भाईंदर रेल्वे यार्डमधून बिबट्याला केले रेस्क्यू; बिबट्या खाडी पोहून आल्याची शक्यता
09 Feb 2022 20:08:28
मुंबई - भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे यार्ड परिसरातून बिबट्याचा बचाव करण्यात आला आहे. गेले काही दिवस हा बिबट्या या परिसरात वावरत होता. त्यामुळे वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या बिबट्याला रेस्क्यू केले. दरम्यान हा बिबट्या वसईची खाडी पोहून आल्याचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसापासून भाईंदर पश्चिम कडील खाडीनजीक असणाऱ्या जय अंबे नगर परिसरात बिबट्याचा वावर होता. स्थानिकांनी बिबट्याचा वावर लक्षात आल्यानंतर लागलीच त्याची माहिती वन विभागाला दिली. ठाणे प्रादेशिक वन विभागाने तात्काळ या परिसराची पाहणी केली. तसेच जनजागृतीपर कार्यक्रमही घेतला. बिबट्याच्या वावराचे पुरावे मिळवण्यासाठी त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. या कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्याचे छायाचित्र कैद झाले. त्यादरम्यानच्या काळात बिबट्याचा हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू होते. मात्र, बुधवारी हा बिबट्या एका नाल्यात अडकला. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव पथकाला पाचारण करुन त्यांचा बचाव करण्यात आला.
हा बिबट्या नर प्रजातीचा आहे. त्याचे वय चार ते पाच वर्षांचे आहे. त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. मात्र, हा बिबट्या कुठून आला, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण, भाईंदर रेल्वे स्थानकानजीक खाडीलगत हा परिसर आहे. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय उद्यानातील ओळख पटवलेल्या बिबट्यांच्या यादीत या बिबट्याचा समावेश नाही. त्यामुळे हा बिबट्या वसईची खाडी पोहून याठिकाणी आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक, वनविभाग ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गिरीजा देसाई मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक, वन विभाग ठाणे, राकेश भोईर, वनक्षेत्रपाल, मुंबई, रेस्क्यू टीम, ठाणे वनविभाग, रेस्क्यू टीम SGNP, अग्निशमन दल कर्मचारी, मीरा भाईंदर महानगरपालिका, रेल्वे अधिकारी कर्मचारी, पोलीस विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आली.