सिंधुदुर्गात दुर्मीळ 'ग्रीन सी टर्टल'च्या घरट्याची तिसरी नोंद; वायरीतून पिल्ले रवाना

10 Mar 2022 19:40:16
sea turtle



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या 'ग्रीन सी टर्टल' ( green sea turtle ) कासवाच्या घरट्याची नोंद झाली असून यातून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. देवबाग आणि वायंगणी किनाऱ्यानंतर आता वायरी किनाऱ्यावरुन 'ग्रीन सी' ( green sea turtle ) कासवाची २५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरुन 'ग्रीन सी' ( green sea turtle ) सारख्या 'संकटग्रस्त' सागरी प्रजातींच्या विणीच्या छायाचित्रीत नोंदी यंदा समोर आल्या आहेत. त्यामुळे कासव संरक्षणाचे काम ठोस पद्धतीने राबवणे आवश्यक आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. मात्र, यंदा सिंधुदुर्गामध्ये 'ऑलिव्ह रिडले' बरोबरीनेच 'ग्रीन सी' प्रजातीच्या घरट्यांच्या नोंदी झाल्या आहेत. या राज्यातील पहिल्याच छायाचित्रीत नोंदी आहेत. गेल्या आठवड्यात देवबाग किनाऱ्यावरुन 'ग्रीन सी' कासवाची ७४ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यानंतर सोमवारी वायंगणी किनाऱ्यावरुन २९ पिल्ले सोडली. मालवण तालुक्यातील वायरी किनाऱ्यावर बुधवारी 'ग्रीन सी' प्रजातीची पिल्ले आढळून आली. या घरट्याविषयी स्थानिकांना माहिती नव्हती. नैसर्गिक पद्धतीनेच घरट्यामधील अंडी उबवून त्यामधून पिल्ले बाहेर पडली. त्यामुळे ती समुद्राच्या दिशेने न जाता किनारपट्टीवरील पथ दीपांच्या उजेडाच्या दिशेने गेली आणि भरकटली. या पिल्लांना पर्यटन व्यावसायिक दादा वेंगुर्लेकर आणि स्थानिकांनी पाहिले. 




यामधील भरकटलेल्या १२ पिल्लांना उदय पाटकर, वल्लभ पाटकर, प्रतिक डीचवलकर, प्रसाद डीचवलकर, गुरुदास तळवडेकर, दादा वेंगुर्लेकर, संतोष लुडबे, पूर्वा वेंगुर्लेकर, दादा वेंगुर्लेकर, पार्थ वेंगुर्लेकर यांनी समुद्रात सोडले. याविषयी स्थानिक पत्रकार संदीप बो़डवे यांनी सांगितले की, "ग्रीन सी टर्टलची पिल्ले रात्री कोणत्याही वेळी घरट्या बाहेर येण्याची शक्यता होती. येथे स्थानिकांना सापडलेली कासव पिल्ले समुद्रात न जाता ती सुमारे २०० ते २५० फूट दूर किनारपट्टीवरील पथ दिपांच्या उजेडाच्या दिशेने झाडीत गेल्याचे निदर्शनास आले होते. या झाडीत जाऊन दिसेनाशा झालेल्या कासव पिल्लांची संख्या ७० ते ७५ च्या आसपास होती. त्याठिकाणी यापैकी फक्त १२ पिल्ले सापडून आली होती. रात्री जर घरट्या मधून उर्वरित कासव पिल्ले बाहेर आली असती तर अशा पिल्लांना कुत्रे, मुंगूस, लाल मुंगे यांचा मोठा धोका होता. तसेच ती पिल्ले समुद्रात न जाता पाथदिपांच्या उजेडाच्या दिशेने जाणार होती. तिथे त्यांची जिवंत राहण्याची शक्यता खूपच कमी होती. त्यामुळे त्या घरट्यातील पिल्ले वाचविण्यासाठी घरटे शोधून ते संरक्षित करणे गरजेचे होते. म्हणून मी आणि माझी पत्नी श्रेया बोडवे हिने रात्री जागून 'ग्रीन सी'च्या घरट्याचा शोध घेण्याचे ठरविले". यामाध्यमातून गुरुवारी बोडवे यांनी स्थानिकांच्या मदतीने गुरुवारी घरट्यामधून बाहेर आलेल्या १३ पिल्लांना समुद्रात सोडले.


Powered By Sangraha 9.0