श्रीमंत मुंबई पालिकेला श्रीमंतीचे डोहाळे!

09 Mar 2022 09:39:41

Roads in Mumbai
 
  
 
एखाद्या शहराची श्रीमंती ही त्या शहरातील अर्थकारणाव्यतिरिक्त त्या शहराच्या एकूणच स्थापत्त्य-सौंदर्यावरुनही पारखली जाते. रस्ते हे त्यापैकीच एक. म्हणूनच श्रीमंत मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन काँक्रिटच्या रस्त्यांची मोठाली कंत्राटं काढली खरी. पण, हे करताना आधीच खड्डेव्याप्त रस्त्यांमध्ये करोडो रुपये ओतूनही उपयोग मात्र शून्यच! तेव्हा, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्तेकामांची सद्यस्थिती मांडणारा हा लेख...
 
 
 
रस्ते हे एक महत्त्वाचे विकासाचे साधन. म्हणूनच या रस्ताकामाची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची मानली पाहिजे. पण, गेले कित्येक वर्षे मुंबईचे रस्ते मात्र खड्ड्यांनी भरलेले आढळतात. या रस्त्यांवर धोकादायक खड्डे पडण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे, रस्ते बांधणारा कंत्राटदार, वाहनातल्या त्रुटी, जोरदार पाऊस आणि या सगळ्यांमुळे रस्त्यांची होणारी एकूणच दुर्दशा! रस्त्यांवर होणार्‍या अशा हजारो दुर्घटनांना, अपघातांना असे एकमेकांवर अवलंबून असलेले घटकच जबाबदार आहेत. कामाची पद्धत ही मालकाने अर्थात इथे मुंबई महानगरपालिकेने आखून दिल्याप्रमाणे रस्त्याचे बांधकाम झाले पाहिजे. त्यात रस्ता बांधण्याचा माल म्हणजे खडी, रेती, खडीधूळ व बांधणी करणारा पदार्थ अस्फाल्ट मिश्रण वा सिमेंट मॉर्टर काम करण्याची पद्धत हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. तसेच ते काम पर्यवेक्षकाकडून म्हणजे पालिकेच्या प्रतिनिधीने योग्य रितीने तपासलेसुद्धा पाहिजे. रस्त्यांबरोबरच रस्त्यांवरुन धावणारी सर्व सार्वजनिक-खासगी वाहने हीदेखील त्रुटीमुक्त असायला हवीत. वाहनांच्या चाकात पुरेशी हवी. तसेच एखाद्या वजनदार वाहनाला रस्ता साजेसा असायला हवा. वजनदार वाहने व अती वेगाने जाणारी वाहने जर रस्त्याच्या क्षमतेच्या बाहेर असतील, तर रस्त्यांवर साहजिकच खड्डे पडतात. मुसळधार पावसात आणि पाणी तुंबण्यातूनही रस्ते लवकर खराब होतात. कंत्राटदार म्हणजे प्रत्यक्ष रस्ते बांधणारा घटक, हा तर रस्त्याचा दर्जा राखणारा मुख्य घटक असतो. कंत्राटदारांनी बांधलेल्या रस्त्यांची किमान पाच ते दहा वर्षांची हमी देणेदेखील जरुरी आहे.
 
 
 
मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची कोट्यवधींची कामे
१. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने १८०० कोटींपेक्षा अधिक किमतीच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. सर्वांत कमी बोलीच्या कंत्राटदारांनी स्थूल किमतीपेक्षा कमी दराने बोली या कामांसाठी बोली लावली आहे. किमतीच्या उणे दराच्या बोलीवर भाजप नेता प्रभाकर शिंदे यांनी म्हणूनच आक्षेपदेखील घेतला होता. कारण, उणे बोलीमुळे कामाचा दर्जा कमी होण्याची शक्यताही अधिक असते. परंतु, पालिकेच्या स्थायी समितीने २२०० कोटींच्या कामास मंजुरी दिली आहे. शहर, पश्चिम व पूर्व उपनगरांतील रस्त्यांकरिता एकूण १ हजार, ८५० कोटी रुपये; पदपथांच्या सुधारणांकरिता ३१ कोटी रुपयांचे प्रस्ताव; मुलुंड, कांदिवली, कुर्ला, चेंबूर, भांडुप, घाटकोपर, बोरिवली, अभ्युदय नगर येथील ‘म्हाडा’च्या अखत्यारितील रस्त्यांच्या कामाचे २९४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव आहेत. येत्या काळात आणखी ४०० कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर होण्याची शक्यता. कुर्ला विभागाकरिता सर्वाधिक म्हणजे ७७८ कोटी रुपयांचा समावेश आहे; मालाडमधील सर्वाधिक म्हणजे ४० लहानमोठ्या रस्त्यांची सुधारणा होणार आहे.
 
