मरणपंथाला लागलेल्या काँग्रेसला ‘चिंतन शिबीर’ देणार संजीवनी!

15 Mar 2022 13:32:57

congress
 
काही पक्ष काँग्रेसला वगळून भाजप विरोधात तिसरी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याने ‘युपीए’ आहे कोठे, असा प्रश्न करून काँग्रेसचे अस्तित्व आपण मानत नसल्याचे याआधीच घोषित केले आहे. काँग्रेसची अवस्था अशी बिकट आहे. त्या वातावरणात पक्षाचे ‘चिंतन शिबीर’ होणार आहे. पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्यात हे चिंतन शिबीर खरोखरच यशस्वी होते का ते नंतर दिसून येणार आहेच!
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी झाला, तर काँग्रेसच्या हातात असलेले पंजाब राज्य त्या पक्षाने सुंदोपसुंदीमुळे घालविले. त्या राज्यात आम आदमी पक्षास दोन तृतीयांशहून अधिक बहुमत मिळाले. देशाच्या विविध भागात काँग्रेसचे थोडेफार अस्तित्व दिसून येत असले तरी मरणपंथाला लागल्यासारखी त्या पक्षाची स्थिती झाली आहे. पक्षाला केवळ नेहरू-गांधी घराणेच उभारी देऊ शकते, यावर विश्वास असणार्‍या नेत्यांनी पक्षाची धुरा अन्य कोणाच्या हाती सोपविण्यास पुन्हा नकारच दिला आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडेच आली. पाच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचा जो दारुण पराभव झाला त्याबद्दल पक्षाच्या नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसअंतर्गत ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी जे निकाल आले त्यामुळे आपणास वाईट वाटत असल्याचे आणि त्यामुळे आपण निराश झालो असल्याचे मत व्यक्त केले. एवढेच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन, ज्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षासाठी आपले जीवन वाहिले ते नेते पक्ष असा मरणपंथाला लागल्याचे पाहू शकत नाहीत, अशी प्रतिक्रियाही आझाद यांनी व्यक्त केली. गुलाम नबी आझाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पण त्यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी जो ‘जी-२३’ गट निर्माण केला, त्यामुळे त्या गटातील नेते पक्षश्रेष्ठींच्या नजरेतून उतरले आहेत. पण, गुलाम नबी आझाद यांनी जे सत्य आहे ते मांडले आहे.
पाच राज्यांतील अत्यंत अवमानास्पद पराभवानंतर त्यावर विचार करण्यासाठी गेल्या रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस पक्षासाठी आपण, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे बाजूला होण्यास तयार असल्याचे सोनिया गांधी यांनी बोलून दाखविले. पण, बैठकीस उपस्थित असलेल्या कोणीही असे करण्यास अनुमती दिली नाही. पुढील ऑगस्ट महिन्यात पक्षांतर्गत निवडणूक होऊन नवा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत सोनिया गांधी यांनीच पक्षाची जबाबदारी सांभाळावी, असा निर्णय कार्यकारिणीने एकमताने घेतला.
 
 
पक्षामध्ये ‘जी-२३’ नावाने विरोधी गट अस्तित्वात असला तरी गांधी-नेहरू घराण्याशिवाय पक्षाला पर्याय नसल्याचेच कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयावरून दिसून आले. सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाची सूत्रे असावीत, असा निर्णय कार्यकारिणीने घेतला असला तरी गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांनी, पक्षामधील निर्णय प्रक्रिया ‘सामूहिक’ असली पाहिजे, असे मत चर्चेच्या वेळी मांडले. पक्षाचे निर्णय अनुभवी नेत्यांच्या गटाकडून घेतले जातात आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी त्याबाबत सल्लामसलतही केली जात नाही, असे ‘जी-२३’ गटांतील नेत्यांचे आधीपासूनच म्हणणे आहे. पण, या ‘जी-२३’ गटातील नेत्यांचे कोण ऐकतो? मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी ‘जी-२३’ नेत्यांना सुनावताना, कोणाच्या काही तक्रारी असल्या तरी त्या सार्वजनिकरीत्या न मांडता पक्षाच्या मंचावरच मांडल्या पाहिजेत, असे म्हटले.
जयपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही, पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा जो दारूण पराभव झाला त्याबद्दल चिंता व्यक्त केली. काही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पद्धतशीरपणे घसरण होत चालली असल्याचे शशी थरूर म्हणाले. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशमधील मतदारांनी समाजवादी पक्षास मोठ्या प्रमाणात मतदान केले. काँग्रेसच्या पराभवाचे खापर प्रचाराची धुरा सोपविण्यात आलेल्या एका व्यक्तीवर फोडता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत, पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा इतका दारुण पराभव का झाला यावर चर्चा करण्यात आली. गोव्यासारख्या राज्यात प्रादेशिक आणि अन्य नव्या पक्षांनी काँग्रेसची मते त्यांच्याकडे वळविली, असे राहुल गांधी म्हणाले. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंह यांना मध्येच बदलण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्याचा पक्षास फटका बसल्याचे मत गुलाम नबी आझाद यांनी मांडले. तसेच, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचे वागणे याचाही पक्षाला फटका बसल्याचे मत नोंदविण्यात आले. पंजाबचे प्रभारी असलेले हरीश रावत यांची पंजाबपेक्षा उत्तराखंडमध्ये अधिक आवश्यकता होती. पण, ते पंजाबमध्येच थांबले, याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या व्यूहरचनेतील त्रुटींमुळे भाजपच्या चार राज्यांमधील गैरप्रकार मतदारांपुढे प्रभावीपणे मांडण्यात आले नसल्याचे काँग्रेस कार्यकारिणीने म्हटले आहे.
 
