी इमारतीतील एका बंद घराला मार्चमध्ये आग लागली. या आगीत अडकलेल्या पाच जणांची यशस्वीपणे सुटका करण्यात आली. बोरिवलीत ‘एसआरएस’च्या 24 माळ्यांच्या इमारतीला फेब्रुवारीमध्ये ‘लेव्हल 1’ची आग लागली.३५ रहिवाशांची सुटका करण्यात आली.
 
 
 
जंगलामधील आगी उष्णतेमुळे लागतात
 
 
 
शहरांतील आगी मानवाच्या दुर्वर्तनातून आगी लागतात व योग्य ती अग्निशमन साधने न बाळगल्याने नुकसान करतात. परंतु जंगलांच्या ठिकाणी निसर्गामुळे आगी लागतात.या मार्चमध्ये उष्णता वाढीमुळे जंगलात अनेक आगीच्या घटना घडल्या, अशी ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ने नोंदणी केलेली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये, हिमाचल प्रदेशात, राजस्थानमध्ये, उत्तराखंडमध्ये, आसाममध्ये मध्य प्रदेशमध्ये व छत्तीसगढमध्ये आगी लागल्या. सर्वात जास्त आगी मध्य प्रदेशात व त्यानंतरओडिशा, छत्तीसगढमध्ये व झारखंडमध्ये लागल्या आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0