...अखेर शरदराव पवार बोलले!

31 Mar 2022 11:08:07

sharad pawar
 
 
 
शरदराव पवार यांना ‘द काश्मीर फाईल्स’ने जे सत्य प्रकाशात आणले, ते आवडलेले नाही. सत्य असेच दाहक असते. ते पचवायला आणि स्वीकारायला प्रचंड धाडस लागते.
 
 
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या तुफान चर्चेचा विषय झालेला आहे, अशा वेळी शरद पवार अजून या विषयावर का बोलत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. शरद पवार यांनाही ते समजले असावे म्हणून त्यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत जाहीरपणे मांडले. ते असे- “काही लोकांनी एक मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला. त्यावर एक चित्रपट आलाय. या चित्रपटातून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिलं गेलं. शिवाय समाजासमाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली. जेव्हा समाजात विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल. तो चित्रपट अतिशय चांगला आहे, बघितला पाहिजे, असं जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील, तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी?” शरद पवार यांच्या वक्तव्याची थोडी चिकित्सा करूया. वक्तव्यातील महत्त्वाची वाक्य अशी-
 
> काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला.
> या चित्रपटातून मनं जोडण्याऐवजी मनं विचलित कशी होतील, हे पाहिलं गेलं.
> समाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल, या प्रकारची मांडणी करण्यात आली.
> चित्रपट चांगला आहे, बघितला पाहिजे, असं जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील,तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी? असे सगळे प्रश्न उपस्थित होतात.
 
 
शरद पवार काश्मीरमधून हिंदू निर्वासित झालेत, असे म्हणत नाहीत. ‘काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला,’ असे म्हणतात. तो का निघून गेला, हे शरद पवार सांगत नाहीत. काश्मीरमधील तेव्हाच्या आणि आताच्याही जिहादी दहशतवादाविषयी शरद पवार काही बोलत नाहीत. त्यांचा राग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे. पंतप्रधानांनी केवळ प्रशंसा केली नाही, तर हा चित्रपट अनेकांनी बघावा, असे आवाहन केले. नेहमी व्यक्तिस्वातंत्र्याविषयी गळा काढणारे आता गप्प बसलेले आहेत, यावरदेखील पंतप्रधानांनी भाष्य केले होते. शरदराव पवारांना यातील काहीही आवडलेले नाही.
 
शरद पवारांनी सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी आणि ठेवायची कशी, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘सामाजिक एकवाक्यता’ हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्याबद्दलची चिंता शरद पवार यांनी व्यक्त करावी यात गैर काही नाही. तसेच ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आपले वेगळे मत प्रकट करणे हेदेखील गैर नाही. पंतप्रधान यांच्या विधानावर आक्षेप घेणे यातही काही चुकले असे नाही. परंतु, प्रश्न त्यापेक्षाही अधिक गंभीर आणि महत्त्वाचा आहे.
 
शरद पवार यांनी अलिबागच्या बैठकीत ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला होता. या देशात केवळ मुस्लीमच दहशतवादी आहेत असे नाही, दहशतवादी हिंदूदेखील आहेत, हे त्यांनी त्यावेळी मांडले. त्यांच्या या वक्तव्याला २५ वर्षांहून अधिक काळ लोटला असेल, यानंतर प्रज्ञा ठाकूर, पुरोहित आदी लोकांना अटक झालेली आहे आणि त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप ठेवण्यात आले. हेमंत करकरे यांनी प्रज्ञा ठाकूर यांचा भरपूर छळ केला. ते शरदराव पवार यांचे निकटवर्ती मानले जात, असे शरद पवार तेव्हा काश्मिरी पंडितांच्या म्हणजे हिंदूंच्या पलायनाबद्दल चकार शब्दही बोलत नव्हते. आजही ते एवढेच म्हणतात की, “काश्मीरमधून एक गट बाहेर गेला.” ‘हिंदू आपल्या देशातच निर्वासित झाला,’ असे ते म्हणत नाहीत.
 
