घर, कुटुंब, ऑफिस आणि तारेवरची कसरत...

08 Mar 2022 14:47:06

Arti Bansode
 
 
 
घर, कुटुंब की ऑफिस? अशी सतत तारेवरची कसरत महिला करत असतात. महिलांनी दैनंदिन जीवनात वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल कसा राखावा? घर आणि ऑफिस हे दोन्ही सांभाळत असता तणावमुक्त कसं जगावं? या प्रश्नांची उत्तरं देणारी समुपदेशक आरती बनसोडे यांची ही विशेष मुलाखत.
 
 
घर, कुटुंब आणि ऑफिस यांचा एकंदर समतोल महिलांनी कसा साधावा?
आज महिला जरी घराबाहेर पडून आपलं करिअर, नोकरी करत असल्या तरी कुठेतरी अजूनही आपल्यावर पुरूषप्रधान समाजाचा पगडा आहे. त्यामुळे महिलांना आपलं करिअर आणि घर-कुटुंब या दोन्ही गोष्टी सांभाळणं तितकंच महत्त्वाचे आहे. म्हणून या दोन्हींचा समन्वय साधण्यासाठी महिलांनी स्वतःच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जपण्यासोबतच वैयक्तिक छंद जोपासण्याचा समतोल राखण्यास प्राथमिकता दिली पाहिजे.
 
 
 
महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक बाबींची योग्य सांगड कशी घालावी?
महिलांनी सगळ्यात आधी हे ठरवावं की, आपल्याला प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यायचं आहे. सर्वप्रथम महिलांनी हे ठरवलं पाहिजे की, आपल्या मानसिक आरोग्यासाठी काय महत्त्वाचं आहे? जर तुम्हाला कुटुंब सांभाळून आनंद मिळत असेल, तर तुम्ही कुटुंब सांभाळा. जर तुम्हाला नोकरी सांभाळून आनंद मिळत असेल, तर नोकरी करा. त्यामुळे हे समन्वय साधण्यासाठी आपल्याला उद्या काय करायचं आहे, याची एक यादी आदल्यादिवशी रात्री प्रत्येक महिलेने तयार करावी. यामुळे उद्या काय करायचं आहे किंवा उद्याच्या दिवसाची सुरुवात आपण कशी करावी, याची कल्पना आपल्याला असते. ही यादी तयार करताना आपल्याला कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य द्यायचं आहे? किंवा कोणत्या गोष्टींमध्ये आपण ‘मल्टिटास्किंग’ करू शकतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. यासोबतच महिलांनी आपल्या काही कामांमध्ये इतरांचीही मदत घेण्यास शिकले पाहिजे. कारण, काही वेळा महिला आपल्या मुलांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास होऊ नये, म्हणून स्वतःच सर्व कामे करतात. तेव्हा असे न करता महिलांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
 
 
 
महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून स्वतःमधील कलागुणांची जोपासना नेमकी कशी करावी?
बर्‍याचवेळा स्वतःचे कलागुण जोपासण्याचा महिलांना विसर पडतो. अनेक महिलांसाठी त्यांचे कुटुंब हेच त्यांचे प्राधान्य असते. पण, कालांतराने महिलांना जाणवू लागते की, आपण स्वतःसाठी काहीच केले नाही आणि तेव्हा आपण काहीतरी करावं. मात्र, काहीवेळा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे महिला इच्छा असतानाही आपलं पाऊल पुढे टाकण्यास कचरतात. पण, अशावेळी महिलांनी जराही न घाबरता आपल्या ’कम्फर्ट झोन’मधून बाहेर येऊन आपल्यातील कलागुण जोपासायला हवे.
 
 
 
महिलांनी दैनंदिन आयुष्यातील ताणतणावावर मात करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे?
प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यासाठी या मर्यादेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच, महिलांमध्ये अनेक वयोमानापरत्वे शारीरिक बदलदेखील होत असतात. या सर्वांमध्ये महिलांना ऑफिस आणि घरातील तणावाचादेखील सामना करावा लागतो. अशावेळी कुटुंबाची भूमिकाही अधिक महत्त्वाची असते. पुरूष हे नक्कीच घराचा एक स्तंभ आहेतच. पण, संसार करताना महिला आणि पुरूष या दोघांनी समजुतीने काही गोष्टी करणे अधिक महत्त्वाचे असते. महिला आणि पुरूष या दोघांनी जर संसारात उत्तम समन्वय साधला, तर महिलांचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
 
 
 
आज जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिलावर्गाला आनंदी जीवनासाठी कोणता कानमंत्र द्याल?
मैत्रिणींनो, आयुष्य आपल्याला एकदाचं मिळतं. पुढील जन्मात आपण कुठे असू? काय असू? हे कोणालाच नाही माहिती. माणसाचं एकंदर आयुष्य हे सरासरी ७५ ते ८० असतं. त्यामुळे जी काही आपल्या आयुष्यातील वर्ष शिल्लक आहेत, ती आनंदाने जगा आणि आपल्याला हवं ते करा. आपण आपल्या आनंदासाठी, कुटुंबासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तर काही गोष्टी करत आहोतच. पण, या सर्व गोष्टींचा समतोल अशाप्रकारे साधा की, आयुष्याच्या शेवटाला आपण असं म्हटलं पाहिजे की, मी आयुष्य भरभरून जगले आणि आता असं काहीच नाहीये की, जे माझं करायचं राहून गेलंय. लोकांचा विचार न करता, जे तुम्हाला करावंसं वाटतंय ते करा. कारण, लोकं तुम्ही काही चांगलं केलंत तरी बोलणार आणि काही वाईट केलंत तरी बोलणारचं. तेव्हा लोकांचा विचार करणं सोडून देऊन आपल्याला ज्या गोष्टीमुळे समाधान मिळेल, अशा सर्व गोष्टी प्रत्येक महिलेने नक्की केल्याचं पाहिजे.
 
 - शेफाली ढवण
 
 
Powered By Sangraha 9.0