राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच विधिमंडळाच्या अधिवेशनात एक घोषणा केली आणि अवघ्या काही तासांमध्ये त्याचे पडसाद मुंबईत उमटले. मुंबईच्या सोनेरी इतिहासातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, आव्हाड यांच्या या घोषणेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. बीडीडी चाळींतील डिलाईल रोड भागातील इमारतींना राज्यसभा खासदार आणि (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार नगर’ नाव देण्याचे आव्हाड यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. त्यासोबतच वरळीतील इमारतींना ‘बाळासाहेब ठाकरे नगर’ आणि नायगावमधीलइमारतींना माजी पंतप्रधान राजीव गांधींचे नाव देण्याचाही निर्णय आव्हाड यांनी जाहीर करून टाकला आहे. बीडीडीमधील काही इमारतींच्या कामाला आता सुरुवात होते आहे आणि काहींचे विषयच अजून निकाली निघालेले नाहीत. मुळात जे बाळ जन्मालाच आलेले नाही, त्याचे नामकरण सोहळे करण्याची इतकी अतितत्परता महाविकास आघाडी सरकार का दाखवतंय, याचे उत्तर मुंबईकरांना मिळणे आवश्यक आहे. मुंबईत (न)झालेला तेरावा बॉम्बस्फोट, साखळी बॉम्बस्फोटानंतर पवारांनी दाखवलेली सक्रियता किंवा ‘हज हाऊस’ची हट्टाने केलेली बांधणी, यांसारख्या काही मोजक्या गोष्टी सोडता पवारांचा जीव हा सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातच रमला, हे महाराष्ट्राला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी जे काही केले, त्या कर्जातून उतराई होण्यासाठी त्यांचे नाव देणे स्विकार्ह बाब आहे. पण, पवारांचे नाव नक्की का द्यायचे आहे? तसेच मोदींचे नाव एखाद्या स्टेडियमला दिले, तर त्यावर शंख करणार्यांना मात्र शरद पवारांचेही नाव बीकेसीतील एमसीए मैदानाला दिल्याचा सपशेल विसर पडतो. तेव्हा, एकूणच काय तर लवासा आणि पवार ही नावं आपसूकच जोडीने घेतली जातात, तसाच काहीसा प्रकार बीडीडी आणि पवार याही बाबतीत करण्याचा प्रयत्न तर आव्हाड आपल्या अफाट आणि अचाट डोक्याचा वापर करून करत नाहीत ना? असा सवाल उपस्थित होणे या ठिकाणी क्रमप्राप्त आहे.
आता आतुरता महायुद्धाची!
राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची जणू काळी कहाणीच विधिमंडळात वाचून दाखवली. महापालिकेतील शिवसेनेची भूमिका, शिवसेनेच्या सत्तेतून निर्माण झालेले काही मोजक्या घटकांचे जाळे, त्या जाळ्यातून केले जाणारे संशयास्पद व्यवहार आणि त्यामुळे बाहेर निघणारी भ्रष्टाचाराचीही प्रकरणे या सर्व बाबींचा उल्लेख नेमक्या आणि अचूक शब्दांमध्ये फडणवीसांनी विधानसभेत केला. महापालिकेशी मुळात ज्या प्रकरणांची मागील कित्येक वर्षांपासून कधी दबक्या आवाजात चर्चा व्हायची आणि कधी ती प्रकाराने दाबली जायची, ती सर्व काळी कृत्ये फडणवीसांनी विधानसभेच्या रेकॉर्डवर आणून एकप्रकारे त्या आरोपांना इतिहासाच्या पानांमध्ये कायस्वरूपी नोंदवून ठेवले. विधिमंडळाच्या अधिवेशनात मुंबई महापालिकेशी संबंधित विषयांवरून रणकंदन माजल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे लागले आहे. २०१७ सालच्या मनपा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत झालेल्या संघर्षाची आठवण आजही कायम आहे. तत्कालीन राजकीय समीकरणांमुळे भाजपला महापालिका सोडावी लागली होती. मात्र, आज परिस्थिती भिन्न आणि अगदीच टोकाची आहे. शिवसेना सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली आहे आणि त्यामुळे शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप लागलेलाच आहे. त्यातच शिवसेना नेत्यांच्या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे राजकीय वातावरणात नवा ट्विस्ट आला आहे. या सगळ्या राजकीय संघर्षाची खरी मजा येईल ती येत्या महापालिका निवडणुकीत. मागील २५ वर्षांत झालेल्या घोटाळ्यांमुळे डागाळलेली शिवसेनेची प्रतिमा, मुंबईकरांना कोरोनाकाळात भोगाव्या लागलेल्या यातना, भ्रष्टाचाराने बरबटलेले सेना नेते आणि भाजपच्या आक्रमक अभ्यासू पवित्र्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे, हे स्पष्ट आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यांत मिळालेल्या बहुमतामुळे भाजपचा आत्मविश्वास प्रचंड दुणावलेला आहे. मुंबई महापालिका हा शिवसेनेसोबतच भाजपसाठीदेखील तितकाच प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे, त्यामुळे ‘बीएमसी’चा हा किल्ला सर करण्यासाठी दोन्ही पक्ष संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार, हे नक्की आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या महायुद्धाची प्रचंड आतुरता राजकीय पक्षांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे.