बखर हिंदू महासभेची!

16 Apr 2022 20:44:14

hindu
 
बदलापूर येथील प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार अनंत शंकर ओगले यांनी आजवर अनेक ऐतिहासिक, राजकारणी व्यक्तिमत्त्वांचा आढावा त्यांच्या लेखणीतून घेतलेला आहे. मालाकार चिपळूणकर, महात्मा फुले, स्वामी दयानंद, अ‍ॅडॉल्फ हिटलर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोरले छत्रपती सातारकर शाहू महाराज, बालगंधर्व, यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर, देवी अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अभ्यासविषय त्यांनी गेल्या ३२ वर्षांत हाताळले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचे ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी!’ हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे.
 
 
भारतीय राजकारणातला १९२० नंतरचा काळ हा त्यांना सारखा खुणावत असल्याने ‘बखर हिंदू महासभेची’ हे नवे पुस्तक उद्गीरच्या साहित्यसंमेलनप्रसंगी प्रसिद्ध होते आहे. हिंदू महासभेची चळवळ कशी आणि किती तीव्र होती, हे दर्शविणारे नवे पुस्तक मराठी वाचकांना नक्कीच भावेल!हिंदू महासभेसाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिले, त्यांची नावे तरी पाहा! स्वामी श्रद्धानंद, भाई परमानंद, लाला लजपतराय, साहित्यसम्राट केळकर, धर्मवीर मुंजे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे तर भारतीय राजकारणातले हिंदुत्वाचे सप्तर्षीच!
 
डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे एकेकाळी हिंदू महासभेचे काम करीत होते हे सांगितले, तर लोकांना आश्चर्याचा धक्काच बसेल! एकेकाळी हिंदू सभेच्या कामात महात्मा गांधीजीसुद्धा लक्ष घालत होते. पंडित मोतीलाल नेहरुही सहभागी होत होते, हे इतिहासाला विसरता येणार नाही. काँग्रेसच्या मंडपामध्येच हिंदू सभेचे अधिवेशन भरत असे. पाच आण्याची पावती त्यात चार आणे काँग्रेसचे-एक आणा हिंदू महासभेचा असे ऐक्य होते.
 
या पुस्तकात अनंतराव ओगले यांनी टिळकयुगाच्या समाप्तीनंतरचे भारतीय राजकारण, हिंदू सभेची स्थापना, कोकोनाडा काँगे्रस, फेरनाफेरवाद खिलाफत सायमन कमिशन, गोलमेज परिषद, जातीय निवारा, लोकशाही स्वराज्य पक्ष, डॉ. मुंजे, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, फाळणी, गांधीजींचे राजकारण या सार्‍यांचाच वेधक असा आढावा घेतलेला आहे. फाळणीचा करुण अध्याय वाचताना वाचकांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. भारतातल्या हिंदुत्ववाद्यांची परंपरा सुरू होते तीच मुळी हिंदू महासभेपासून - हिंदू महासभा, जनसंघ, रा. स्व. संघ, भाजप, या पुढच्या पायर्‍यांचा प्रवास आहे. आजच्या घडीला हिंदू महासभा या पक्षाचे सामर्थ्य नगण्य आहे. १९४४ पासून पुढच्या ५० वर्षांत तरी हिंदू महासभेच्या लोकसभेतील सदस्यांची एकूण संख्या कधी दहाच्यावर गेली नाही!
 
 
पण, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना जे अथांग यश मिळाले, त्याचा पाया हिंदू महासभेनेच 107 वर्षे आधीच घातला होता, हे विसरताच येणार नाही. अशा या हिंदू महासभेच्या इतिहासाचे वर्णन करणारा, हिंदू महासभेच्या या बखरीचे स्वागत मराठी राष्ट्रवादी वाचक नक्की करतील!
पुस्तकाचे नाव : बखर हिंदू महासभेची!
लेखक : अनंत शंकर ओगले
प्रकाशक : कृष्णा प्रकाशन
पृष्ठसंख्या :
मूल्यः
 
 
 
Powered By Sangraha 9.0