 
देशात विद्यमान असलेल्या राजकीय एकाधिकारशाहीविरुद्ध लक्षावधी भारतीयांच्या आशाआकांक्षांचे प्रतिनिधीत्व काँग्रेस पक्ष करीत आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, असे काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सूरजेवाला यांनी कार्यकारिणीच्या बैठकीनंतर प्रस्तुत केलेल्या निवेदनात म्हटले आहे. काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असला तरी उत्तर प्रदेशात काँग्रेसची एवढी दारुण अवस्था कोणामुळे झाली, यावर थेट भाष्य करणे टाळले. उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर सोपविण्यात आली होती. शेतकरी आंदोलन, हाथरस जिल्ह्यातील बलात्काराची घटना, लखीमपूर खेरी येथील घटना यावरून काँग्रेसने भाजपविरूद्ध रान उठविले. पण त्या प्रचाराचा काही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांनी काशिविश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन साग्रसंगीत पूजा केली. त्याद्वारे हिंदू मतदारांना काँग्रेसकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या कशाचा उपयोग झाला नाही! ज्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात प्रदीर्घकाळ सत्ता राहिली त्या नेहरू-गांधी यांच्या काँग्रेसला उत्तर प्रदेशात दोन अंकी संख्याही गाठता आली नाही याला काय म्हणावे! खरे म्हणजे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा झालेला दारुण पराभव लक्षात घेऊन प्रियांका गांधी यांनी राजकारण संन्यास घेण्याची घोषणा करायला हवी होती. पण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांना पक्षावरील आपली पकड सोडावीशी वाटत नाही. त्यामुळे भावी काळात काँग्रेस पक्षाची आणखी वाताहत झाल्याचे पाहण्यास मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको!
 
काँग्रेस पक्षाची जी अवस्था झाली आहे त्यावर विचार करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे, यावर विचार करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पक्षाकडून ‘चिंतन शिबिरा’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यंदाच्या आणि पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन या निवडणुकांना सामोरे जाण्याची सिद्धता काँग्रेस पक्षाकडून केली जाईल, असा विश्वास कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
 
कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटकचे डी. के. शिवकुमार यांच्यासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी केली. पण, सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्याद्वारे नवीन अध्यक्ष निवडण्यात येईल, असे सांगण्यात आले. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाल्या तरी नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेर पक्षाची सूत्रे जाणार नाहीत हे नक्की. आपण सर्वांना जोडून ठेवणार्‍या दुवा आहात, असे काँग्रेस नेते मल्लीकार्जुन खर्गे यांनी बोलून दाखविले आहेच. काही विरोधी पक्ष काँग्रेसला वगळून भाजप विरोधात तिसरी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याने ‘युपीए’ आहे कोठे, असा प्रश्न करून काँग्रेसचे अस्तित्व आपण मानत नसल्याचे याआधीच घोषित केले आहे. काँग्रेसची अवस्था अशी बिकट आहे. त्या वातावरणात पक्षाचे ‘चिंतन शिबीर’ होणार आहे. पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्यात हे चिंतन शिबीर खरोखरच यशस्वी होते का ते नंतर दिसून येणार आहेच!
 
Powered By Sangraha 9.0