सामाजिक एकवाक्यतेची चिंता ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करून व्यक्त होत नाही. यामुळे जे या देशाचे मालक आहेत, ते हिंदू, आपल्याच देशात दहशतवादी ठरविले जातात. त्यांनी प्रतिकार करता कामा नये, असाही त्याचा एक अर्थ होऊ शकतो. सामजिक एकवाक्यतेची जबाबदारी सर्व समाजाची आहे. शरद पवार यांच्या भाषेत सांगायचे, तर अल्पसंख्याक मुसलमानांची ही खूप मोठी जबाबदारी आहे. काश्मीरमधील हिंदूच्या हत्येविरूद्ध मुंबईत किंवा महाराष्ट्रात मुस्लीम समाजाने मोर्चा काढल्याची बातमी कधी आली नाही. कोणत्याही मुल्ला किंवा मौलवीने काश्मिरी हिंदूंची हत्या करणार्या विरूद्ध फतवा काढलेला नाही. सामाजिक एकवाक्यता म्हणजे कोणाचे ऐक्य?
 
शरदराव पवार केवळ ‘सामाजिक एकवाक्यता’ असा शब्दप्रयोग करतात, त्यांना हिंदू आणि मुस्लीम यांचे ऐक्य अभिप्रेत आहे. हे ऐक्य जर व्हायचे असेल, तर सर्वात मोठी जबाबदारी मुस्लीम समाजावर, त्यांच्या धर्मगुरुंवर आणि त्यांच्या राजकीय नेत्यांवर येते. या सर्व लोकांनी सामाजिक ऐक्य राखायचे असेल, तर सक्रिय भूमिका घ्यायला पाहिजे. जिहादी दहशतवादाचा निषेध केला पाहिजे. ‘लव जिहाद’ बंद केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होईल, त्या त्या ठिकाणी अत्याचर करणार्यांचा निषेध केला पाहिजे. नुकतेच बंगालमध्ये सात जणांना जीवंत जाळले गेले, म्हणजे गोद्राकांडाची छोटी आवृत्ती झाली. त्याचा निषेध केला पाहिजे. शरदराव पवारांनी मुल्ला आणि मौलवींना घेऊन त्यांचे नेतृत्त्व केले पाहिजे आणि निषेधाचे पत्रक काढले पाहिजे. सामाजिक एकवाक्यातेची ही सर्वात महान सेवा ठरेल.
 
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने फक्त सत्य समोर आणलेले आहे. या चित्रपटाने काश्मीरमधील हिंदूंना कसे वेचून वेचून ठार केले, याच्या सत्यकथा दिल्या आहेत. काश्मीरमधील हिंदूंना दुकानातून धान्य घेण्यास मुस्लीम महिला कशा विरोध करीत होत्या, याचे सत्यचित्रण केले आहे. दहशतवाद्यांना पोलीस आणि प्रशासन कसे साहाय्य करीत होते, हे सत्य विदारकपणे दाखविले आहे. दहशतवाद्यांनी लहान मुलांपासून ते स्त्रियांपर्यंत सर्वांच्या कशा निर्दय हत्या केल्या, हे सत्य चित्रपटाने पुढे आणले आहे. सत्य झाकून ठेवून प्रेम निर्माण होत नाही आणि सत्य उघड केल्याने द्वेष निर्माण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे पोट फाडले, हे सत्य सांगितल्यामुळे द्वेषभावना निर्माण होत नाही. दुष्ट प्रवृत्तीचा नरराक्षस मेला याचा आनंद होतो.
 
