प्रा. वसंत कानेटकर - एक अथांग डोह

    19-Mar-2022
Total Views |

Vasant kanetkar
 
 
 
मराठीतील प्रख्यात नाटककार, साहित्यिक आणि विचारवंत प्रा. वसंत कानेटकर (जन्म १९२२) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज दि. २० मार्च रोजी होत आहे. त्यानिमित्ताने प्रा. वसंत कानेटकरांच्या जीवनातील विविध पैलूंचे पदर अलगद उलगडणारा हा लेख...
 
 
 
साठोत्तरी कालखंडात ज्यांच्या कीर्तीचा आणि रसिकप्रियतेचा वेलु गगनावरी पोहोचला, असा एकमेव नाटककार म्हणजे प्रा. वसंत कानेटकर. ते आले आणि त्यांच्यासोबत मराठी नाट्यसृष्टीतही वसंताचे आगमन झाले. त्यामुळे मराठी रंगभभूमी मोहरली, फुलली, गंधित झाली. दोन-पाच वर्षे नव्हे, तर जवळपास अर्धशतक (इ. स. १९५७ ते २००१) मराठी रंगभूमीवर वसंतरावांचीच अधिसत्ता होती. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमीचे अनिभिषिक्त सम्राट’ असे जर त्यांचे वर्णन केले, तर ते यथार्थच ठरेल. ‘वेड्याचं घर उन्हात’ (१९५७), ‘तू तर चाफेकळी’ (१९९६) हा त्यांच्या नाट्यलेखनाचा वरवर जाणारा आलेख न्याहळला तरी हे वर्णन किती उचित आहे, याचाच प्रत्यय येईल. शिवशाहीवरील कानेटकरांचे ऐतिहासिक नाट्यपंचक केवळ अप्रतिम! त्यातील ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाने तर इतिहास निर्माण केला. ‘हिमालयाची सावली’, ‘विषवृक्षाची छाया’ या चरित्रप्रधान नाटकातून ‘कर्मयोगी शोकात्मिकेचा’ एक वेगळाच बाज मराठीत प्रथमतः आणला. ‘सं. मत्स्यगंधा’, ‘सं. मीरामधुरा’,‘लेकुरे उदंड जाहली’ यांसारखीच संगीत नाटके लिहून एक वेगळी भूमिका त्यांनी पार पाडली. एकूणच परंपरा आणि नवता यांचा सुरेख मेळ साधून कानेटकरांनी आपली नाटके लिहिलेली आहेत.
 
 
 
