‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो गाजू लागला. उत्पन्नाचाही त्याने अल्पावधीत तसा उच्चांक गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या चित्रपटाची प्रशंसा केली. सोशल मीडियावर त्याच्या प्रतिकूल, अनुकूल प्रतिक्रिया उमटू लागल्या. समाजातही या चित्रपटाची जोरदार चर्चा होऊ लागली. हा चित्रपट बघायचा की नाही, असा प्रश्न माझ्यासमोरही होता. कारण, तसा चित्रपट पाहाणे हा माझ्या विषयसूचीतील शेवटच्या क्रमांकाचा विषय असतो. केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचा सदस्य म्हणून कर्तव्यभावनेने चित्रपट ‘सेन्सॉर’ करण्यासाठी पाहावे लागतात. त्यांचीही संख्या महिन्यातून एक किंवा दोन असते. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहाणे हे वर्षातून एक-दोनदाच होतं. तेदेखील मुली आग्रह करतात, तिकीट काढतात आणि चित्रपट बघायला जावे लागते. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मी पाहाणे आवश्यक होते. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण असे की, चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सदस्य, म्हणजे आम्ही बोर्डातील सहकारी झालो. सहकार्याचा चित्रपट पाहाणे ही नैतिक जबाबदारी राहाते. दुसरे कारण असे की, चित्रपट पाहाण्यात संघ स्वयंसेवकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. मी संघस्वयंसेवक आहे. उद्या जर एखाद्या स्वयंसेवकाने मला विचारलं, ‘चित्रपट पाहिला का?’ तर ‘नाही पाहिला’ असे उत्तर देता येणार नाही. म्हणून मग चित्रपट पाहाण्याचे ठरविले.
नेहमीप्रमाणे मोठी मुलगी शुभांगी हिने तिकीटं काढली आणि चित्रपट बघायला गेलो. चित्रपट बघण्याची मनापासूनची इच्छा नव्हती. त्याचे कारण असे की, चित्रपटाचा विषय मला माहीत होता. काश्मीरमधील आपल्याच हिंदू बांधवांची झालेली कत्तल मला माहीत होती. त्यांच्या हालअपेष्टा मला माहीत होत्या. जगमोहन यांचे पुस्तक ‘धुमसता काश्मीर’ मी वाचलेले होते. दिवंगत काश्मिरी पंडितांच्या डायरीवरील पुस्तके वाचली होती. हृदयात एक जबरदस्त जखम होती. हा चित्रपट पाहाणे म्हणजे तिची खपली काढणे होते. चित्रपटातील प्रसंग मी पाहू शकेन का, हा प्रश्न आसनावर बसतानादेखील माझ्या मनात होता, म्हणून मी ‘किंडल’ बरोबर घेऊन गेलो. दुसर्या दिवशी व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी पुस्तकातील प्रकरण लिहायचे होते. चित्रपट सुरू झाला. पहिलाच प्रसंग अगदी अंगावर आला. शारदा, तिचा मुलगा कृष्णा, पती, सासरे यांचे केले गेलेले हाल आणि उत्तरार्धात कृष्णा सोडून अन्यांच्या झालेल्या कत्तली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाहाणे खरोखरच कठीण होते. आपल्याच देशात आपल्याच बांधवांवर असे भयानक हल्ले होतात आणि आपण काहीही करू शकत नाही, ही जी अगतिकता असते, ती जाळत जाते. शासन निष्क्रिय आहे आणि काश्मीरमधील फारुख अब्दुल्लाचे शासन दहशतवाद्यांना सामील झालेले;त्यात पोलीस बघ्याची भूमिका घेतात, त्यांना पोसण्याचा पैसा आपण पाठवतो. ७० वर्षे काश्मीरमधील फुटीरतावादाचे पोषण आपल्या शासनाने केले. त्यांना जाब विचारणाराकोणी नाही. उत्तर देण्यास ते बांधलेले नाहीत. काश्मीरमधील हिंदू निर्वासित होऊन दिल्लीत आले, त्यांच्या निर्वासित छावण्यांचा मोठा शॉट चित्रपटात आहे. स्वर्गात राहाणार्या लोकांचे छावणीतील नरकात होणारे हाल छाती धडधडून सोडतात. हे बघायला खूप हिंमत लागते.
काश्मीरमधील हिंदूंचे पलायन १९९० पासून सुरू झाले. तो सर्व घटनाक्रम चित्रपटात अस्सल पुराव्यानिशी समोर येतो. नव्वदीच्या दशकातील इतिहास ज्यांना माहीत आहे, त्यांना काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांची दूरदशा ही नव्याने सांगण्याचे कारण नाही. ९० नंतर जन्मलेल्या पिढीचे काय? या पिढीचे प्रतिनिधीत्व नायक कृष्णा करतो. प्रसिद्धी माध्यमे, तथाकथित पुरोगामी, मानवतावादी, उदारमतवादी, सेक्युलर यांच्या कोंडाळ्यात तो वाढलेला असतो. त्याचे पुरते ‘ब्रेनवॉशिंग’ झालेले असते, ते करण्याचे काम जवाहरलाल विद्यापीठातील राधिका करते. राधिकाची भाषणं, गाणे ऐकल्यानंतर पायातील वहाण काढून जबरदस्त थोबाडावे, असे कोणाला वाटले, तर नवल नाही. आपल्याच देशाविरूद्ध, आपल्याच संस्कृतीविरूद्ध, आपल्याच समाजबांधवांविरूद्ध निरनिराळ्या प्रकारचे ‘नॅरेटिव्ह’ तयार करून त्याचा प्रचार करणे ही विकृती देशद्रोहापेक्षा भयानक आहे. तिची लागण आपल्या देशात गाजर गवतासारखी काही भागांत झालेली आहे. हे पूर्वी माहीतच होते. चित्रपटात ते प्रसंगांच्या रूपाने समोर आले.