 
 
२. पश्चिम द्रुतगती महामार्ग वाहतूककोंडीमुक्त करण्याच्या उद्देशाने दहिसरहून पुढे मिरा-भाईंदरपर्यंत नवीन रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या रस्त्याची लांबी सहा किमी व रुंदी ४५ मीटर असणार आहे. या प्रकल्पाची स्थूल किंमत तीन हजार कोटी रुपये आहे. हा रस्ता दीड किमी मुंबई हद्दीत व साडेचार किमी मिरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीत असेल. म्हणजेच मुंबई आता सहाव्या रस्त्याने ‘एमएमआर’ क्षेत्राशी जोडली जाणार आहे. आधीचे पाच रस्ते म्हणजे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, ‘एलबीएस’ मार्ग, ऐरोली पुलाचा मार्ग, वाशी खाडी मार्ग. तेव्हा या वरील पाच महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूककोंडी लक्षात घेता, दहिसर-मीरा रोड रस्त्याचे काम मुंबई मनपाकडून हाती घेतले जाईल व ‘एमएमआरडीए’कडून मुंबई सोडून उर्वरित हद्दीकरिता मुंबई मनपाला प्रकल्प खर्च दिला जाईल.
 
 
 
३. ठाणे रेल्वे स्थानक परिसर वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी ‘मल्टीमॉडेल ट्रान्झिट हब स्टॉक’ प्रकल्प राबविला जाणार आहे. ठाणे पूर्वेला २.२४ किमी उन्नत मार्ग, वाहनतळासाठी तळघर, पादचार्‍यांसाठी अनेक सुविधांसह मार्गिका बांधण्यात येणार आहेत. ‘इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हपमेंट कॉर्पोरेशन’ (खठडऊउ) बरोबर ठाणे मनपा व ठाणे ‘स्मार्ट सिटी’ संयुक्तपणे हा प्रकल्प राबविणार आहेत. या प्रकल्पाला २०१९ पासून सुरुवात झाली होती. पण, कोरोनामुळे हे काम लांबणीवर पडले. पुढील दोन ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
 
 
 
४. गिरगावातील जगन्नाथ शंकरशेट जंक्शन, खाडीलकर रोड येथील रस्त्याचे काम सिमेंट काँक्रिटचे करण्याचे योजले आहे. दिवाळीमुळे हे काम बंद ठेवले होते. डिसेंबरमध्ये हे काम परत सुरू झाले आहे.
 
 
 
५. आरे वसाहतीतील रस्त्याच्या सहा किमी लांब रस्त्याच्या काँक्रिटीकरणावर पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला होता. काँक्रिट रस्त्याच्या पाव भागात डांबरी रस्ता होऊ शकेल व काँक्रिट रस्त्यामुळे अनेक झाडे बाधित होण्याची शक्यतादेखील वर्तविली जात होती. या मुख्य रस्त्याचे रुंदीकरणही रद्द करण्यात आले.
 
 
 
६. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा, तसेच खड्ड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने मुंबई मनपाने आता सहा किमीपर्यंतचे सर्व रस्ते काँक्रिटचे करण्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृती आराखडाही तयार केला आहे. दरवर्षी १०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर २०२० पर्यंत मुंबईत ७५० किमी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, यामुळे पावसाळ्यात पाणी काँक्रिट रस्त्यांखाली मुरणार कसे, असा प्रश्न उपस्थित होतो. मुंबईतील अडीच हजार किमी रस्त्यांपैकी पालिकेच्या अखत्यारित एकूण २,०५५ किमी रस्ते आहेत. त्यातही साधारणपणे पाच हजार अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.
 
 
 
