कल्याण (जान्हवी मोर्ये): कल्याण तालुक्याला उल्हास, वालधुनी आणि काळू नदीच्या रूपाने नैसर्गिक जलसंपदा लाभली आहे. मात्र, याच जलसंपदेला आता प्रदूषणाचा फटका बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत नेहमीच नाल्याने रंग बदलल्याच्या घटना समोर येत असतात. त्यावरून येथील प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचा प्रत्यय येतो. कल्याण परिसरातील नद्यांची ‘मॅगसेसे पुरस्कार’ विजेते तथा ‘वॉटरमॅन’ राजेंद्र सिंह यांनीही नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या परिसरातील नद्यांची दुरवस्था झाली असून त्या सध्या ‘आयसीयु’मध्ये आहेत. तसेच सरकार या नद्यांना नाले बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत खंत व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर कल्याणमधील जलसपंदा आणि नद्यांचे अस्तित्व सध्या धोक्यात का आले आहे, याविषयीचा धांडोळा या वृत्तमालिकेतून घेतला जाणार आहे. या वृत्तमालिकेच्या पहिल्या भागात आपण उल्हास नदीचा उगम, प्रवाह आणि प्राथमिक माहिती जाणून घेणार आहोत.
ठाणे जिल्ह्यातील बारमाही वाहत असलेली आणि 122 किलोमीटर लांबीची उल्हास नदी राजमाची खंडाळा येथे उगम पावते. त्यानंतर कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमधून वाहत ती कल्याणमधील खाडीनंतर शेवटी समुद्राला जाऊन मिळते. या नदीवर मोहने बंधारा आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र असून त्यातून पालिका पाणी उचलते. ‘एमआयडीसी’च्या जांभूळ केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. उल्हास पम्पिंग हाऊस शहाडनजीक असून बदलापूर येथे विनादरवाजा पाणबुडी पद्धतीचे लहानसे बॅरेज धरण आहे. ठाण्याची स्टेम पाणीपुरवठा योजनादेखील याच नदीवर आहे.
कल्याण-डोंबिवलीची तहान भागविणार्या उल्हास नदीतून उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, भाईंदर तसेच तालुक्याच्या आसपास असलेल्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, बदलापूर येथे नदीला एका कातळाने काप दिल्याने त्याठिकाणी नदी चक्क काटकोनी वळण घेते. जगातील कोणत्याही नदीला असे काटकोनी वळण नाही. सुमारे 48 लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागविणार्या उल्हास नदीचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागले आहे. उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा बसला असून तो दिवसेगणिक अधिक घट्ट होत आहे. उल्हास नदीला पुन्हा तिचे गतवैभव प्राप्त व्हावे, याकरिता सामाजिक संस्था पुढाकार घेत आहे, मात्र, राज्य सरकारचे या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील भागात आपण उल्हास नदीच्या जलप्रदूषणावर प्रकाशझोत टाकणार आहोत.
काय आहे उल्हास नदीचे ऐतिहासिक महत्त्व?
उल्हास नदीचा उल्लेख कालिदासाच्या ‘रघुवंश’ काव्यातील 55व्या श्लोकात ‘मुरूला’ नावाने केला आहे. तसेच सातवाहन काळातील हाल राजाने लिहिलेल्या ‘गाहासत्तसई’ म्हणजेच ‘गाथासप्तशती’मध्येही 870व्या श्लोकात मुरूला नदीचा उल्लेख आढळतो. ‘अवंतीसुंदरीकथा’ या साहित्यात उल्हास नदीमध्ये हत्ती विहार करतात, असा उल्लेख केलेला आहे. यात ज्ञात बाब म्हणजे हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत उल्हास नदीवर उभारण्यात आल्याचे अनेक दाखले इतिहासात नमूद आहे. याविषयीचे संशोधन अजूनही सुरू आहे, अशी माहिती उल्हास नदी बचाव कृती समितीचे मुख्य सदस्य रवींद्र लिंगायत यांनी दिली.