बॅडमिंटनचं साधं स्पेलिंगसुद्धा येत नसताना त्याच बॅडमिंटनमध्ये मानमरातब आणि विविध सन्मान प्राप्त करणारे क्रिडाक्षेत्रातील ८२ वर्षीय मनोहर गोडसे या बॅडमिंटनपटू तथा प्रशिक्षकाविषयी...
रायगड जिल्ह्यातील पेणजवळच्या ‘वरसई’ या लहानशा खेडेगावात १९४० साली जन्मलेल्या मनोहर गोडसे या बॅडमिंटनपटू तथा बॅडमिंटन प्रशिक्षक व संघटकाची क्रिडाक्षेत्रातील वाटचाल मोठी रंजक आहे. इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण गावी झाल्यानंतर गोडसे कुटुंबीय मुंबईत वास्तव्यास आले. त्यावेळी बॅडमिंटन हा खेळ असतो याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती, इतकंच काय बॅडमिंटन या शब्दाचे स्पेलिंगसुद्धा येत नव्हते. बालपणी समवयीन लहान मुलांप्रमाणे लगोरी, विटीदांडू, क्रिकेट वगैरे खेळ ते खेळत. तेव्हाचा माहौल क्रिकेटकेंद्रीच होता. इतकीच त्यांना क्रिडा क्षेत्राविषयी माहिती होती. त्यावेळी सुदैवाने त्यांच्या सोसायटीसमोर बॅडमिंटन कोर्ट होते. सोसायटीतील पुरुष मंडळी तेथे खेळत असत. त्यांचा खेळ संपला की, फेकून दिलेल्या शटल्स घेऊन टेबल टेनिसच्या आकाराच्या बॅटने मुले बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न करायची. हेच काय ते गोडसे यांच्यासाठी बॅडमिंटनचे प्राथमिक धडे!
त्याच सुमारास सोसायटीत नव्याने आलेल्या साठेनामक रहिवाशाच्या खेळाने गोडसे भारावून गेले. लिलया खेळामुळे सर्वजण त्यांना ‘स्प्रिंग साठे’ म्हणत. साठेनी गोडसे यांच्या खेळातील बॅकहॅन्डची स्तुती केली. गोडसेंना मात्र यातील ‘ओ की ठो’ माहित नसल्याने त्यांनी साठेंकडूनच माहिती घेत सोसायटीच्या भिंतीवर सराव सुरु केला. लहानपणी त्यांना मिळालेलं हे पहिलं कोचिंग. ‘एसएससी’ झाल्यानंतर अवघे सहा रुपये शुल्क असतानाही कोचिंगसाठी प्रवेश घेण्याबाबत त्यांची वडिलांना विचारण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. तरीही, संधी मिळेल तसे आऊटडोअर बॅडमिंटन खेळणे सुरुच होते. महाविद्यालयात प्रवेश न घेतल्यामुळे नोकरीची खटपट करीत असतानाच गोडसे अकाउंटंसीची लंडन ‘सर्टिफिकेट’ परीक्षा उत्तीर्ण करून ‘प्रिमियर ऑटोमोबाईल्स’मध्ये नोकरीला लागले. तिथे कॉलनीमध्ये इनडोअर बॅडमिंटन कोर्ट होते.पण, गोडसे मातीत विनाशुज आऊटडोअर खेळलेले असल्याने इथे शूज घालून खेळताच येईना. मग शूज काढूनच त्यांनी बॅडमिंटनमध्ये चमक दाखवली.