गुरूवर्य भाऊसाहेब खांडेकरांचा प्रभाव
वसंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकरांचा खूप प्रभाव आहे. त्यांच्यावर भाऊसाहेबांचे जे संस्कर झाले, ते जाणत्या वयात. वसंतराव त्यावेळी सांगलीच्या विलिंम्डन महाविद्यालयात शिकत होते. १९४० साली कवी गिरीशांची (वसंतरांवाचे वडील) सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. याच सुमारास शिरोडे (कोकणातील) सोडून भाऊसाहेब कोल्हापूरास वास्तव्यास आले होते. कवी गिरीश व भाऊसाहेब यांचे दृढ स्नेहबंध. त्यामुळे वसंतराव सांगलीहून कोल्हापूरास जात तेव्हा त्यांचा मुक्काम भाऊसाहेबांकडेच असे. मग भाऊसाहेबांसमवेत सकाळची न्याहरी, दुपारचे भोजन गप्पाटप्पा, सायंकाळचे फिरणे... सारे सारे घडायचे. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशी अवस्था. पुस्तकाचे वाचन कसे करायचे, त्याचे चिंतन कसे कसे करायचे, हे वसंतरावांना भाऊसाहेबांनी शिकविले. “बसा मागल्या खेपेला तुम्ही चेकाव्हच्या गोष्टी वाचल्यात. आता ही इब्सेनची नाटके वाचा.” भाऊसाहेबांचा असा आदेश झाला की,वसंतराव दिवसभर पुस्तक वाचनात आणि भाऊसाहेब लेखन-समाधी लावून बसत. मग संध्याकाळी बाहेर फिरायला जात. त्यावेळी भाऊसाहेब वाचायला दिलेल्या पुस्तकांचा विषय काढीत. त्या साहित्यकृतीचे सौंदर्य आणि सामर्थ्य उलगडून दाखवित असत. इब्सेन, टॉलस्टाय, गॉर्की, चेकाव्ह, डोस्टोव्हॅस्की, झ्वाइंग यांच्यासारख्या श्रेष्ठ पाश्चात्त्य लेखकांचा परिचय वसंतरावांना झाला, तो भाऊसाहेबांच्या घरात. एवढेच नव्हे, तर केशवसुत, बालकवी, तांबे, गडकरी, हरिभाऊ आपटे, देवल, खाडिलकर, कोल्हटकर इत्यादी ज्येष्ठ मराठी साहित्यिकांशीही परिचय झाला. त्यांची पुस्तके वाचावयास मिळाली. साहित्यकृतीचा आस्वाद कसा घ्यावा, त्याचे मूल्यमापन कसे करावे, याचे धडेही भाऊसाहेबांनीच दिले. वसंतरावांनी भाऊसाहेबांकडून वाचनाचे वेड घेतले. जीवनचिंतनाचा ध्यास घेतला. जीवनाबद्दलचा दुर्दम्य आशावाद स्वीकारला. त्यामुळेच युद्धोत्तर जीवनात अतिवास्तवतेला अभिप्रेत असलेला ‘शून्यवाद’ वसंतरावांना स्पर्श करू शकला नाही. आपल्यावरील या प्रभावाचे (भाऊसाहेबांच्या) वर्णन करताना ‘गुरूवर्य’ या लेखात वसंतराव लिहितात- “माझ्या लिहिण्याच्या खोलीत पेशवाई पद्धतीचे डेस्क आणि गादी मांडलेली असते. मी कधीही टेबल-खुर्चीचा वापर केला नाही. हाही परिणाम खांडेकरांचाच!”
 
 
 
वसंतरावांचे वक्तृत्व
लेखक म्हणून विशेषत: नाटककार म्हणून वसंतरावांना खूप प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभली. पण, या सार्‍यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वपूर्ण गुण दुर्लक्षित राहिला. तो म्हणजे वसंतरावांचे वक्तृत्व. या वक्तृत्व कलेवरही भाऊसाहेबांचाच प्रभाव (ठसा) होता. वसंतरावांचे वक्तृत्व ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या थाटाचेच होते. एखाद्या समारंभात वसंतराव बोलणार म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच असे. माझ्याप्रमाणे नाशिककरांनी हा अनुभव अनेकदा घेतलेला आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर भक्ती बर्वे यांंना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांचा नाशिक येथे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून वसंतरावांनी केलेलेभाषण, भाऊसाहेब खांडेकरांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभाच्या वेळी केलेले भाषण, उद्योजकांच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केलेले भाषण, कवी कुसुमाग्रजांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिककरांतर्फे कवी कुसुमाग्रजांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी वसंतरावांनी केलेले भाषण केवळ अप्रतिम होते. नाट्यलेखनात गुंतून पडल्याने या वकृत्वकलेकडे लक्ष देता आले नाही, ही गोष्ट खरीच. ते प्राध्यापक होते. प्राध्यापकाला उत्कृष्ट वकृत्वाची जोड हवी असते. नाटक हाही एक लोकसंवादच असतो. त्यालाही वक्तृत्वाची गरज असतेच. पण, वसंतरावांना जाणीवपूर्वक वक्तृत्वकलेची जोपासना करता आली नाही, एवढे निश्चित; अन्यथा ‘पट्टीचा वक्ता’ म्हणून त्यांना महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळाले असते. सध्या महाराष्ट्रात वाचस्पतींचे पेव फुटलेले आहे. त्यांची भाषणे ऐकताना उथळपणाचा अनुभव अनेकांना आलेला असतो. त्यामुळेच वसंतराव मला अथांग डोहासारखे वाटतात.
 
