सौभाग्यापेक्षाही स्वातंत्र्यलढ्याला महत्त्व देणारी वीरांगना : नीरा आर्य

    06-Mar-2022
Total Views |

Neera Aarya
 
 
 
स्वातंत्र्यसूर्यासाठी सौभाग्याची समाप्ती करणारी वीरांगना म्हणजे नीरा आर्य. हे वीरांगने, आमच्या चामडीचे जोडे शिवून तुला घातले, तरी तुझे ऋण आम्ही फेडू शकत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबादच्या चारमिनारसमोर फुले विकून तुला जगावे लागले. तुझी झोपडी सरकारी जागेत आहे म्हणून तोडली गेली, याची आम्हाला थोडीही खंत वाटली नाही. खरंच आम्ही स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकतो का?
 
 
 
ही कथा आहे ‘त्या’ वीरांगनेची. तिला भारतीय स्वातंत्र्यलढा, त्याग, बलिदान, आत्मसमर्पण आणि देशभक्ती हे पंचतत्त्व म्हणजेच मनुष्यजीवन. आपल्या मानवी जीवनाचा श्वास तोच! त्यासाठी जगायचे, त्यासाठीच मरायचे, हे पवित्र कार्य करणारा नेता आपला ईश्वर आणि या कार्याच्या आड येणारा तो आपला शत्रू. तो नात्यांनी कितीही जवळचा असेल, रक्ताचे नाते असेल, ते माझे सौभाग्य असले, तरीही भारतमाता मुक्त करणार्‍या माझ्या प्राणप्रिय नेत्याला संपविण्याचा विचार जरी करणार असेल, तर ती कल्पनाच मला सहन होणार नाही. क्षणाचाही विचार न करता मी त्याला संपवेन. हा विचार घेऊन जगणारी वीरांगना नीरा आर्य. आम्हाला सदासर्वदा वंदनीयच असली पाहिजे, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या महान विभूतीचा त्याग दडपून टाकण्याचाच प्रयत्न केला जात असेल तर त्या घृणास्पद कृत्याचा निषेध कोणत्या शब्दांत करावा?
 
 
 
त्यावेळच्या संयुक्त प्रांतात खेकडा कसबे हे गाव.उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात आहे. तेथील सेठ छज्जूमल एक प्रतिष्ठित व्यापारी, त्यांच्या व्यापाराचे जाळे सर्व देशभर होते. त्यामुळे प्रचंड आर्थिक संपन्न असणारे कुटुंब. त्यांची मुलगी नीरा. तिचे प्राथमिक शिक्षण कोलकात्याजवळील भगवानपूर येथे झाले. त्यावेळी तिच्या मनात कायमचे घर करून राहणारे तिचे संस्कृत शिक्षक बनी घोष होते. त्यांच्या संस्कारशील राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अध्यापनशैलीने तिच्या मनात राष्ट्रप्रेमाचा संचार झाला. त्यानंतरचे तिचे सर्व शिक्षण कोलकाता येथे झाले, जे शहर क्रांतिकारकांचे तीर्थक्षेत्र होते.अध्यापन करीत असताना क्रमित अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन हिंदी-इंग्रजी-बंगाली सोबतच अन्य भाषेवर प्रभुत्व नीराने मिळविले. भारतमाता मुक्तीच्या स्वप्नरंजनात रमणारी ही कन्या ते स्वप्न वास्तवात आणणार्‍या नेतृत्वाची प्रतिक्षाच करीत होती. कोलकाता शहरातच शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्य असल्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट घेणे तिला शक्य झाले आणि ती खूप भारावून गेली. हे नेतृत्वच भारतमातेच्या शृंखला तोडेल यावर तिचा दृढ विश्वास बसला. लगेच आझाद हिंद सेनेत सहभागी होऊन एका समर्पित जीवनाला तिने सुरुवात केली.
 
