पणजोबाची पणतूला चपराक

09 Feb 2022 21:08:16

prime-minister-narendra-modi
 
 
 
ते मोदींचे भाषण आहे म्हणून चांगले आहे, असे नसून मुद्देसुद भाषण कसे करावे आणि आरोप करणार्‍यांच्या गळ्यात त्यांची मडकी कशी बांधावीत याचा हा उत्तम नमुना आहे. पं. नेहरु यांना उद्धृत करुन मोदींनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत.
 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेत राहुल गांधी यांनी भाषण केले आणि नेहमीप्रमाणे मोदी शासनावर वेगवेगळे आरोप केले. राहुल गांधींचे भाषण कधीही कुणीही गांभीर्याने घेत नाही. पण, या भाषणात त्यांनी ‘भारत एक राष्ट्र नाही’ असा सैद्धांतिक मुद्दाही उपस्थित केला. आपण मानूया की, राहुल गांधी यांना राष्ट्र म्हणजे काय? राज्य म्हणजे काय? राष्ट्र आणि राज्य यातील फरक काय? याचे चांगले ज्ञान आहे. लोकसभेत केवळ ४४ खासदार असणार्‍या काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींच्या भाषणाची दखल घेण्याचे तसे काही कारण नाही. परंतु,काँग्रेस देशात ५० वर्षे सत्तेवर राहिली आणि नेहरु-गांधी घराण्यानेच राज्य केले. त्यामुळे राजपरिवारातील राजपुत्राच्या भाषणाची दखल घेणे आवश्यक झाले. पंतप्रधान मोदी यांचे चर्चेला उत्तर देताना जे भाषण झाले, ते संसदेतील उत्तम भाषण या सदरात मोडणारे आहे. मोदींचे भाषण उत्तम होते, असे म्हणणे म्हणजे लता मंगेशकर उत्तम गाणी गातात असे म्हणण्यासारखे आहे. हे भाषण भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘युट्यूब’वर जाऊन संपूर्णपणे ऐकायला पाहिजे. कारण, राजकीय लढाई त्यांना लढायची आहे. प्रतिस्पर्ध्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कशी उत्तरे द्यायची हे या भाषणातून सर्वांना समजेल. अनेक नेते नको ते, नको त्यावेळी आणि नको त्या ठिकाणी बोलत असतात. एक उत्तम राजकीय भाषण कसे करायचे हे पंतप्रधान मोदींकडून शिकून घ्यायला पाहिजे. पंतप्रधानांचे भाषण लोकसभेतील आहे, जनसभेतील नव्हे. त्यामुळे या भाषणात तसे फारसे चढउतार नाहीत. उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याला मुद्देसुद उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रतिस्पर्ध्याच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात टाकणे याला कौशल्य लागते आणि तसाच जबरदस्त अभ्यास लागतो. भाषणामध्ये काही काँगे्रसी खासदारांनी शेरो-शायरीचा उपयोग केला. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देताना पंतप्रधानांनी एक शेर ऐकविला.
 
 
‘वो जब दिन को रात कहें,
तो तुरंत मान जाओ।
नहीं मानोगे तो,
वो दिन में नकाब ओढ लेंगे।
जरुरत हुई तो हकीकत को
थोडा बहुत मरोड लेंगे,
वो मगरुर हैं खुद की समझ पर बेइंतहा,
इन्हें आईना मत दिखाओ,
वो आईने को भी तोड देंगे।’
 