या ‘तुकडे तुकडे गँग’ला बळ देण्याचे काम त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केले. त्यांचे पोषण केले, त्यांना संरक्षण दिले. देशहितापेक्षा एका पंतप्रधानाला शेख अब्दुल्लाची मैत्री महत्त्वाची वाटली आणि दुसर्या पंतप्रधानाला फारुख अब्दुल्लाची मैत्री महत्त्वाची वाटली. गेले चार-पाच महिने मी रशिया या विषयाचे वाचन करतोय. अलेक्झांडर नेवस्की ते व्लादिमीर पुतीन इथपर्यंत वाचन चालू आहे. मातृभूमी रशियाच्या विरूद्ध जो कोणी उभा राहिला त्याला राजा असो, झार असो, लेनिन असो, स्टॅलिन असो की, पुतीन असो याने जीवंत सोडलेले नाही. जगात कोठेही लपून राहिला तरी, त्याला शोधून काढून स्वर्गात पाठवले आहे. म्हणून रशिया ‘रशिया’ आहे आणि भारत तुकड्या तुकड्यांत विभाजित झालेला खंडित भूखंड झालेला आहे. आमचे राज्यकर्ते रशियाकडून शस्त्र घेतात, ही चांगली गोष्ट आहे. तेवढीच देशभक्तीदेखील घ्यावी. देशशत्रूंना चिरडण्याची आकांक्षा घ्यावी. आपल्या राष्ट्राला महान बनविण्याची ऊर्जा घ्यावी. शस्त्रे काय कुठेही मिळतील, देशातही बनविता येतील, पण या भावना जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागतील.
चित्रपट बघत असताना मला पू. डॉक्टरांची प्रकर्षाने आठवण झाली. त्यांनी हिंदूंची दुर्बळता हेरली. त्याला लढाऊ केले पाहिजे, आत्मसंरक्षणक्षम केले पाहिजे म्हणून त्या काळच्या मर्यादेत त्यांनी दंड, खडग, शुलिका, भाला यांचे शिक्षण देण्याची शाखेत व्यवस्था केली. आत्मरक्षणासाठी आपण सिद्ध असले पाहिजे. ‘उदारमतवाद’, ‘मानवतावाद’ आणि ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दांनी आत्मरक्षण होत नसते. या उलट बुद्धिभेद होऊन या सर्व संकल्पना मरणाला जवळ आणतात. डॉक्टरांना मरणालाही मारणारा हिंदू उभा करायचा होता. काश्मीरमध्ये तसा उभा करता आला नाही, ही संघकार्याची उणीव समजली पाहिजे. काश्मीरमधील हिंदू फारसा प्रतिकार न करता काश्मीरच्या बाहेर पडला. अनेक जण मेले. त्यात त्यांचा दोष नाही. एके-४७ पुढे निशस्त्र प्रतिकार करणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्यासाठी तसेच शस्त्र हातात हवे. हिंदूंनी काश्मीरमध्ये निशस्त्र राहाणे मरणाला जवळ करण्यासारखे झाले. कायद्याने त्यांना शस्त्र धारण करता येत नाही. कायद्याने काश्मीरमधील मुसलमानांनादेखील शस्त्रे धारण करता येत नाही, पण ती कुठून आणि कशी आली सर्वांना माहीत आहे.
चित्रपट बघताना मनात विचार आला की, आज ‘३७० कलम’ संपले आहे. आज न उद्या काश्मीरमधील विस्थापित हिंदू आपल्या घरी जाईल, पण तो निशस्त्र गेला तर कसा जगेल? हा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. त्याला आत्मसंरक्षणक्षम कोण करणार? कसे करणार? त्याला शस्त्र धारण करण्याचा अधिकार देणार का? कायद्याने तो देता येईल का? नसेल देता येईल तर घटनेत बदल करता येईल का? असे एक ना अनेक प्रश्नांच्या माशा डोक्याला डसू लागल्या. चित्रपट चांगला आहे. अभिनय चांगला आहे. तांत्रिक अंगे चांगली आहेत. कथा चांगली आहे, म्हणून चित्रपट चांगला आहे, असे मी म्हणणार नाही, असे म्हणणारे अनेक लोकं आहेत. परंतु, चित्रपटाचे चांगलेपण त्याच्या विचारक्षमतेत आहे. तो अस्वस्थ करतो आणि विचाराला प्रवृत्त करतो. तो आपल्याला इतिहासात घेऊन जातो. इतिहासातील चुका समोर आणतो आणि आपल्याला इशारा देतो की, याच चुका जर उद्या सर्व भारतात घडल्या, तर काय होईल? याचा विचार करा! हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे, असे मला वाटले.