कोकणातील कासवांच्या पिल्लांच्या जीवावर उठल्या लाल मुंग्या; तापमान वाढीचा गंभीर परिणाम

01 Apr 2022 21:35:15

sea turtle

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जमिनीखालच्या अंध लाल मुंग्या या कोकण किनारपट्टीवर जन्म घेणाऱ्या सागरी कासवांच्या पिल्लांच्या जीवावर उठल्या आहेत. ही बाब संशोधनाअंती समोर आली आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढ झाल्याने कोकणातील सागरी कासवांच्या ( konkan sea turtle ) विणीच्या हंगामात बदल झाला आहे. परिणामी याचा पिल्लांच्या जन्मावर प्रभाव पडल्याचेही संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. ( konkan sea turtle )
 
 
कोकण किनारपट्टीवर दरवर्षी 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान त्यांची वीण होते. पूर्वी नोव्हेंबर ते डिसेंबर या थंडीच्या महिन्यांमध्ये सागरी कासवांची मोठ्या संख्येने घरटी सापडत होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ही घरटी उन्हाळी महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने सापडत आहेत. या बदलांसह सागरी कासवांच्या विणीवर तापमानाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी एक अभ्यास प्रकल्प सुरू होता. वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या माध्यमातून आणि 'भारतीय वन्यजीव संस्थान'चे वरिष्ठ संशोधक डाॅ. के. सिवाकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 'पीएचडी स्काॅलर' सुमेधा कोरगावकर या अभ्यास करत होत्या. या अभ्यासाअंती कोकण किनारपट्टीवरील कासवांचा विणीवर तापमान बदलाचा गंभीर परिणाम होत असल्याची माहिती उघड झाली आहे.
 
 
  
सागरी कासवांच्या पिल्लांचे लिंग विकसित होण्यामध्ये घरट्यातील तापमान महत्त्वाची भूमिका बजावते. साधारण घरट्यामधील २९.५ अंश सेल्सिअस तापमानामुळे अंड्यांमध्ये समानरित्या नर आणि मादीचे लिंग विकसित होते. शिवाय ३३ अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान अंड्यांच्या विकासाकरिता सुरक्षित असते. मात्र, तापमान वाढीमुळे कोकणातील सागरी कासव विणीच्या प्रमुख हंगामात बदल झाला आहे. पूर्वी नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात होणारी कासवाची सर्वाधिक घरटी, आता फेब्रुवारी ते मार्च या उन्हाळी महिन्यांमध्ये होत असल्याची माहिती सुमेधा कोरगावकर यांनी दिली. त्यामुळे 'डेटा लाॅगर'च्या मदतीने केलेल्या तपासणीअंती घरट्यातील तापमान हे ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याची नोंद करण्यात आली. कोकणातील कासव विणीचे बहुतांश किनारे हे नदीमुखाशी आहेत. परिणामी पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या गाळाचे कण वाळूमध्ये मिश्रित होतात. अशा परिस्थितीत घरट्यामधील आद्रर्ता आणि तापमान वाढल्यास गाळमिश्रित वाळू दगडासारखी कडक होते आणि त्यामध्ये पिल्ले अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आम्ही अभ्यासादरम्यान केल्याचे कोरगावकर यांनी सांगितले.


घरट्यामधील वाढते तापमान आणि निर्माण होणारी आर्द्रता ही 'डोरिलस ओरिएंटलिस' या मुंग्यांसाठी पोषक असते. अशा परिस्थितीत या मुंग्यांचा घरट्यांमधील वावर वाढल्याने त्या कासवांच्या पिल्लांना आणि परिपक्व अंड्यांना खात असल्याची माहिती आम्हाला कोळथरे आणि वायंगणी (वेंगुर्ला) येथील घरट्यांच्या तपासणीअंती मिळाल्याचे कोरगावकर यांनी सांगितले. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या 'डोरिलस ओरिएंटलिस' या लाल मुंग्या प्रामुख्याने जमिनीखाली अधिवास करत असून त्या अंध असतात. शेतीमध्ये त्यातही मुख्यत्वे कंदमुळांच्या शेतीमध्ये त्यांचा वावर असतो. या मुंग्यांचा कोकणातील किनाऱ्यांवर नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे त्यांना मारण्याऐवजी पळवून लावून त्यांचे कासवांच्या घरट्यांवरील हल्ले कमी करण्यासाठी कोरगावकर यांनी स्थानिक कासवमित्र सुहास तोरसकर आणि प्रवीण तोडणकर यांच्या मदतीने काही उपाययोजनाही केल्या. त्यामध्ये कडुलिंबाच्या बियांची पावडर घरट्यांच्या बाजूने चर खोदून पेरली गेली. त्यामुळे मुंग्यांचा प्रभाव कमी होऊन कासवांच्या घरट्यांचे रक्षण झाल्याची नोंदही करण्यात आली.


'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने अर्थसहाय्य केलेल्या या अभ्यासामुळे कासवांच्या विणीवर तापमान वाढीचा होणारा परिणाम लक्षात आला आहे. या अभ्यासात सुचविलेल्या उपायांचा विचार केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. याशिवाय, 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' हा प्रकल्प पुढे नेणार आहे. 'डेटा लॉगर'चा वापर करून घरट्यांमधील तापमानाचे बदल समजून घेण्यासाठी आणि समुद्री कासवांचा जन्मदर वाढवण्याकरिता मजबूत उपाय लागू करण्यासाठी दीर्घकालीन डेटा संकलित करण्याची योजना आखणार आहे. - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
 
 
 
Powered By Sangraha 9.0