सापळ्यात अडकून पाय तुटलेल्या बिबट्याचा विरारमधून बचाव

30 Mar 2022 12:43:48

Maha MTB





मुंबई -
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या रेस्क्यू टीमने विरारामधून जखमी बिबट्याचा बचाव केला आहे. हा बिबट्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात अडकून जखमी झाला होता. त्यामुळे लंगडत असलेल्या या बिबट्याला जेरबंद करुन बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरार येथील कोपर गावात बिबट्याचा वावर होता. या गावात पहिल्यांदाच बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र, हा बिबट्या लंगडत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी या संदर्भातील माहिती वन विभागाला दिली. दरम्यान सोमवारी नागरी वसाहतीच्या नजीक जखमी बिबट्याचे दर्शन झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले. कॅमेरा ट्रॅपमध्ये जखमी बिबट्याचे छायाचित्र कैद झाल्यावर त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले.


त्यासाठी मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे बिबट्या बचाव पथक कोपर गावात दाखल झाले. त्यांनी त्याठिकाणी पिंजरे लावले. सरतेशवेटी बुधवारी पहाटे हा बिबट्या पिजंराबंद झाला. डुकराच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात हा बिबट्या अडकल्याची शक्यता वनधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सापळ्यातून सुटका करुन घेण्यासाठी त्याने प्रयत्न केले. मात्र, तार त्याच्या पायाला अडकून राहिली आणि त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर जखम झाल्याची माहिती बिबट्या बचाव पथकाचे प्रमुख आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी दिली. या बिबट्याला बिबट्या बचाव दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बचाव कार्यामध्ये 'सर्प' या वन्यजीव बचाव संस्थेने वन विभागाची मदत केली.
Powered By Sangraha 9.0