‘कोविड’ रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य : डॉ. मंगला गोमारे

08 Mar 2022 13:38:32

Red Basketball Highlight Youtube Thumbnail




मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. केसकर दि. 30 जून, 2020 रोजी निवृत्त झाल्या. नेमक्या त्याचवेळी ‘कोविड-19’चा मुंबईत प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे डॉ. केसकर यांना पुन्हा त्याच पदावर ठेवावे की नाही, याचा निर्णय होत नव्हता. अस्थिरता होती. अशा द्विधा अवस्थेत असताना अखेर डॉ. मंगला गोमारे यांची कार्यकारी वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त झाली. ‘कोविड’शी पहिल्या दिवसांपासून मानसिक, शारीरिक लढायची ताकद आपोआपच वाढत गेली आणि ती आजतागायत टिकून असल्याचे डॉ. गोमारे म्हणतात. त्या पुढे म्हणतात की, “मला स्वत:ला कोरोनाने घेरले होते. त्यावेळच्या मानसिक अवस्थेत ‘कोविड’ रुग्णांची दिवस-रात्र सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. मला वाईट याचं वाटत की, सर्वांना मदत करता आली नाही.”

मुंबईत कोरोनाचा उद्रेक दि. 10 मार्च, 2020 झाला. येत्या चार दिवसांनी या उद्रेकाला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. महामारीच्या काळात डॉ. मंगला गोमारे कार्यकारी आरोग्य अधिकारी (ईएचओ) झाले. डॉ. गोमारे यांनी दि. 1 जुलै, 2020 पासून कामाला दुप्पट वेळ दिला. प्रसंगी त्यांना कुटुंबाकडे दुर्लक्षही करावे लागले. सकाळी उठल्याउठल्या ते मध्यरात्रीनंतरही त्यांनी स्वत:ला कामात अक्षरश: झोकून दिले. रात्री 2 वाजेपर्यंत आलेल्या ‘कॉल्स’ना उत्तर देणे किंवा आपणहून फोन करणे तर अगदी त्यांच्या अंगवळणी पडले.

 
कारण, ‘कोविड’चा वेगाने प्रसार होत होता. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. ही महामारी अन्य महामारींपेक्षा भयानक होती. एकाचवेळी वैद्यकीय आणि प्रशासकीय कामांचा वेग वाढत होता. मुंबईत पुढे कसे होणार, याचा विचार सतत सतावत होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या उर्वरित मार्च, एप्रिलमध्ये झपाट्याने वाढतच गेली. तो आकडा पाच हजारांच्याजवळ पोहोचला. मग ऑक्सिजन व आयसीयु, मॅटर्निटी हॉस्पिटलमधील ‘कोविड’ रुग्ण यासह अनेक कामांची व्याप्ती वाढतच गेली.


 
याविषयी डॉ. गोमारे म्हणतात की, “सगळंच गंभीर झालं होतं. त्या वातावरणात काहीचं सुचत नसताना कोणत्याही शासकीय यंत्रणांकडून मार्गदर्शक तत्वे मिळाली नव्हती. सोईसुविधांची तर वानवा होती. खर्या अर्थाने हा माझा ‘चॅलेंज पिरीयड’ होता.” हळूहळू राज्य शासन, शासकीय आरोग्य यंत्रणा, आरोग्य मंत्री-मंत्रालय, मुंबई महापालिकेचे आयुक्त, कितीतरी ‘आयएएस’ अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील कुशल, तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्याकडून दररोज मार्गदर्शक तत्वे आणि वेगवेगळ्या सूचना मिळत होत्या. कोरोनावर नियंत्रण करायचे हे एक-दोन जणांचे काम नव्हते. त्याचवेळी अर्थपुरवठ्याचे नियोजन डॉ. गोमारे यांनी केले.



एकीकडे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि दुसरीकडे शासकीय व खासगी रुग्णालयांच्या खाटा कोरोनाच्या रुग्णांमुळे अपुर्या पडत होत्या. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमी अपुर्या पडल्या. त्यातून मार्ग काढत असतानाच, ‘डायलिसीस’ आणि गरोदर महिलांची व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न डॉ. गोमारे आणि त्यांच्या टीमला दररोज भेडसावत होता. मे महिन्यात डॉ. मंगला गोमारेही कोरोनाग्रस्त झाल्या. आठ दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले.


कोरोनाचा त्यांना फारसा त्रास झाला नसला तरी कोरोनापश्चात कमालीचा थकवा त्यांना जाणवू लागला. अशावेळी कुटुंबीयांनी, सुनेने सर्वतोपरी सेवा केल्याचे डॉ. गोमारे विशेषत्वाने नमूद करतात. त्यावेळीही त्यांना मात्र सकाळपासून ते रात्रीपर्यंत फोन घ्यावा लागत असे. त्यावेळी घर जणू ऑफिस झाल्याचे सांगत डॉ. गोमारे म्हणतात की, “मला माझ्या कुटुंबीयांचा मोठा आधार होता. विशेषत: पतींनी मला खूप खूप मदत केली. त्यांनी मला खूप सांभाळले.”


जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतसे मुंबईत कोरोनाचे भयावह रुप दिसू लागले. डॉ. गोमारे यांच्यासमवेत उपकार्यकारी आरोग्य अधिकारी यांनीही मदत केली. आरोग्य अहवाल तयार करणे, केंद्र व राज्य सरकार, मुंबई महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचना पाहणे, त्या समजून घेऊन तशी कार्यवाही करणे आणि ती कामे झाली की, आयुक्तांना व अन्य वरिष्ठ अधिकार्यांंना ‘रिपोर्टिंग’ करणे, दररोजचे अहवाल तपासणे/पाहणे, ‘कोविड’संबंधित सर्व उपचारांच्या दृष्टीने डॉक्टरांच्या नेमणूका करणे, अहवाल तयार झाल्यानंतर त्याची ‘डेटा एंट्री’ करणे व तो ‘डेटा’ संबंधितांपर्यंत पोहोचवणे, जंबो सेंटर्स उभारणे, ‘आयसीयु’, ‘व्हेंटिलेटर्स’, ‘ऑक्सिजन’, ‘कम्युनिटी’, ‘सॅनिटायझेशन’ यांची सुविधा उभारून सर्व रुग्णांवर उपचार करणे, कर्मचार्यांकरवी घराघरांत जाऊन कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेणे व त्यांच्यावर उपचार करणे या सर्व बाबी वेळोवेळी, वेळच्यावेळी डॉ. गोमारे हाताळत होत्या. त्या म्हणतात की, “गेल्या दोन वर्षांत मी एकटीने कोरोनाची लढाई केलेली नाही. रात्रंदिवस कार्यरत असलेले शिपाई, कामगार, पालिकेचे तत्कालीन आयुक्त, अन्य सर्व संबंधित अधिकारी आणि अन्य सर्वांच्या मदतीशिवाय हे यश साध्य झाले नसते. सर्वांची मी आभारी आहे.”



भालचंद्र देव
Powered By Sangraha 9.0