देशातील सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न देशातील समाजकंटक करीत आहेतच. पण, त्यामध्ये आता बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी मदत करीत आहेत, हे दिल्लीतील जहांगीरपुरीतील घटनेवरून दिसून आले आहे. दंगली घडविणार्या समाजकंटकांचा बंदोबस्त तर व्हायलाच हवा. पण, देशातील वातावरण बिघडविणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची त्वरित हकालपट्टी करायला हवी!
देशात सध्या ‘हिजाब’, हलाल आणि अजान यावरून काही भागात संघर्ष, तणावाचे वातावरण दिसून येत असतानाच हिंदू समाजाच्या धार्मिक मिरवणुकांवर हल्ले करून या तणावात भर टाकण्याचे काम समाजकंटकांकडून केले जात आहे. दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर जहांगीरपुरी भागात हल्ला करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोप दिल्लीच्या भाजप नेत्यांनी केला आहे. या मिरवणुकीवर हल्ला होण्याचा प्रकार उत्स्फूर्त नव्हता, तर तो पूर्वनियोजित कट होता, असा आरोप दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता आणि खा. मनोज तिवारी यांनी केला आहे. दिल्लीमध्ये जे बेकायदेशीर विदेशी नागरिक आले आहेत ते या हिंसाचारास जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हिंसाचारात या बेकायदेशीर स्थलांतरितांची नेमकी भूमिका काय राहिली याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.
दिल्लीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य केलेल्या रोहिंग्यांची संख्या बरीच आहे. या बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्या रोहिंग्यांना ‘आप’च्या अरविंद केजरीवाल सरकारने मोफत वीज आणि पाणी उपलब्ध करून दिले आहे. दिल्लीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असलेल्या रोहिंग्यांचा मोठा समुदाय असून त्यांच्यामुळे देशाच्या ऐक्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या संदर्भात सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खा. मनोज तिवारी यांनी केली आहे. तसेच, या लोकांना संरक्षण देणार्या आणि त्यांना येथे स्थिरस्थावर होण्यास जे मदत करीत आहेत, त्यांच्यापासून अधिक धोका आहे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.‘आप’चे माजी मंत्री आणि आता भाजपमध्ये असलेल्या कपिल मिश्रा यांनी, हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेला हल्ला हा ‘दहशतवादी हल्ला’ मानावयास हवा, अशी मागणी केली आहे. तसेच, बेकायदेशीरपणे राहत असलेल्यांची भारतातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जहांगीरपुरीमधील ज्या ‘सी ब्लॉक’मध्ये हिंसाचार झाला त्या भागात बांगलादेशी मोठ्या संख्येने राहतात. तसेच, ‘सी ब्लॉक’ आणि ‘एच-२’ झोपडपट्टीमध्ये सर्वात जास्त बांगलादेशी लोकसंख्या आहे, अशी स्थानिक रहिवाशांची माहिती आहे.
जहांगीरपुरी भागात हिंसाचार उसळल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी २३ जणांना अटक केली. या हिंसाचारात रोहिंग्या आणि बांगलादेशींचा कितपत हात आहे, त्याचा शोधही पोलीस घेत आहेत. जो हिंसाचार उसळला त्यास आम आदमी पक्षाच्या सरकारने रोहिंग्या आणि बांगलादेशींना बेकायदेशीरपणे राहण्याची जी परवानगी दिली ती कारणीभूत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या शोभायात्रेवर हल्ला करण्याची तयारी दोन दिवसांपूर्वीपासून सुरू होती, अशी माहितीही हाती आली आहे. ज्या भागात हिंसाचार उसळला तेथील अनेक लोक ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’, राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तकाच्या विरूद्ध 2020मध्ये निदर्शने, आंदोलने करण्यात सहभागी झाले होते. त्या दिशेनेही पोलीस तपास केला जात आहे, असे असतानाच ‘आप’चे आमदार अमानुल्लाखान यांना, एका विशिष्ट समाजाचा खूपच पुळका आल्याचे दिसून येत आहे. “एका विशिष्ट समाजास लक्ष्य करणे योग्य नाही. हिंसाचारास जे कोणी जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे,” असे ते म्हणतात. या हिंसाचार प्रकरणी प्रथम माहिती अहवालातील माहितीनुसार, सदर शोभायात्रा शांततापूर्ण वातावरणात निघाली होती. पण ही मिरवणूक त्या भागातील मशिदीजवळ येताच अन्सार आणि त्याच्या साथीदारांनी मुद्दाम भांडण उकरून काढले. त्यानंतर दगडफेकीस प्रारंभ झाला. पोलिसांनी घटनास्थळाहून तीन तलवारी आणि अन्य हत्यारे जप्त केली आहेत. तसेच, हिंसाचार झालेल्या ठिकाणी अचानक पेट्रोल बॉम्ब, हत्यारे, दगड कसे काय जमा झाले, याचा तपास पोलीस करीत आहेत. अन्सार आणि अस्लम या दोघांनी दोन दिवस आधीच म्हणजे १५ एप्रिलला हा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयास देण्यात आली.
देशातील सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न देशातील समाजकंटक करीत आहेतच. पण त्यामध्ये आता बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी मदत करीत आहेत हे या घटनेवरून दिसून आले आहे. दंगली घडविणार्या समाजकंटकांचा बंदोबस्त तर व्हायलाच हवा. पण देशातील वातावरण बिघडविणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची त्वरित हकालपट्टी करायला हवी!
हुबळीमध्ये पोलीस चौकीवर हल्ला!
अल्पसंख्य समाजाच्या भावना दुखविणारी एक कथित पोस्ट व्हॉट्सअॅपवर टाकल्याने संतापलेल्या जमावाने हुबळीमधील पोलीस चौकीवर हल्ला केला. या अल्पसंख्याक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यांच्या मोटारींची नासधूस केली. या हल्ल्यामध्ये ११ पोलीस जखमी झाले आहेत. अल्पसंख्य समाज कोणत्याही क्षुल्लक घटनेवरून कायदा हाती घेत असल्याच्या घटना देशाच्या विविध भागात वाढत चालल्या आहेत. कोठे ‘हिजाब’वरून, तर कोठे हलालवरून, तर आणखी कोठे मशिदीवरील भोंग्यांवरून तणावाचे प्रसंग निर्माण होत आहेत. पोलीस चौकीवर हल्ला केलेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबरी बुलेटचा मारा केला.
व्हॉट्सअॅपवर टाकलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर सदर पोस्ट टाकणार्या व्यक्तीस अटक करण्यात आली. पण त्यामुळे जमावाचे समाधान झाले नाही. जमावाने पोलीस चौकीवर दगडफेक तर केलीच, पण आजूबाजूच्या इमारती आणि मंदिरांवरही दगडफेक केली. या घटनेस जे जबाबदार आहेत त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे. एवढ्या अल्पकाळात पोलीस चौकीपुढे एवढा संघटित जमाव जमतो हे लक्षात घेता फुटीर शक्तींचा हा संघटित प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप कर्नाटक राज्याच्या गृहमंत्र्यांनी केला आहे. हुबळीमधील शांततेचा भंग करण्यासाठी, काँग्रेसकडून बंगळुरूमध्ये २०२० साली जसे हल्ले झाले तसे हल्ले केले जात आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. हुबळीमधील घटना पाहता एखादी कथित आक्षेपार्ह घटना घडली की, कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती अल्पसंख्याक समाजामध्ये वाढत चालल्याचे दिसून येत आहे, अशा प्रवृत्तीचा कणखरपणे बीमोड होणे अत्यावश्यक आहे.