 
 
पण दुर्दैव असे की, ज्या व्यक्तीसोबत विवाहबंधनात अडकावे लागले, ती व्यक्ती ‘सीआयडी’ ऑफिसर श्रीकांत जयरंजन ब्रिटिशांचे जासूस म्हणून काम करीत होती. दोन टोकांच्या दोन दुधारी तलवारी एका म्यानात राहणार कशा? श्रीकांतवर जबाबदारी सोपविली होती, सुभाषचंद्र यांना संपविण्यासाठी हेरगिरी करणे आणि संधी मिळताच त्यांना गोळ्या घालणे, त्याच्या मनात कोणत्याही राष्ट्रनिष्ठा नव्हत्या. ब्रिटिशांची चाटुगिरी करून पद, पैसा, प्रतिष्ठा मिळविणे व साम्राज्यशाहीचा हितचिंतक म्हणून समर्पित जीवन जगणे. गोर्‍या माकडांना देव समजून तिथे साष्टांग दंडवत घालणे हीच त्याची नीतिमत्ता. त्याच्या विचारांविषयी नीराच्या मनात घृणा निर्माण होऊ लागली. श्रीकांतला संधी मिळताच त्याने नेताजींवर गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला. हा प्रसंग नीराच्या डोळ्यांसमोर घडत होता. तिच्या जवळ संगिनी होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तिने श्रीकांतच्या पोटात संगिनी खुपसून त्याला यमसदनी पाठविले. स्वातंत्र्यसूर्यासाठी सौभाग्याची समाप्ती करणारी वीरांगना. हे वीरांगने, आमच्या चामडीचे जोडे शिवून तुला घातले, तरी तुझे ऋण आम्ही फेडू शकत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबादच्या चारमिनारसमोर फुले विकून तुला जगावे लागले. तुझी झोपडी सरकारी जागेत आहे म्हणून तोडली गेली, याची आम्हाला थोडीही खंत वाटली नाही. खरंच आम्ही स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकतो का?
 
 
 
स्वातंत्र्यानंतर नीराने आपल्या आत्मकथेत स्वातंत्र्यलढ्यातील काळीज पिळवटून जावेत, असे प्रसंग सांगितले आहेत. मला पकडल्यावर सुरुवातीला कोलकाता येथील कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर अंदमान येथील सेल्युलर कारागृहात माझी रवानगी करण्यात आली. तिथे एका कोठडीत बंद करण्यात आले. त्या ठिकाणी अंथरूण पांघरून काहीच नव्हते. ते मागण्याचे धाडसही मी करू शकत नव्हते. मनात एका विचाराने थैमान घातले होते. इथे एवढ्या दूर अज्ञात बेटावर बंद कोठडीत राहून आम्हाला स्वातंत्र्य कसे मिळणार? या विचारातच थोड्या वेळात अतिथकव्याने जमिनीवर कशी झोप लागली, काहीच समजले नाही. रात्री १२च्या सुमारास एक पहारेकरी काहीही न बोलता येऊन दरवाजाच्या फटीतून चटई व ब्लँकेट टाकून निघून गेला. त्या आवाजामुळे खाडकन जागे झाले. झोपमोड झाल्यामुळे अस्वस्थ झाले, पण अंथरूण पांघरूण मिळाले, याचा आनंद होता. हातापायात हातकड्या होत्याच. सकाळी जेवणात खिचडी मिळाली. त्यानंतर एक लोहार आला. त्याने हातकडी काढताना जाणीवपूर्वक हाताला जखम केली. पायातील बेडी काढताना तीन वेळेस मुद्दामच हातोडा मारला. असह्य वेदना झाल्या. मी विव्हळून म्हणाले, “आंधळा आहेस का? पायावर मारतोस!” तो कुत्सितपणे हसून म्हणाला, “पायावरच काय, आम्ही कुठेही मारू शकतो! काय करणार आहेस?” मी मनाशीच पुटपुटले, “खरंच मी काय करू शकते? मी इथे फक्त एक कैदी आहे.“ पण मला हे सर्व असह्य झाले होते. मनातून खूप चीड आली. त्यानंतर मी त्याच्या तोंडावर थुंकले आणि म्हणाले, “महिलांचा सन्मान करायला शिका.” जेलर सोबतच होता. तो म्हणाला, “सुभाषचंद्रांचा पत्ता सांगितला तर तुला सोडले जाईल.” मी म्हणाले, “त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, हे सर्व जगाला माहीत आहे.” तो रागाने पाहत ओरडला, “खोटं बोलतेस तू. ते जीवंत आहेत. सांग कुठे आहेत ते?” मी छातीवर हात ठेवून उत्तर दिले, “ते माझ्या अंतःकरणात आहेत.” माझे उत्तर ऐकून तो गोरा लालबुंद झाला आणि म्हणाला, “नेताजीला तुझ्या अंत:करणातून आम्ही बाहेर काढू!” लगेच त्याने माझ्या छातीवर हात टाकला. त्या नराधमांनी माझ्या छातीवरील वस्त्र फाडून लगेच लोहाराला संकेत दिले.
 
