मुंबई : श्रीराम नवमीचा उत्साह रविवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, मुंबईत या औचित्यावर काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान मालाडमधील मालवणी येथे तणावाचा प्रसंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
मालवणी येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेला काही विशिष्ट गटातील नागरिकांकडून अडविण्याचा प्रयत्न झाला. यात्रेला अडविण्याचे प्रकार सुरू झाल्यानंतर सदरील परिसरात काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेरीस पोलीस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संभाव्य प्रकार टाळण्यासाठी मध्यस्थी करत शोभायात्रा शांततेत पुढे रवाना केली.
मागील अनेक वर्षांपासून धार्मिक हिंसाचार आणि तत्सम प्रकारच्या घटनांमुळे चर्चेतअसलेल्या मालवणीत हिंदू धर्मीयांतील नागरिकांवर विविध प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करण्यात येत असल्याच्या तक्रारी अनेकवेळा दाखल करण्यात आलेल्या आहेत. या भागातील हिंदूंना आपल्या मालमत्ता विकायला लावणे, स्वखुशीने जर त्यांनी होकार दिला, तर ठीक अन्यथा विविध मार्गांचा वापर करून त्यांना मालवणी सोडून पलायन करण्यास भाग पाडणे आणि तत्सम प्रकारच्या अनेक घटना या ठिकाणी घडत असल्याचा आरोप याआधी स्थानिकांनी अनेकदा केला आहे. काही महिन्यांपूर्वी मालवणीतील टिपू सुलतान क्रीडा संकुलाच्या नामकरण उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगीदेखील अशाच प्रकारे दोन गटांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता श्रीराम नवमीनिमित्त आयोजित शोभायात्रांना रोखण्याचे प्रयत्न झाल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण होते.