गीतातत्वाचा ‘ब्राह्ममुहूर्त’

16 Apr 2022 20:02:58

geeta
 
 
 
 
योगेश्वर श्रीकृष्णाने किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीमद्भगवद्गीता सांगितली. तेव्हापासून गेली हजारो वर्षे विचारी जनांना श्रीमद्भगवद्गीतेने आपल्याकडे खेचले. श्रीमद्भगवद्गीतेचे अनेक तत्त्वज्ञांनी, साधु-संतांनी, टीकाकारांनी, अभ्यासकांनी अनेकानेक अर्थ लावले. श्रीमद्भगवद्गीतेवर आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी चिंतन, मनन, मंथन केले नि त्यातील ज्ञानामृत सर्वांसमोर आणले. त्याचप्रमाणे संसारीजनांनीही श्रीमद्भगवद्गीतेवर अभ्यासपूर्ण विवेचन केल्याचे दिसून येते. अजूनही श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ लावण्याचे किंवा गीतामृतमंथनाचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींकडून अव्याहतपणे सुरुच आहे. त्यात व्यावहारिक जगात वावरणार्‍या पण, श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या, सुलभ शब्दांत मांडणार्‍यांचाही समावेश होतो. प्रल्हाद नारायणदास राठी यांनी आपल्या ‘ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहाद्वारे श्रीमद्भगवद्गीतेतील हेच तत्त्वज्ञान अगदी मोजक्या व नेमक्या शब्दांत सादर केले आहे.
 
 
 
आसक्तीला सांसारिक जीवनात प्रेम समजले जाते, पण आध्यात्मिक जीवनात प्रगतीसाठी आसक्ती मोठी बाधा आहे, असे अनेक वेळा योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि यावरच चिंतन करता करता प्रल्हाद राठी यांना कविता सुचू लागल्या. त्यांचे मित्र शिरीष लिमये श्रीमद्भगवद्गीतेतील मुख्य विचारांवर सत्र घेतात व ती सत्रे प्रल्हाद राठी जसजसे ऐकत गेले, तसतसे ते सुख आणि आनंदावर कविता रचत गेले. आधुनिक जगात मनुष्यासमोर अहंकार, आसक्ती आणि पूर्वग्रह, ही तीन आव्हाने असल्याचे प्रल्हाद राठी यांना जाणवले. ‘ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहातील बहुतांश कविता या आव्हानांवर व्यक्त होणार्‍या, मार्गदर्शन करणार्‍या आहेत.प्रल्हाद राठी यांच्या ‘ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहातील कविता एकाच भाषेतील नाहीत, तर मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत या कविता आहेत. अर्थात, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषिकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान अनुभवता येते. तथापि, या कविता एका भाषेतून उर्वरित दोन भाषेत भाषांतरित केलेल्या वगैरे नाहीत, तर प्रत्येक भाषेतली रचना स्वतंत्र आहे. प्रेम, श्रद्धा, मैत्री, सुख-दुःख, आनंद, आसक्ती, लोभ, त्याग, असूया, मोह यांच्यामुळे माणसांकडून अनेक चुका घडतात, त्यावर माणसाला पश्चात्तापही होतो. त्यातून अर्थातच माणसाचा स्वतःचा शोध सुरू असतो. प्रल्हाद नारायणदास राठी यांच्या ’ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहात वरील भावना, नाते किंवा प्रमाद आणि पुढे आत्मशोध अशाप्रकारे व्यक्त होत जातात. मानवी आयुष्य, माणसाचा स्वभाव, निसर्ग, नातेसंबंध, माया, सत्य-असत्य, हिंदुत्व, परमेश्वर आदी विषयांनाही स्पर्श करणार्‍या या कविता वाचकाला अंतर्मुख करतात, तसेच साधकाची, मानवी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी, हेही सांगतात.
 
 
 
प्रल्हाद राठी यांच्या कविता नियोजनपूर्वक लिहिलेल्या नाहीत, तर त्या उत्स्फूर्त आहेत. त्यांच्या कवितेला जशी श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाची, आध्यात्मिक चिंतनाची बैठक आहे, तसेच त्या कवितांना सामाजिक भान, सकारात्मकता, विधायकतेची अन् विनोदाचीही जोड आहे. अकृत्रिम, भावदर्शी आणि अर्थवाही भाषा असल्याने ‘ब्राह्ममुहूर्त’मधील सर्वच कविता मनाला भावणार्‍या, बुद्धीला सत्प्रेरणा देणार्‍या, आशावाद जागृत करणार्‍या आणि अंतरात्म्याला स्पर्श करणार्‍या आहेत. ’मी आणि माझे’चा परिघ ओलांडून आपण आणि आपला विचार करणार्‍या या कविता आहेत.गीतेने काय शिकवले? या प्रश्नाचे उत्तर ‘ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहातील याच शीर्षकाच्या कवितेत दिले आहे.
 
