देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत बदल घडविणार!

29 Mar 2022 13:03:49
 
prasad lad
 
 
मुंबई : “राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत बदल घडविणार,” असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान व्यक्त केला. त्यांच्याशी केलेली ही खास बातचित...
 
विधान परिषदेच्या आपल्या कार्यकाळातील कामाचा अनुभव कसा होता?
 
विधान परिषद सभागृहात कामकाजाचा अनुभव अतिशय उत्तम होता. संपूर्ण कार्यकाळात कधीही वाटले नाही की, ही माझी पहिलीच ‘टर्म’ आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खूप शिकायला मिळाले. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांच्याबरोबर मुख्य प्रतोद म्हणून काम करताना, विरोधी पक्ष म्हणून काम करतानाचा अनुभव भारावून सोडणारा होता. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधात काम करताना आक्रमकतेची आवश्यकता अधिक असावी लागते. सत्ताधार्‍यांच्या चुका निदर्शनास आणून देणे, 13 आयुधांचा वापर करून सत्ताधार्‍यांना घेरायचे कसे, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे, आदी सर्वांचा अनुभव हा उत्तम होता. मी देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे, त्यांनी मला ही संधी दिली.
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरील कारवाईबाबत आपले मत काय?
 
आम्ही दरेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दरेकर २००९ साली संचालक मंडळावर आले. 2012-13 साली अध्यक्ष झाले. २०२१ पर्यंत ते सलग अध्यक्ष होते. दरेकर अध्यक्ष झाले तेव्हा बँक 1200 ते 1250 कोटींची होती. आज जेव्हा त्यांनी अध्यक्षपद सोडले तेव्हा बँक दहा हजार कोटींच्या घरात आहे. माझे सरकारला आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, जर एखादा माणूस संस्थेत भ्रष्टाचार करत असेल तर ती संस्था कधीही मोठी होत नाही. मग, १२०० कोटींची बँक दहा हजार कोटींची झाली कशी? याचा नफा 15 कोटी आणि भ्रष्टाचार दोन हजार कोटी झाला, असे म्हणणे हे धादांत खोटे आहे. दरेकर विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेते आणि सरकारवर केलेले हल्ले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ‘फेल्युअर’ त्यांनी सातत्याने मांडले म्हणूनच ही कारवाई होते आहे. माझ्याबाबतीतही हा प्रयत्न झाला आहे. परंतु, आम्ही न्यायालयीन मार्गाने लढायला तयार आहोत.
 
राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत काय सांगाल?
 
एसटी कर्मचार्‍यांच्या बाबतीत हे सरकार निषंढ झाले आहे. १०० एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली याचे सरकारला दुःख नाही. न्यायालयाच्या माध्यमातून एसटी कर्मचार्‍यांना न्याय मिळणे बाकी आहे. हे सरकार शेतकरी, गिरणी कामगार, एसटी कर्मचारी, ‘कोविड’ काळातील भ्रष्टाचार आदी प्रश्नांवर उत्तर देण्यात ‘फेल’ गेले. मुंबई महापालिका, ‘कोरोना सेंटर’ गैरव्यवहार, मिठी नदीचा भ्रष्टचार, मेट्रोच्या कामांमध्ये अनियमितता आदींमुळे ‘महा’भ्रष्टाचाराचे महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीची यांची प्रतिमा झाली आहे. अर्थसंकल्पात पर्यटनाला १२००कोटी. मात्र, त्यातील ८०० कोटी हे बारामतीला. त्यामुळे हा अर्थसंकल्प नेमका काय आहे, हे स्वतः अर्थमंत्र्यांनाच माहिती.
 
यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईबाबत आपली भूमिका काय?
 
यशवंत जाधव जर म्हणत असतील की, ‘मातोश्री’ म्हणजे माझी आई तर त्यांनी हे दान कुठे केले काय केले, याचेही उत्तर द्यावे. याच्या पावत्या असतात. त्या यशवंत जाधवांनी आता दाखवाव्यात. दोन कोटी दान करण्याइतपत यशवंत जाधव दानशूर नाहीत. ५० लाखांचे घड्याळ काय आईला घालायला दिले? ‘झूठ बोल पण, नीट बोल.’ यशवंत जाधवांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही हे प्रकरण बाहेर येणारच आहे. यशवंत जाधवांचा ‘आका’ कोण? तो ‘मातोश्री’त बसलाय की ‘पिताश्री’मध्ये बसला आहे, हे लवकरच जनतेसमोर येईल. यशवंत जाधवांबरोबर आणखीही काही नावे समोर येतील. त्यांच्यावरही कारवाई होईल. सर्व गैरव्यवहारांची उत्तरे द्यावी लागणार.
 
मुंबईच्या विकासासाठी भाजपचे ‘व्हिजन’ काय?
 
भाजप मुंबईत बदल घडवणार हे निश्चित आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, भाजपच्या निवडणूक संचालन समितीचे प्रमुख आमदार अ‍ॅड. आशिष शेलार आणि मुंबई महापालिका निवडणुकांसाठी असणार्‍या ‘कोअर टीम’ने ठरवले आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही बदल घडविणार. बकाल झालेली मुंबई, लुटली गेलेली मुंबई, भ्रष्टाचाराने बरबटलेली मुंबई आणि स्वतःला मराठी माणसाचे नेतृत्व समजणारी शिवसेना, यांना मी उत्तर देऊ इच्छितो. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. ज्यावेळेस शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तेव्हाच मुंबईतील मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी संपला आहे. मुंबईतील जनतेला आता पर्याय हवा आहे. एक चांगले नेतृत्व हवे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच ते मुंबईला मिळेल. हिंदुत्वाचे रक्षण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा खांद्यावर घेण्याचे काम आता भाजपने केले आहे. मुंबईतील हिंदूंचे संरक्षण, मुंबईचा विकास आणि पारदर्शकपणे मुंबईला उंचीवर नेण्याचे काम भाजप करेल
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0