‘डिजिटल’ कुंचल्याचा आविष्कारकर्ता

13 Apr 2022 09:40:49

pranav
 
 
 
 
 
‘डिजिटल पोट्रेट्स’च्या कलाविश्वात लहान वयातच मोठी झेप घेणार्‍या नाशिक येथील प्रणव सातभाई या कर्तृत्ववान तरुणाविषयी...
 
डीजिटल पेंटिंग’ या क्षेत्रात प्रणवने यशस्वीपणे केवळ सुरुवातच केली नाही, तर अल्पावधीतच स्वतःच्या नावावर जागतिक विक्रम देखील नोंदवला. ’मास मीडिया’चा विद्यार्थी असणारा प्रणव नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात लहानाचा मोठा झाला. बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असताना आपल्याला फोटोग्राफीचे क्षेत्र साद घालतेय हे त्याला जाणवले आणि उपलब्ध कॅमेर्‍यातून त्याने निसर्ग, व्यक्ती व कार्यक्रमांना आपल्या छायाचित्रांतून मांडायला सुरुवात केली. वन्यजीव छायाचित्रण हा त्याच्या आवडीचा प्रांत, तर जवळच्या परिसरात असलेले पक्षीवैविध्य टिपण्यासाठी आवश्यक तो अभ्यासही त्याने शालेय अभ्यासक्रमासोबतीने केला.व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रणवच्या वडिलांची मनापासून इच्छा होती की, प्रणवने डॉक्टरीपेशा स्वीकारावा. आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात रस नाही याबाबत ठाम असला तरी वडिलांच्या इच्छेला मान देत त्या दिशेने प्रवास करण्याचा प्रणवने निर्णय घेतला. परंतु, अल्पावधीतच हा निर्णय योग्य नाही, हे लक्षात येऊन त्याने वडिलांशी त्याबाबत चर्चा केली. एकीकडे वैद्यकीय क्षेत्र, घरातला अनुभव, प्रस्थापित व्यवसाय, तर दुसरीकडे फोटोग्राफी हे तुलनात्मकदृष्ट्या नवे व भरपूर स्पर्धा असणारे क्षेत्र असा विषय चर्चेत होता.
 
 
दोन पिढ्यांमधल्या निर्णयांमधील, विचारांमधील फरक इथेही होता आणि त्याचवेळी आपल्या इच्छेला मान देत आई- वडिलांनी दिलेल्या परवानगीचा सन्मान करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याचे भान प्रणवला होते. प्रणव ‘मास मीडिया’च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. एकीकडे फोटोग्राफी, शॉर्टफिल्म्स या आपल्या छंदाला तसेच भविष्यातील व्यवसायाला वेळदेखील देत होता. ’पहिल्या ‘लॉकडाऊन’ दरम्यान आपल्याला सुट्टी मिळाली आहे, असे महाविद्यालयातील मित्रांप्रमाणेच आपल्याला देखील वाटले. दुसर्‍यांदा देखील जेव्हा ‘लॉकडाऊन’ झाले,तेव्हा मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. आपला वेळ व्यर्थ न दवडता सत्कारणी लावावा, असे मग निश्चित केल्याचे प्रणव सांगतो. हा शोधच त्याला घेऊन आला ’डिजिटल पेन्टिंग’ या नव्या विश्वापर्यंत. इंटरनेटवर या कलेबद्दल शोध घेत त्यातल्या बारकाव्यांचा अभ्यास व एकीकडे सराव प्रणव करू लागला. कुठलीही कला प्रयत्नांशिवाय साध्य होत नाही याचा त्याला अनुभव येत होता. सुरुवातीला काही चुका झाल्या, उतरलेले ‘डिजिटल पोट्रेट’ मनाप्रमाणे साकारत नव्हते. घरातल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रणं प्रणव करत होता. पण, काही तासांच्या मेहनतीनंतरही मनाजोगते चित्र साकारत नव्हते. अर्थात त्याने हार मानली नाही. तो नेटाने नवनवीन प्रयोग करत राहिला आणि एक दिवस अभिनेते विचारवंत शरद पोंक्षे यांचे ‘पोट्रेट’ त्याने साकारले. हे ‘पोट्रेट’ समाजमाध्यमांवर त्याने पोस्ट करताच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे साकारलेले नाना पाटेकरांचे चित्र नानांच्या पसंतीस उतरले. त्यांनी थेट फोन करून प्रतिक्रिया दिली आणि सुरुवात झाली प्रणवच्या यशस्वी प्रवासाची.चित्रकलेचे माध्यम आता बदलले होते. हातातील कुंचला ‘डिजिटल’ होता. संगणक, ग्राफिक्स आणि काही विशिष्ट सॉफ्टवेअर्सचा उपयोग करून ही चित्रे साकारतात. प्रत्येक फ्रेमला चार ते पाच तास किंवा त्याहून अधिक अवधी लागतो. पारंपरिक चित्रकलेप्रमाणेच या चित्रांसाठीदेखील मेहनत घ्यावी लागते. आपण ज्या व्यक्तींचे ‘पोट्रेट’ करतो, त्यांना मिळणारा आनंद पाहिला की ही मेहनत सार्थ ठरते, असे प्रणव आवर्जून सांगतो. अल्पावधीतच प्रणवने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नाट्य, गायन क्षेत्रातील सुप्रसिद्ध चेहरे, नावाजलेले खेळाडू, राजकारणी, साहित्यिक अशा अनेकांचे ‘पोट्रेट्स’ केले आणि सगळ्यांकडून पसंतीची पावती मिळवली. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या घरात प्रणवने त्यांच्या साकारलेल्या फ्रेम सन्मानाने विराजमान झालेल्या आहेत, याचा त्याला आनंद वाटतो.
 
 
आपल्या आजवरच्या प्रवासात प्रसिद्धीत व यशामध्ये तंत्रज्ञानाचा जसा मोठा सहभाग आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट व समाजमाध्यमांना देखील तो श्रेय देतो. चित्रकलेचं नवं दालन, नवा प्रयत्न करताना समाजमाध्यमांकडून मिळणारा प्रतिसाद, सातत्याने वाढणारे फॉलोअर्स, प्रोत्साहन यामुळे आपली वाट सुकर झाली असे त्याला वाटते. बघता बघता ‘पोट्रेट्स’ हजाराच्या वर संख्येचा टप्पा गाठला. याचीच पुढची पायरी ठरली जागतिक पातळीवर मिळालेली प्रसिद्धी. केवळ प्रसिद्धीच नव्हे, तर ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ने प्रणवच्या कलेची व सातत्याची नोंद घेत नुकताच त्याच्या नावे रेकॉर्ड नोंदवून त्याचा सन्मान केलेला आहे. अवघ्या २१व्या वर्षी जागतिक पातळीवर सन्मान नोंदवणारा हा नाशिककर सगळ्यांच्याच कौतुकास पात्र ठरत आहे. जागतिक सन्मान नोंदविल्यानंतर या नव्या क्षेत्रासाठी प्रारंभी थोडा नकार असणार्‍या आपल्या आई-वडिलांना आता आपल्याविषयी अभिमान वाटतो याचे प्रणवला समाधान वाटते. नवी वाट, नवे क्षेत्र, नवी क्षितिजे सकारात्मकतेने स्वीकारणारा आणि जबाबदारीने यश मिळवणारा प्रणव सगळ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0