 
 
वसंतराव आणि तात्यासाहेब
वसंतरावांचे वास्तव्य ५५ वर्षे नाशिकनगरीत होते. (१९४६ ते २००१) ते सर्वार्धाने नाशिककर होते. वसंतरावांप्रमाणे कवी कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) हेही नाशिककर. एक प्रख्यात नाटककार दुसरा कवी. दोघेही सुप्रसिद्ध, सुविख्यात; त्यामुळे दोघांची तुलना होणे, तसे स्वाभाविकच. वसंतरावांपेक्षा तात्यासाहेब वयाने दहा वर्षांनी मोठे होते. त्यामुळे वडील (मोठ्या) भावाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. धाकट्या भावावर करावे तसे प्रेम त्यांनी वसंतरावांवर केले. दोघेही इतके मोठे की, त्यांची उंची मोजण्याचा प्रयत्न तसा निरर्थकच! तरीही कळत-नकळत दोघांमध्ये तुलना होत गेली. दोघांच्या साहित्यापेक्षाही स्वभावाबद्दल खूप काही बोलले गेले. याबाबतीत हलक्या आवाजातील कुजबुज जास्त चालली. मतमतांतराचा, कुजबुजीचा इत्यर्थ असा की, तात्यासाहेब लोभी, माणसांत रमणारे. त्यांच्या घराचे दार सदैव उघडे. घरी येणार्‍यांचे स्वागत करण्यात तात्यासाहेब उत्सुक. येणार्‍या प्रत्येकाचे तात्यासाहेब हसतमुखानेच स्वागत करणार. या उलट वसंतराव माणूस घाणे. त्यांच्या घराचे दार सदैव बंद. वसंतरावांचे निवासस्थान ‘शिवाई’ होते. नाशिककर म्हणत-छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचे दरवाजे सूर्योदयाला तरी उघडत, पण वसंतरावांच्या ‘शिवाई’ गडाचे दरवाजे सदैव बंदच! बेल वाजवल्यावरही कानेटकरांची भेट होईलच, असे नाही आणि भेट झालीच, तर वेळ देतील असेही नाही. एकतर आधी ठरल्याशिवाय वसंतराव भेट देतच नसत. या अशा खासगीतल्या चर्चेचा समारोप असा होई - “आमचे तात्यासाहेब तसे नाहीत हो...”
 
 
 
अशाप्रकारची चर्चा, कुजबूज, खासगीतल्या गप्पा या सार्‍यांना वस्तुस्थितीचा आधार होता. वसंतरावांचे मन माणसांच्या गर्दीत रमत नव्हते, फुलत नव्हते. तात्यासाहेबांचे तसे नव्हते. गर्दीचे त्यांना वावडे नव्हते. गर्दीचा त्यांना त्रास होत नसेल, असेही नाही. स्वतः त्रास सहन करूनही समोरच्याचे सस्मित स्वागत करण्याची पराकोटीची सहनशीलता तात्यासाहेबांजवळ होती. ‘सहनशीलता’ हा काहीसा गुळगुळीत शब्द न वापरता ‘स्थितप्रज्ञ’ हा शब्द वापरला, तर कदाचित तात्यासाहेबांच्या स्वभावाचे नेमके वर्णन करता येईल. माणसांच्या गर्दीतही एकांत साधण्याची अपूर्व किमया त्यांना प्राप्त झाली असावी. तसे तात्यासाहेेबही माणसांच्या मेळाव्यात असूनही तिथे नसतात. पाण्यात राहूनही कोरडे राहण्याची कमलपत्राची निर्लेपिता तात्यासाहेबांनी साधलेली होती, तशी वसंतरावांनी साधली नाही, असे फार तर म्हणता येईल. “मी माणसातला माणूस नाही, माणसात मिसळायचं म्हटलं की, मला प्रयत्नांत मनाची तयारी करावी लागते.” यावरून आपल्याला माणसांत मिसळता येत नाही, हा आपला दुबळेपणा (वीकनेस) आहे, हे वसंतरावांना मान्य होते. “हा स्वभाव स्पृहणीय नाही व समर्थनीयही नाही,” असे वसंतराव स्वत: स्पष्टपणे सांगत. यासंदर्भात तात्यासाहेबांचे श्रेष्ठत्व ते मान्य करतात. “स्वत:च्या कलावंतपणाचे भान गळून पडलेला एवढा थोर कलावंत अद्याप तरी माझ्या पाहाण्यात नाही,” हे वसंतरावांचे तात्यासाहेबांबद्दलचे मनोगत मननीय आहे.
 