 
आपली सत्ता गेली याचे दुःख काँग्रेसला २०१४ पासून काट्याप्रमाणे बोचते आहे. पंतप्रधानांनी याकडे संकेत करुन पुढील १०० वर्षांत सत्तेवर न येण्याचा काँग्रेसने कसा चंग बांधला आहे, हे खास उपरोधिक शैलीत मांडले. नागालँडमध्ये १९८९साली काँग्रेसला सत्ता मिळाली, त्यानंतर सत्ता नाही. ओडिशात १९९५ला सत्ता होती, आता नाही. गोव्यामध्ये १९९४ साली पूर्ण बहुमत होतं, आता नाही. १९८८ साली त्रिपुरात त्यांचं सरकार होतं, गेल्या ३४ वर्षांत काँग्रेस तेथे नाही. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांनी १९८५ साली काँग्रेसला स्वीकारले आणि त्यानंतर काँग्रेसला दूर केले. पश्चिम बंगालमध्ये तर गेल्या ५० वर्षात काँग्रेसचे शासन नाही. या स्थितीचा काँग्रेस कधीच गंभीरपणे विचार करीत नाही. त्यांना जिकडे तिकडे मोदीच दिसतो, असा चिमटा काढायला ते विसरले नाहीत. यानंतर कोरोना संकट, ‘मेक इन इंडिया’, गरिबांचे कल्याण, गरिबांना घरे, गॅस जोडणी, अशा सर्व विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि या प्रत्येक विषयात काँग्रेसने जी नकारात्मक भूमिका घेतली, त्याचे वाभाडे काढले आहेत. ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन १९७१सालापासून काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. नंतर गरिबांना हे लक्षात आले की, ‘गरिबी हटाव’ ही फक्त नारेबाजी आहे, त्यांनी काँग्रेसलाच हटविले. कोरोना काळात सर्व जग या महामारीशी झुंजत असताना मुंबईतील काँग्रेसचे कार्यकर्ते अन्य प्रांतातून आलेल्या मजूरांना परत आपल्या गावी पाठविण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर फुकट तिकिटे देत होते. सर्व देशभर कोरोना संक्रमित करण्यास त्यांनी मदत केली. हाताची स्वच्छता, मास्क, आणि दो गज दूरी, यात राजकारण कसले आले, हे तर सर्व विरोधी दलांनी जनतेला समजावून सांगितले असते तर, कोरोनाचा एवढा फैलाव झाला नसता. काँग्रेस इतिहासापासून काही शिकत नाही, म्हणून मोदी म्हणाले, ‘जो लोग इतिहास से सबक नहीं लेते वो इतिहास में खो जाते है!’
 
 
 
देशात महागाई वाढत चालली आहे, यावर राहुल गांधी, काँग्रेसचे नेते तुफान बोलत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुआच्या काळात असलेला महागाईचा दर आणि २०१४ ते २०२२ या काळातील महागाईच्या दराची आकडेवारी दिली. संपुआच्या काळात देशाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम जनतेला सांगतात की, महागाई सहन करायला पाहिजे. आपल्याकडे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नाही. लोकांना १५ रुपयांची पाण्याची बाटली आणि २०-२१ रुपयांचे आइस्क्रिम महाग वाटत नाही. पण, गव्हाचा दर एक रुपयाने वाढला तरी महाग वाटतो, ही चिंदबरम यांची वाक्ये मोदींनी वाचून दाखविली. अशी असंवेदनशील वक्तव्ये काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार केली जातात, याचे दाखले त्यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांच्यावर काँग्रेसचा आरोप असतो की, ते कधीही देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरु यांचे नाव घेत नाहीत. लोकसभेतील आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनाच अनेकवेळा कोट केले. त्यांच्या भाषणातील आणि पुस्तकातील मूळ उतारे वाचून दाखविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “वैसे महंगाई पर काँग्रेस के राज में पंडित नेहरुने लाल किले से क्या कहा, वो जरा आपको मैं बताना चाहता हूं, आपकी शिकायत रहती है की, मैं नेहरु पर नहीं बोलता हूं, लोेकिन आज आपकी इच्छा के अनुसार नेहरु ही, नेहरु पर बोलूंगा... मजा लिजिए आज. आपके नेता कहेंगे की, मजा आ गया.” मोदी म्हणाले, “नेहरुंनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना असे म्हटले की, कभी कभी कोरिया में लडाई भी हमें प्रभावित करती है, इसके चलते वस्तुओं की किमतें बढ जाती हैं और यह हमारे नियंत्रण से बाहर हो जाती हैं, अगर अमेरिका में भी कुछ हो जाता है तो इसका असर भी वस्तुओं की किमत पर पडता है, मतलब देश के सामने पहले प्रधानमंत्री महांगाई को लेकर अपने हाथ ऊपर कर देते है.”
 
 
 