७. खड्ड्यांच्या समस्येमुळे मुंबई मनपा आता सहा मीटर रुंदीचे रस्तेही काँक्रिटचे करणार आहे. १ लाख, ५६ हजार, ९१० चौ.मी क्षेत्रफळ असलेल्या रस्त्यांवरचे ३१ हजार, ६९८ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. खड्डे बुजविण्यासाठी वरळीच्या पालिकेच्याच अस्फाल्ट प्रकल्पातून शीत डांबरमिश्रीत खडीचा पुरवठा करण्यात येतो. कंत्राटदारांची नियुक्तीही करण्यात येते. प्रत्येक प्रत्येक विभागाला दोन कोटी रुपये निधी पुरवला जातो. यापैकी दीड कोटी प्रतिबंधात्मक कामाकरिता व ५० लाख रु खड्डे बुजविण्यासाठी दिले जातात. प्रकल्प रस्ते व दोषदायित्व कालावधीत कंत्राटदाराला स्वखर्चाने खड्डे बुजवावे लागतात. दि. ९ एप्रिल ते दि. ८ सप्टेंबर, २०२१ काळात २४ प्रभागांना २६९६ मे.टन (१,०७,८४३ गोणी) शीत डांबरमिश्रीत खडी पुरविण्यात आली. कामगारांनी २२,८९७ खड्डे बुजविले. त्यांचे क्षेत्रफळ ४९,९१९ चौ.मी होते. नियुक्त कंत्राटदारांनी ८,५०१ खड्डे बुजविले. त्यांचे क्षेत्रफळ १६,९८५ चौ.मी होते. टप्प्याटप्प्याने मोठ्या रस्त्यांबरोबर सहा मीटर रुंद रस्त्यांचेही काँक्रिटीकरण कऱण्याचे पालिकेने योजले आहे. त्यामुळे भविष्यात कदातिच खड्ड्यांची समस्या कमी होऊ शकते. पण, असे असले तरी आतापर्यंत मुंबई मनपाने गेल्या दहा वर्षांत कमीतकमी एक लाख कोटी रुपये रस्त्यांच्या कामावर खर्च केले आहेत.
 
 
 
८. ‘एमएमआरडीए’कडून खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी पूर्व व पश्चिम महामार्गांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे व त्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही होणार आहे. काँक्रिटीकरणासाठी पूर्व मार्गासाठी (शीव जंक्शन ते गोल्डन डाईझ जंक्शन, माजिवाडा, ठाणे २३.५५ किमी) २८७.५६ कोटी व पश्चिम मार्गासाठी (माहिम जंक्शन ते दहिसर चेकनाक्यापर्यंत २५.३३ किमी) ६३३.७१ कोटी खर्च येणार आहे. प्रत्यक्ष काम याच महिन्यात सुरु होणे अपेक्षित आहे.
 
 
 
रस्त्यांवरील रंगकाम
रस्त्यांच्या सुरक्षिततेचा दर्जा हा खड्डामुक्ततेवर अवलंबून असतो. रस्त्यांवरती केलेल्या खुणा वा आखलेल्या रंगरेषा यासुद्धा पादचार्‍यांच्या रस्ते ओलांडण्याच्या प्रक्रियेत व सुरक्षितपणे चालण्यासाठी साहाय्यभूत ठरतात. शहरातील रस्त्यांवर विविध भागांत झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग, पादचारी क्रॉसिंग पट्टे, दुभाजकांच्या रंगरोटी आदी गोष्टींकरिता थर्मोप्लास्टिक रंगलेपनाच्या कामावर तब्बल ४५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही सगळी कामे मुंबई मनपाच्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होण्याच्या आधी उरकणे मात्र गरजेचे आहे. मनपाने रस्तेदुरुस्ती, पूल, उद्याने, मलजलवाहिन्या, सार्वजनिक स्थळांचे सुशोभीकरण इत्यादी कामांसाठी कोटींचा खर्च केल्यावर आता उपनगरीय रस्त्यांवर मनपाने मुंबईतील सातही परिमंडळाकरिता स्वच्छता व रंगकाम करावयास घेतले आहे. त्यात उणे दर व कर धरून खर्च केला आहे.
 
 
 
मुंबईत रस्त्यांसाठी ‘ठोंबरे पॅटर्न’ का नाही?
मुंबईत १५ हून अधिक वर्षांपूर्वी पालिकेचे इंजिनिअर डॉ. विशाल ठोंबरे यांच्या ‘अल्ट्राथीन व्हाईट टॉपिंग’ तंत्रज्ञानाने बनविलेले रस्ते आजही सुस्थितीत आहेत. या रस्त्यांवर एकही खड्डा पडलेला नाही. तेव्हा, हे खड्डेमुक्त रस्त्यांचे ‘ठोंबरे पॅटर्न’ नेमके काय आहे, ते बघूया.
 
 
 
असे आहे तंत्रज्ञान...
 डांबरी रस्त्यावर ‘अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग’चा १५ सेंमी थर देऊन त्याचे फक्त सात दिवस पुष्टीकरण (curing) केल्यानंतर हा रस्ता रहदारीसाठी वापरण्यात येतो. जर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले, तर ३० सेंमी थर लागतो व पुष्टीकरणासाठी २८ दिवस लागतात. हे तंत्र वापरल्यास २५ टक्के पैशांची व वेळेचीही बचत होते. मुंबई मनपाने सर्व रस्ते काँक्रिटचे करण्याचे योजले आहे. यालाच म्हणतात, श्रीमंत मनपाला श्रीमंतीचे डोहाळे! कारण, काँक्रिट रस्त्याला अस्फाल्ट रस्त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट खर्च येतो.
 
 
Powered By Sangraha 9.0