प्रश्न पडला मनात
गीतेने काय शिकवले
वेळ एवढा देऊन
आपण काय मिळवले
आधी एवढा अहंकाराचा धूर मनात
आता रुजले कणभर ज्ञान
त्या तेजानने अहंकार निवळला
गीतेच्या चिंतनाने आनंद बहरला
अशा शब्दांत कवीनेच आपल्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
 
 
समाजात नोकर आणि मालकाचे नाते प्राचीन काळापासून चालत आले आहे. जो काम देतो तो मालक आणि जो काम करतो तो नोकर, अशीच याबाबतची समाजमान्यता आहे. पण, खरेच तसे आहे का? प्रल्हाद राठी यांनी ‘ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहातील ‘नोकर कौन? मालिक कौन?’ या कवितेतून कोणीही नोकर नसून सारेच मालक असल्याचे व मुद्दा फक्त हुद्द्याचा आणि काळाचा आहे, असे सांगितले आहे. ते म्हणतात,
 
नोकर कोई होता है क्या? सभी मालिक हैं
कोई अपने मजबूरी से नोकरी करते हैं
देते हो तुम इनको थोडा बहुत पैसा
जो तुम उनको अपना गुलाम समज बैठे?
वक्त से ना उलझो
वह तो हुद्दे की आलट पालट कर देगा
हुद्दा कोई भी हो पैर धरती पर ही रखना
सब हमसफर है, कार्य एक हैं,
उसका ध्यान रखना!
अशा शब्दांत त्यांनी नोकर-मालकाला एकाच पातळीवर आणल्याचे दिसते.
 
 
दरम्यान, जन्माला येतानाच प्रत्येक व्यक्ती मुक्त असते, पण जसजसा काळ पुढे सरकतो, तसतशी एकेक कर्तव्ये व्यक्तीला चिकटतात. त्यातली काही पूर्ण होतात, तर काही अपूर्णच राहतात. मानवी आयुष्यातील कर्तव्यांवरील विचार प्रल्हाद नारायणदास राठी यांनी आपल्या ‘ड्युटी’ या इंग्रजी कवितेतून मांडले आहेत.
 
I have so many duties
All decided by others
Am I to live
For others point of view?
I was born free
All added as time went by
Some I performed some I failed
Who is here a machine anyway!
अशी भावना त्यांनी मानवी आयुष्यातील कर्तव्याबाबत मांडली आहे.
याव्यतिरिक्त ‘प्रेम’, ’मृगजळनाशिनी कृपा’, ‘एहसास’, ‘दिव्य मिठी’, ‘मनाची अंघोळ’, ‘श्रीमंतीचे क्षण’, ‘जैन क्षमायाचना’, ‘आनंदाचे डोह’ आणि इतरही अनेक कवितांतून प्रल्हाद नारायणदास राठी यांचे सखोल चिंतन व श्रीमद्भगवद्गीतेची गूढता, सत्यता, सुंदरता दिसून येते.दरम्यान, शतकपूर्तीकडे वाटचाल करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि त्याविषयीची भावना व्यक्त करणारी ’संघ’ या शीर्षकाची कविताही ‘ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहात आहे.
 
संघमय व्हावे जीवन आपले
संघमय व्हावे जीवन तुमचे
परमेश्वराचे अधिष्ठान संघाला आहे
डॉक्टरांची दूरदृष्टी संघाला आहे
गुरुजींची तपश्चर्या संघाला आहे
शिवाजी महाराजांचे स्वप्न संघ साकारेल
भगव्या ध्वजाचे नमन संघ आहे
हिंदुत्वाचे रक्षण संघ आहे
प्रचारकांचे समर्पण संघ आहे
मातृभूमीचे धर्मपरिवर्तन रोखणारा संघ आहे!
असे प्रल्हाद राठी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल लिहिले आहे.
 
’ब्राह्ममुहूर्त’मधील सर्वच कविता अतिशय वाचनीय आणि विचारप्रवृत्त करणार्‍या तसेच सकारात्मक आहेत. दीपक संकपाळ यांनी चितारलेले काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ विषयाला साजेसे असून छपाई उत्कृष्ट असून मयुरी मालुसरे यांनी केलेली ‘ले-आऊट’ मांडणी आकर्षक आहे. जवळपास प्रत्येक कवितेसाठी धनश्री केळकर यांनी रेखाचित्रे चितारलेली आहेत. पुस्तकाचे संपादन प्रा. सुमन महादेवकर यांनी केले आहे.
 
 
 
पुस्तकाचे नाव : ब्राह्ममुहूर्त
कवीचे नाव : प्रल्हाद नारायणदास राठी
प्रकाशक : हिंदुस्थान प्रकाशन संस्था
पृष्ठे : ११२
मूल्य : २००/-
अशी भावना त्यांनी मानवी आयुष्यातील कर्तव्याबाबत मांडली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0