बिबट्या विसावला 'पाईप'मध्ये; दिवसभर बोरिवली 'नॅशनल पार्क' पर्यटकांसाठी बंद

16 Mar 2022 20:10:10
leopard



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' हे आज ( दि. १६ मार्च, २०२२) अचानकपणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यास कारणीभूत ठरला एक बिबट्या. उद्यानाच्या प्रवेशद्वारानजीकच्या एका पाईपमध्ये बिबट्याने विसावा घेतला होता. त्यामुळे प्रसंगावधान राखून पर्यटकांसाठी उद्यान बंद करुन बिबट्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग करुन देण्यात आला.

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'ला लागून असलेल्या लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर नवा नाही. मात्र, आज चक्क एका बिबट्यामुळे राष्ट्रीय उद्यान पर्यटनासाठी बंद करण्याची वेळ वन विभागावर आली. पहाटे प्रभातफेरीसाठी आलेल्या लोकांना उद्यानाच्या प्रवेशद्वारानजीक बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे कृष्णगिरी उपवन वनपरिक्षेत्रातील एका पाईपमध्ये बिबट्याने विसावा घेतला. यासंदर्भातील माहिती उद्यानातील बिबट्या बचाव पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच त्या परिसरात धाव घेतली. यावेळी त्यांना हा बिबट्या एका पाईपमध्ये विसावलेला दिसला. वन अधिकाऱ्यांनी पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन राष्ट्रीय उद्यान रिकामी केले. आलेल्या पर्यटकांना बाहेर काढून उद्यान बंद करण्यात आले.


बिबट्याने विसावा घेतलेल्या पाईपच्या एका टोकाशी लाईव्ह कॅमेरा लावण्यात आला. याद्वारे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. दिवसभर या बिबट्याने पाईपमध्ये विसावा घेतला. प्रसंगी या बिबट्याचा बचाव करण्यासाठी पथकही सज्ज होते. मात्र, सायंकाळ होताच वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला जाण्यासाठी मार्ग करुन दिला. परिणामी बिबट्याला निसटण्यासाठी सुखरुप मार्ग निर्माण झाल्याने त्याने तिथून पलायन केले.

Powered By Sangraha 9.0