परिस्थितीमुळे महाविद्यालयामध्ये न जाता आल्यामुळे बाहेरून ‘कमर्शीअल आर्ट’च्या डिप्लोमाला ‘अॅडमिशन’ घेतले. वयाच्या २४व्या वर्षापर्यंत काहीच होईना म्हणून निराश होऊन अखेर त्यांनी बॅडमिंटनमध्येच काही तरी करण्याचा निर्धार मनाशी पक्का केला. बॅडमिंटनचे प्रशिक्षक नंदू नाटेकर यांच्या क्लबमध्ये जाऊन कोपर्यात लपुनछपुन या खेळातील बारकावे हेरले. एकप्रकारे द्रोणाचार्य आणि एकलव्य, असा नवा अध्याय सुरु झाला. नंदूसारखे नाही, तरी काही अंशी त्यांच्यासारखे बनण्याचे ध्येय मनी बाळगले, असे गोडसे सांगतात. सोसायटीत बॅडमिंटनच्या तिन्ही इव्हेंट्समध्ये अनेक वर्षे पहिले बक्षीस सोडलेच नाही. स्टेट लेव्हल टूर्नामेंट्स गाजवल्यानंतर मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, बडोदा आदी ठिकाणच्या अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या. काही वर्षांनी त्यांना त्यांच्या बॅडमिंटनमधील देवाबरोबर पार्टनरशिपमध्ये खेळण्याची संधी लाभली. हिंदू जिमखान्यावर राज्यस्तरीय स्पर्धेत उपांत्यफेरीचा सामना सुरेश गोयल या अत्यंत नावाजलेल्या खेळाडूसोबत हरल्याची आठवणही गोडसे सांगतात. पण, त्या हरलेल्या सामन्यातूनच त्यांना मौलिक प्रशिक्षण मिळाले.
१९६७ ते १९८४ पर्यंत वालचंद ग्रुपच्या बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये गोडसे अजिंक्य होते. लालचंद हिराचंद व त्यांच्या कुटुंबामधील सर्वजण आणि अजित गुलाबचंद, हर्षद दोशी वगैरे प्रतिष्ठित लोक गोडसे यांना, ते येईपर्यंत सामना सुरु करू नका, अशी विनंती करायचे. हे मोठंच भाग्य होतं, असे गोडसे आवर्जुन नमुद करतात. बॅडमिंटनमध्ये जिल्हा, राज्य स्तरावर तसेच ‘नॅशनल चॅम्पियनशिप’मध्ये त्यांना पुरस्कार मिळत होते. ‘नॅशनल चॅम्पियनशिप’मध्ये चार रौप्य पदके मिळाली, १९८९ मध्ये दोन वेळा ऑल इंग्लंड व्हेटरन्समध्ये त्यांना खेळायला मिळाले. १९९० साली मात्र निवड होऊनही ते इंग्लडला जाऊ शकले नाही.
बॅडमिंटनचे खेळाडू ते प्रशिक्षक या प्रवासासाठी नंदु नाटेकर यांच्या तीन दिवसांच्या कोचिंगच्या मार्गदर्शनाचा लाभ झाल्याचे गोडसे सांगतात. वयाच्या साधारण ३५व्या वर्षी त्यांनी लहान मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पैशांच्या मागे न धावता त्यांनी अनेक चॅम्पियन तयार केले. २० वर्ष कोचिंगच्या अनुभवामुळे वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी ‘मनोरा बॅडमिंटन अकॅडमी’ स्थापन करून १९९७ मध्ये मुंबईभर दहा, १३ आणि १६ वर्षांच्या मुलामुलींसाठी स्पर्धांचे आयोजन सुरू केले. २०१९ पर्यंत तब्बल १०७ स्पर्धा आयोजित केल्या. यासाठी त्यांनीच प्रशिक्षीत केलेल्या खेळाडूंची तसेच माजी बॅडमिंटनपटू मित्रांचीही साथ लाभली. विशेष म्हणजे, त्यांच्या अकॅडमीचे मेम्बरशिप शुल्क, जे १९९६ मध्ये ५१ रुपये होते ते आजही तेवढेच असल्याचे गोडसे आवर्जुन सांगतात. जबरदस्त इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता, असा संदेश ते युवा पिढीला देतात. असा हा बॅडमिंटनमधील चिरतरूण मनोरा आजही त्याच उमेदीने सज्ज आहे. त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!