 
शरदराव पवार यांना ‘द काश्मीर फाईल्स’ने जे सत्य प्रकाशात आणले, ते आवडलेले नाही. सत्य असेच दाहक असते. ते पचवायला आणि स्वीकारायला प्रचंड धाडस लागते. ‘सत्यमेव जयते’, हे आपले ब्रीदवाक्य आहे. सत्याचाच विजय होतो. महात्मा गांधीजींनी सत्यालाच परमेश्वर मानले आणि त्या सत्याची साधना ते करीत राहिले. ‘द काश्मीर फाईल्स’ने जर काही केले असेल, तर १९९०चे सत्य चित्रपटाच्या माध्यमातून सत्य घटनांच्या आधारे जनतेपुढे आणलेले आहे. हे सत्य हादरून टाकणारे आहे. डोळ्यात अंजन घालणारे आहे, अतिशय अस्वस्थ करणारे आहे आणि त्यापेक्षा जबरदस्त विचारप्रवृत्त करणारे आहे.
 
 
‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करणार्यांना हे सत्य पचनी पडणे कठीणच आहे. अनेकांनी त्यातून राजकारण करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते, त्याला भाजपचा पाठिंबा होता. जगमोहन तेव्हा काश्मीरचे राज्यपाल होते वगैरे वगैरे मुद्दे पुढे आणले गेले आहेत. हे सर्व तकलादू मुद्दे आहेत. सत्तेच्या सर्व निर्णायक चाव्या व्ही. पी. सिंगाच्या हातात होत्या, काश्मीरच्या अब्दुल्ला सरकारच्या हातात होत्या. जगमोहन काहीही करू शकत नव्हते. त्यांनी आपली हतबलता ‘माय फ्रोझन टरबुलेन्स’ या आत्मकथनात व्यक्त केलेली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ येण्यापूर्वीच सुमारे २५ वर्षे अगोदर हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
 
या देशाचे ऐक्य राखण्याची अंतिम जबाबदारी हिंदू समाजावर आहे. तो जेवढा संघटित आणि सामर्थ्यसंपन्न होईल, तेवढे सामाजिक ऐक्य बळकट होईल. त्याची संघटित अवस्था सामजिक स्तरावर, राजकीय स्तरावर, सांस्कृतिक स्तरावर आणि आर्थिक स्तरावर असायलाच पाहिजे. त्याचे सामाजिक मन एक झाले पाहिजे. जातीपाती अस्पृश्यतेच्या पलीकडे जाऊन ‘माझी ओळख फक्त हिंदू आहे,’ ही भावना तो जगला पाहिजे. त्याची राजकीय बुद्धी घनीभूत असली पाहिजे. जो हिंदू हिताचा विचार करील तो सत्तेवर येईल, हा त्याचा संकल्प असला पाहिजे. त्याच्या राजकीय इच्छाशक्तीचे आणि मतांचे घातक विभाजन होता कामा नये. राजकीय मतांचे जातीय विभाजन, भाषिक विभाजन, आणि उपासना पंथीय विभाजन हिंदू समाजाला स्मशानभूमीकडे घेऊन जाणारे ठरेल.
 
‘द काश्मीर फाईल्स’ने सामाजिक ऐक्य राखण्याचा कोणताही प्रत्यक्ष संदेश दिलेला नाही. तो या चित्रपटाचा विषयदेखील नाही. परंतु, जो विचार करतो, त्याला मात्र या चित्रपटाने आपल्या अस्तित्त्वारक्षणासाठी काय केले पाहिजे, याचे भान दिले आहे आणि त्यासाठी सामाजिक एकवाक्यता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, हे चित्रपटाने न सांगता पाहणार्याच्या मनात बिंबविले आहे. जे या देशाचा विचार हिंदू, मुसलमान, बौद्ध, जैन, शीख अशा धर्मगटात करतात, त्यांना हे वाटणारच की चित्रपटाने द्वेषभावना निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांना सामाजिक ऐक्य भावनेविषयीपेक्षा मतऐक्य याची चिंता अधिक असते. शेवटी कोणी कसा विचार करायचा आणि चित्रपटातून काय घ्यायचे, हे ज्याच्या-त्याच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर अवलंबून आहे. शरदराव पवारांनी त्यांच्या भूमिकेतून चित्रपटाविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे. या मताचा आपण स्वीकार करीत नसलो तरी आदर करूया.
 
 
Powered By Sangraha 9.0