राहुल गांधी यांनी गरीब भारत, श्रीमंत भारत, अदानी-अंबानींचा भारत आणि अन्य भारत अशी दोन भारताची कल्पना मांडली. तसा हा जुना विषय आहे. माझ्या माहितीप्रमाणे तसा तो प्रथम राममनोहर लोहिया यांनी मांडलेला आहे. बालबुद्धीचा नेता उधार उसणवारीवरच जगत असतो. उद्योगपती देशात संपत्ती निर्माण करतात. त्यांना ‘वेल्थ क्रिएटर’ असे म्हणतात. मोदींनी याची आठवण करुन देऊन नेहरु-इंदिरा गांधींच्या काळात हा देश टाटा-बिर्ला चालवितात, असे आरोप केले जात. हे आरोप करणारे आज काँग्रेसचे दोस्त आहेत. आपला इतिहास काय आणि आपल्या युक्तिवादात सुसंगती कोणती, हे ज्यांना समजत नाही त्यांनी युक्तिवाद करण्याच्या भानगडीत न पडलेले बरे. ‘भारत एक राष्ट्र नाही’ या पोरकट विधानाचा समाचार घेताना नरेंद्र मोदी यांनी विष्णु पुराणातील ‘उत्तरं यत समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणं, वर्षंतद भारतं नाम भारती यत्र संतति’, हा श्लोक आणि त्याचा अर्थ दाखविला आणि काही लोकांना हे आवडणार नाही, असे म्हणून पं. नेहरु यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’तील भारत एक राष्ट्र कसा आहे, हा परिच्छेद वाचून दाखविला. तो असा, “यह जानकारी बेहत ‘हैरत’ (गोंधळात) में डालने वाली है, बंगाली, मराठे, गुजराथी, तमील, आंध्र, उडिया, आसमी, कन्नड, मल्ल्याली, सिंधी, पंजाबी, पठाण, काश्मीरी, राजपूत हर हिंदुस्तानी भाषा भाषिक जनता से बसा हुआ विशाल मध्य भाग कैसे सेंकडो वर्षों से अपनी अलग पहचान बनायें है। इसके बावजूद इन सबके गुण-दोष कमबोज, एकसरिके है। इसकी जानकारी पुरानी परंपरा और अभिलेखों से मिलती है। साथ ही इस पुरे दौरान वे स्पष्ट रुप से ऐसे भारतीय बने रहे। जिनकी राष्ट्रीय विरासत एकही थी, और उनकी नैतिक और मानसिक विशेषताएँ भी समान थी।” राहुल गांधी यांनी तामिळनाडूवर केंद्र सरकार लादवणूक करीत असल्याचा आरोप करुन केंद्र आणि तामिळनाडू यांच्यात भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी ‘फोडा आणि झोडा’ या नितीने देशावर राज्य केले. काँग्रेसदेखील तीच निती अवलंबित आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काग्रेस ‘तुकडे तुकडे गँग’ची लीडर झालेली आहे हेदेखील त्यांनी सांगितले. तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या एक भारताच्या काव्यपंक्ती त्यांनी तमीळमध्ये वाचून दाखविल्या. ते म्हणाले, “राष्ट्र आमच्यासाठी जिवीत आत्मा आहे. राष्ट्र कोई सरकार की व्यवस्था नही.”
 
 
 
परिवारवाद हा लोकशाहीला धोका आहे, हे नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रजातंत्र आणि मुक्त चर्चा भारतात अनेक शतकांपासून चालू आहे. परंतु, काँग्रेसला परिवारवादाशिवाय दुसरे काही दिसत नाही. भारताला सर्वात मोठा धोका परिवारवादी पक्षांपासून आहे. परिवारवादी पक्षाकडून पहिला बळी उत्तम बौद्धीक क्षमता असणार्‍याचा घेतला जातो. महात्मा गांधींची इच्छा होती की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करावी. त्यांच्या इच्छेप्रमाणे झाले असते तर आपले प्रजासत्ताक परिवारवादापासून मुक्त झाले असते.सव्वा तासाहून अधिक चाललेल्या भाषणाची केवळ ही एक झलक आहे. ते मोदींचे भाषण आहे म्हणून चांगले आहे, असे नसून मुद्देसुद भाषण कसे करावे आणि आरोप करणार्‍यांच्या गळ्यात त्यांची मडकी कशी बांधावीत याचा हा उत्तम नमुना आहे. पं. नेहरु यांना उद्धृत करुन मोदींनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. राष्ट्रवादाचे संस्कार त्यांच्यावर संघात झाले. डॉ. हेडगेवार, गुरुजी, पं. दीनदयाळ उपाध्याय, दत्तोपंत ठेंगडी, यांना त्यांनी चुकूनही कोट केले नाही. नेहरुंना कोट केले. कारण आरोप करणारे नेहरु परिवारातील होते. आपल्या परिवाराचा मुखिया काय म्हणाला, हे सांगून त्यांनी त्या मुखियाच्या हातूनच पणतूच्या कानाखाली खेचली आहे. याला म्हणतात वक्तृत्व कौशल्य. लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे याचा अभ्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेतेपणाची हौस असणार्‍या मंडळींनी करायला पाहिजे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0