मुंबई (प्रतिनिधी) : 'युनेस्को'ने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या कास पठारावर आता पर्यटकांसाठी 'नाईट सफारी' सुरू केली जाणार आहे. सातारा वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे पठारावरील वन्यजीवांच्या अधिवासावर गदा येणार असून निशाचर प्राण्यांच्या वावराला 'नाईट सफारी'चा फटका बसू शकतो.
साताऱ्याचे कास पठार हे पुष्पपठार म्हणून ओळखले जाते. पावसाळी हंगामात या पठारावर नानाविध वनस्पती उगवतात. यामध्ये फुलांची संख्या अधिक असते. सोबतच या पठारावर गवे, बिबटे आणि कोल्ह्यांचा वावर देखील निदर्शनास येतो. सोबतच विविध प्रकारचे उभयचर आणि सरपटणारे प्राणी देखील या पुष्पपठारावर अधिवास करतात. मात्र, आता या जीवांच्या अधिवासावर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, वन विभागाने कास पठारावर नाईट सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळी महिन्यांमध्ये कास पठाराला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. त्या तुलनेत हिवाळी आणि उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या कमी असते. त्यामुळे ही संख्या वाढवण्याकरिता वन विभागाने नाईट सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीच पावसाळी हंगामात कासवर होणाऱ्या अनियंत्रित पर्यटनाला वनस्पती तज्ज्ञांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. कारण, काही हौशी पर्यटकांकडून फुलं पाहण्याच्या नादात दुर्मीळ वनस्पतींना तुडवले जाते. शिवाय, अधिवासात हस्तक्षेपही केला जातो. अशा परिस्थितीत आता नाईट सफारी सुरू केल्यास तेथील वन्यजीवांच्या अधिवासावर आणि वावरावर गदा येण्याची शक्यता आहे. महाबळेश्वरमधील राखीव वनक्षेत्रातही अशाच पद्धतीने नाईट सफारी सुरू करण्याचा वन विभागाचा मानस आहे. यासंदर्भात वन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा वनविभागाकडे रात्रीची गस्त घालण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे कास पठार आणि महाबळेश्वरमध्ये 'नाईट सफारी' सुरू केली जाणार आहे. जेणेकरुन रात्री वनक्षेत्रात पर्यटकांचा वावर राहिल्यास अनधिकृत कामावर चाप बसेल, असा वनाधिकाऱ्यांचा समज आहे.