बंदिस्त आयुष्य न जगता स्त्री-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा वस्तुपाठ उभा करणार्या श्रद्धा अजमेरा यांच्याविषयी....
जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणावर अनेक ठिकाणी चर्चाही झाल्या. पण, खर्या अर्थाने विचार करता महिला या मुळी सक्षमच असतात. अशा समोर येणार्या अनंत अडचणींवर यशस्वीपणे मात करत ध्येयाच्या दिशेने पावले टाकणार्या अनेक महिला आपल्या आसपासच असतात. त्यापैकीच एक म्हणजे नाशिकच्या श्रद्धा कुलकर्णी-अजमेरा. वालचंदनगर, सांगली तसेच नाशिकमध्ये बालपण व शिक्षण पूर्ण केलेल्या श्रद्धा ‘इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनिअर’ आहेत. शिक्षणानंतर नोकरी, विवाह, मुलांचा जन्म आणि त्यानंतर काही काळ करिअरमध्ये विश्रांती बहुतांशवेळा महिलांचा प्रवास. आपल्या क्षेत्रात नव्याने स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची धडपड मग पुन्हा नव्याने सुरू होते. श्रद्धादेखील त्याला अपवाद नव्हत्या. परंतु, अभियांत्रिकीचे क्षेत्र आपण काही विचाराने, ध्यासाने निवडले आहे याचा विचार कधीही त्यांच्या मनातून गेला नाही. त्यातूनच प्रारंभी काही कंपन्यांमधून अनुभव मिळवत ‘कोसो वॉल्व्ज’ या जपानी कंपनीच्या नाशिक शाखेत त्यांना संधी मिळाली. मोठ्या प्रकल्पांसाठीचे प्रमुख ही यादी तशी पुरूषप्रधान. या यादीत श्रद्धा यांच्या रुपाने एका महिलेचे नाव आले आणि त्यांनी ठरलेले प्रकल्प यशस्वीपणे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास सुरुवात केली. आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत आहोत, याचा आनंद असला तरी नाण्याच्या दुसर्या बाजूला खडतर वाट प्रतीक्षेत होती.
हा प्रवास सहजसोपा नव्हता. ‘व्हाईट कॉलर’ आणि ‘ब्ल्यू कॉलर’चा प्रश्न आजही अनेक कार्यालयांमध्ये दिसून येतो. तसा प्रत्यय श्रद्धा यांनाही आला. आपल्यापेक्षा लहान वयाच्या एका महिलेकडून येणारे आदेश आम्ही का मान्य करावे, म्हणणार्या कामगारवर्गाशी जुळवून घेणे क्रमप्राप्त होते. त्यांच्या मतांचा आदर राखून सातत्याने साधलेल्या संवादातून, आपुलकी व सहयोगाच्या धोरणातून पुढे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यावसायिक नाते रूजण्यात श्रद्धांना यश मिळाले. इतकेच नव्हे, तर काही वर्षांनी श्रद्धा स्वतःच्या व्यवसायाकडे वळल्या, तेव्हा त्यांना समस्त कर्मचारीवर्गाकडून भरभरून शुभेच्छादेखील त्यांना मिळाल्या. २०२० नंतर संपूर्ण जगात ‘कोविड’मुळे सगळीच समीकरणे बदलत गेली. वेगवेगळ्या स्तरांवर लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत गेला. अनेक व्यवसाय बंद पडले. तेव्हा ‘रॉबिनहूड आर्मी’तर्फे श्रद्धा गरजवंतांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी झटत होत्या. मात्र, हे इतकेच करणे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांच्या मनात होती. ‘स्टार्टअप इंडिया’, ‘व्होकल फॉर लोकल’ची कास धरत त्यांनी घरात असलेला पेपरकप व ’कोरोगेटेड बॉक्स’ निर्मितीचा व्यवसाय जिद्दीने पुढे नेण्याचे ठरवले. केवळ दोन मशिनवर सुरू झालेल्या पेपरकप निर्मितीने अल्पावधीतच ३३ मशिनसह दिवसाला २५ लाख कप निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य केले. तेव्हा, मेहनतीला यश मिळत असल्याची श्रद्धांना खात्री पटली. पर्यावरणाला हानिकारक अशा प्लास्टिक कपला पर्याय म्हणून सुरू केलेला व्यवसाय ‘कोविड’च्या काळात अत्यावश्यक सेवेत आला आणि एक प्रकारे आपल्याला समाजासाठी काही करता आले हे समाधान देऊन गेला. ’ज्याला पार नाही असा जो तो व्यापार. आपण कोणासाठी तरी काम करण्यापेक्षा किती जणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो हा विचार आपल्या मनात हवा’, हे श्रद्धांचं ब्रीदवाक्य. त्यानुसारच पूर्वी जिथे ४० कामगार होते त्यांची संख्या वाढत आज २४० पेक्षा पुढे गेलेली आहे. इतक्या कुटुंबांसाठी आपण उदरनिर्वाहाचं साधन देऊ शकतो, हा आनंद वाटतो असंही श्रद्धा सांगतात.
अर्थात व्यवसाय करणे म्हणजे सातत्याने नवनवीन आव्हानांना सामोरे जाणे असते. मेहनतीची तयारी, चिकाटी, तडजोड न करण्याची मानसिकता, वैशिष्ट्यपूर्ण रचना, पॅकेजिंग व्यवसायातील नाशिकमधली पहिली महिला व्यावसायिक असणार्या श्रद्धा यांनी हे साधले आहे. नैतिकतेचे अधिष्ठान आपल्या संस्कारांत असतेच, त्याला नवनव्या तंत्रज्ञानाच्या जाणीवपूर्वक उपयुक्ततेची जोड, मानवी क्षमतांचा विचार, बाजारपेठेचा सखोल अभ्यास, ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्याची तयारी व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक ठरतात. महिलांमध्ये मुळातच असणारे सौंदर्यदृष्टी, संवाद कौशल्य, आर्थिक नियोजन असे अनेक गुण व्यवसायवृद्धीसाठी मदतीचे ठरतात, असं श्रद्धा आवर्जून सांगतात. अश्वारोहण, रायफल शूटिंग असे आगळेवेगळे छंद जोपासताना त्या सौंदर्य स्पर्धेत देखील सहभागी झाल्या व ‘मिसेस महाराष्ट्र’, ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरल्या. ’‘अनेक प्रेरणादायी स्त्रियांना पाहून मी माझी आजवरची वाट चालत आले आहे, आयुष्यात जेव्हा संकटं आली तेव्हा त्यांना पाहून पुन्हा लढण्याचे बळ मला मिळाले आहे. इथून पुढे एक सर्वसामान्य महिला प्रयत्नांनी किती क्षेत्र काबीज करू शकते, असा सकारात्मक विचार मी एका जरी मुलीला देऊ शकले तरी माझी मेहनत सार्थ ठरली असं मला वाटेल,” असंही त्यांना वाटतं. बॉक्स निर्मितीतून एकीकडे वस्तूंभोवती सौंदर्याची चौकट निर्माण करतानाच बंदिस्त आयुष्य न जगता स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा धडा श्रद्धा त्यांच्या जगण्यातून सहज देत जातात.