 
 
लोहाराने त्याच्याजवळील ‘ब्रेस्ट रिपर’ (झाडाची पाने छाटण्याचे लोखंडी अवजार) उचललेआणि माझ्या डाव्या स्तनावर ठेवून स्तन कापण्याचा प्रयत्न केला. त्याला धार नसल्यामुळे तो त्याच्या कामात यशस्वी होऊ शकला नाही. पण त्या नराधमांच्या हातांनी माझ्या स्तनाला असह्य पीडा दिल्या. या मानवी जगातून मानवतेचा अंत झाल्याचा अनुभव मी घेत होते. त्याचवेळी जेलर माझी मान पकडून त्वेषाने ओरडला, “जर आता काही बोललीस तर तुझे दोन्ही स्तन छातीपासून वेगळे केले जातील!” त्याने एक लोखंडी चिमटा माझ्या नाकावर मारला आणि म्हणाला, “आभार मान आमच्या महाराणी व्हिक्टोरियाचे, याला अग्नीत तापविले नाही. तापविले असते तर तुझे दोन्ही स्तन मुळासह काढून टाकले असते.” असंख्य पीडा भोगणारी नीरा आर्य ही नेताजींची पहिली महिला हेर. नेताजींसाठी आपले सौभाग्य पणाला लावणार्‍या या वीरांगनेला नेताजी प्रेमाने नागीण म्हणत असत.
 
 
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या दुर्भागी वीरांगनेला ५१ वर्षांचे आयुष्य लाभले, स्वातंत्र्यामधील दुःख पचविण्यासाठी. वृद्धावस्थेत व्याधीग्रस्त होऊन २६ जुलै, १९9८ ला या जगाचा त्यांनी निरोप घेतला आणि सर्व पीडांमधून मुक्ती मिळविली. त्या महान वीरांगनेचा अंत्यसंस्कार वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन आणि दै. ‘स्वतंत्र वार्ता’चे पत्रकार तेजपाल सिंह धामा यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन केला. ज्या क्रांतिकारकांच्या त्यागाने व पराक्रमाने इंग्रज सरकारला घाम फुटत होता, त्यांचा इतिहास असाच दडपून टाकण्यात आला.आमच्या मनावर बिंबविले गेले की, रक्ताचा एक थेंबही न सांडता आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. लाखो क्रांतिकारकांच्या बलिदानाशी केलेली ही बेईमानी काळ कुठपर्यंत सहन करणार? शेवटी नियतीजवळ न्याय असतोच. तेव्हा आपल्या पापासह पूर्वजांच्या पापाचाही हिशोब द्यावा लागतो.
 
 
 - प्रा. वसंत गिरी
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.