 
 
वसंतरावांच्या अमृत- महोत्सवानिमित्त जो सोहळा नाशिक येथे झाला, त्यावेळी वसंतरावांनी आपला हा ‘वीकनेस’ मान्य केला. त्याप्रसंगी तीर्थरुप तात्यासाहेबांच्या चरणावर त्यांनी ज्या अनन्य निष्ठेने मस्तक ठेविले, तो प्रसंग भारावून टाकणारा, मंत्रमुग्ध करणारा होता. ‘नटसम्राट’ नाटकातील नटश्रेष्ठ गणपतराव बेलवलकर म्हणतात- “ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ही माणसे अभागी आणि जागा असूनही ज्यांना नमस्कार करायला धीर होत नाही, ती निखळ कपाळकरंटी. अमृताशी पैजा जिंकेल,अशी ही चीज आहे.” या हद्यप्रसंगी वसंतरावांनी तात्यांना नमस्कार करून आपण अभागी वा कपाळकरंटे नाही, हे दाखवून दिले. या दोन महान लेखकांची मने इतकी जुळलेली असताना, त्यांच्यात तुलना करण्याचा करंटेपणा आम्ही कशासाठी करायचा?
 
 
 
आदरणीय सिंधूताई
१९३९ सालच्या मे महिन्यात वसंतराव सांगली येथे वास्तव्यला आले. कारण, वडील कवी गिरीश उर्फ शंकर केशव कानेटकर त्यांची सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यायलात मराठीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. सांगलीच्या विश्रामबाग विभाग ‘कांचन’ बंगला हे वसंतरावांचे निवासस्थान होते. सांगलीच्या या वास्तव्यात वसंतराव एका मुलीच्या प्रेमात पडले. ही प्रेमकथा त्यांच्यात शब्दांत - “ ‘कांचन’ वास्तव्य काळात मी प्रेमात पडलो होतो. एका अल्लड, सुंदर, हुशार आणि सुस्वभावी मुलीच्या. कु. सिंधू रामचंद्र श्रीखंडे- माझी नात्याने मामेबहीणच. माझे वय होते १९ वर्षे आणि ती होती १४ वर्षांची. खरोखर ‘प्रेम’ कशाशी खातात, हे कळण्याची अक्कल त्या वयात आम्हाला दोघांनाही नव्हती.” अशा या सिंधू नावाच्या मुलीशी १९४५ साली वसंतरावांचा विवाह झाला. प्रेमकहाणी सफळ संपूर्ण झाली. त्यावेळी वसंतराव ‘बी.ए’ आणि सिंधूताई ‘मॅट्रिक’ होत्या, त्यानंतर दोन वर्षांतच नाशिक येथे आले.
 
 
 
पुढच्या जीवनप्रवासात आणि नाट्यलेखन प्रवासातही सिंधूताईंनी वसंतरावांची सावलीसारखी सोबत केली. पत्नी म्हणून त्यांनी जी साथ दिली. त्यामुळेच वसंतराव मोठे नाटककार होऊ शकले. वसंतरावांच्या या समर्थ नाट्यसेवेमागे सिंधूताईंचे सात्विक बळ उभे होते. स्वत: सिंधूताई किती प्रतिभासंपन्न लेखिका व कवयित्री आहेत, याचा प्रत्यय जाणकार रसिकांना आलेला आहेच. सिंधूताई पत्नी म्हणून समर्पणाच्या भावनेने वसंतरावांच्या जीवनात प्रकाश देत राहिल्या. वसंतराव प्रकाशदीप असतील, तर सिंधूताई त्या दीपातील वात होत्या. वसंतराव मंदिर असतील, तर सिंधूताई पायातील दगड होत्या. वसंतराव सागर असतील, तर सिंधूताई किनारा होत्या. वसंतराव वृंदावन असतील, तर सिंधूताई तुळशीतील मंजिरी होत्या. वसंतराव आनंदाचा डोह असतील, तर सिंधूताई त्या डोहातील आनंदलहरी होत्या.
 
 
 
- प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी
 
 
(लेखकाने प्रा. वसंत कानेटकरांच्या ऐतिहासिक नाट्यपंचकावर ‘पीएच.डी (डॉक्टरेट) प्राप्त केलेली आहे. त्यांचा प्रबंध ‘गगनवेध’ या नावाने ग्रंथरुपात प्रसिद्ध झाला आहे.)