बीज अंकुरे अंकुरे... भाग १

08 Feb 2022 12:24:58
 
बीज अंकुरे अंकुरे
 
 
 
मातेच्या पोटी गर्भ राहिल्यावर त्यावर जे संस्कार, प्रभावी गुणांची वृद्धी होण्यासाठी जी चिकित्सा, उपक्रम, दिनचर्येचे पालन सांगितले जाते ते म्हणजे गर्भसंस्कार. पण, त्या आधी गर्भधारणेपूर्वी सुप्रजननासाठीदेखील काही उपाययोजना आयुर्वेदात सांगितल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतातच, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ तसेच शुद्ध बीज जर गर्भात आले, तर होणारे अपत्य हेदेखील उत्तम, आरोग्यपूर्ण असेल. 
 
 
 
उत्पत्ति-स्थिती-लय, जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू होतो, हे सत्य म्हणजे काळ्या दगडावरची रेघ होय. मनुष्य जन्म अन्य सर्व सजीव गोष्टींप्रमाणेच नश्वर आहे. काही व्यक्ती खूप काही घडवून जातात, तर काही काळाच्या पडद्यामागे असेच विरुन जातात. पण, प्रत्येक जीवाला आपला वारसा मागे सोडून जावासा नक्की वाटतो. मग त्यासाठी एखादा गुरू आपली विद्या शिष्यांना शिकवून अमर होतो. कोणी ऐहिक सुख-धन-संपत्ती आपल्या मुला-बाळांच्या नावे ठेवून त्यांच्या स्मरणात कायमचे राहतात. मनुष्याने वंशवेल वाढविणे हेदेखील याच पद्धतीचे एक वारसा पुढे नेण्याचेच काम आहे.
 
 
पूर्वीपासून जन्म-मृत्यू, प्रत्येक सजीव प्राण्याचे घडत आले आहे. त्यात काही नामशेष झाले. काहींमध्ये बदल होत गेले. मनुष्यातही असेच बरेच बदल होत गेले व त्याला सध्याचे स्वरुप प्राप्त झाले. काही आजार विशेष कुटुंबांमधून अधिक प्रखरतेने आढळतात. काही शारीरिक भाव (जसे उंची, डोळ्यांचा रंग, केसांचे प्रमाण इ.) देखील अनुवांशिकरित्या पुढील पिढीत येतात. हे सगळं घडतं ते अनुवांशिकतेमुळे!
 
 
उत्क्रांतीच्या काळातील बदल आपण शालेय अभ्यासक्रमात वाचतो. पण, त्या बदलांनंतरही अनेक बदल घडत आहेत. उदाहरणार्थ, काही बदल इथे बघूयात. ‘अपेंडिक्स’ नावाचा एक अवयव प्रत्येक मनुष्याच्या पोटात उजव्या बाजूस असतो. त्याला आपण ‘वेस्टिजिनल ऑर्गन्स’ म्हणतो. त्याचे पूर्वी (आदिमानव काळात) महत्त्वाचे कार्य होते. जेव्हा मांसभक्षण मोठ्या प्रमाणात केले जाई, कच्चे मांस, न शिजविलेले अन्नधान्य, रानातील कंदफळे असा आहार होता, त्यावेळी ‘अपेंडिक्स’ चे कार्य महत्त्वाचे होते. हळूहळू मनुष्य प्रगत होता गेला. जंगलातून- गावात, गावातून वसाहतीत राहू लागला. वेगवेगळ्या पद्धतीने मांस शिजवू लागला. (भाजणे, फोडणी देणे, विविध मसाले वापरणे इ.) हे मांस पचण्यास पहिल्यापेक्षा सोपे व हलके झाले. ‘अपेंडिक्स’चे कार्य हळूहळू कमी होत गेले आणि आता ते केवळ नाममात्र मनुष्य शरीरात राहिले आहे.
 
 
असाच अजून एक बदल म्हणजे आपले दात. जेव्हा आदिमानव कच्चे अन्न अधिक खायचा, तेव्हा ते चावावे लागे. मांस, झाडांची मुळे इ. तोडणे, चावणे, चावा घेणे यासाठी खपलळीेीी दात (पुढच्या पाच दातांच्या मागील दोन-दोन सुळे) खूप धारदार होते. चावा घेण्यासाठी पुढील दातही खूप मजबूत होते. दात आकारालाही मोठे होते, पण मनुष्यप्राणी अन्न शिजवून खाऊ लागला, दातांची मजबूती पहिल्यापेक्षा कमी होत गेली.
 
 
अशाच पद्धतीने अंगावरील लवदेखील कमी होत गेलेली दिसून येते. वरील सर्व बदल काळानुरुप घडत गेले. ज्या जाती-प्रजाती बदल सामावून घेत गेले, ते उत्क्रांत होत गेले, ते जगले आणि ते तरले. बाकी जाती-प्रजाती नामशेष झाल्या. मागील एक-दोन शतकांपासून मनुष्य जीवनात तंत्रज्ञान आल्यामुळे खूप बदल झटकन घेताना दिसून आले आहे. गेल्या एक-दोन दशकांत तर संगणकामुळे सगळेजण ‘अॅट वन्स फिंगरटीप्स’ असे झाले आहे. ‘कोविड’च्या काळात मोबाईल, लॅपटॉप इ. तर गरजेच्या गोष्टींमध्ये गणले जाऊ लागले. या सगळ्यांमुळे शारीरिक हालचाल मर्यादित, मानसिक-भावनिक ताणतणाव अधिक व सामाजिक भावसंबंधांचा लोप होताना मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.
 
 
या सगळ्या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर वयोमर्यादेवर होतच आहे. औषधोपचार व शस्त्रक्रियांमुळे वयोमर्यादा तर वाढत आहे, पण, आरोग्य-सुख-समाधान वाढतंय का, याचा प्रत्येकाने विचार करावा. मोडकळीस आलेल्या इमारतीला टेकू देऊन उभे केल्यासारखे औषधोपचारांचा टेकू दिऊन आयुष्यमान वाढलेले बरेचदा दिसून येते.
 
 
मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड ग्रंथीचे अनियमित कार्य, स्थौल्य, नैराश्य, व्यसनाधीनता इ. चे प्रमाण वाढताना दिसत आहे. केवळ प्रमाणच नव्हे, तर वरील आजार खूप लवकर कमी वयात होताना आढळू लागले आहेत. 15-20 वर्षांपूर्वी सेवानिवृत्तीच्या वेळेस मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होई. त्यानंतर पन्नाशीच्या अलीकडे हे रोग जडू लागले. हल्ली अशी परिस्थिती आहे की, चाळीशीच्या घरातच अनेकांमध्ये वरीलपैकी एक ना दोन तक्रारी लक्षणे असतातच!
 
 
काहींमध्ये लग्नापूर्वीपासून मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असतो. ही आजाराची वाढलेली वयोमर्यादा व आरोग्याची ढासळलेली गुणवत्ता खूप घातक आहे. हे आजार जेवढे तारूण्यात होतील तेवढे ते पुढच्या पिढीत लवकर रुजण्याची शक्यता असते. अशा दोषांना पुढील पिढीत जाण्यापासून रोखणे, थोपवणे गरजेचे आहे. यासाठी वंशवेल सुदृढ उत्पन्न व्हावी म्हणून ‘गर्भसंस्कार’ या संकल्पनेची आता काळानुरूप गरज नक्कीच वाढलेली आहे. आयुर्वेदामध्येसंस्कारांपूर्वी सुप्रजननेसाठीदेखील काही उपाययोजना सांगितल्या आहेत. मातेच्या पोटी गर्भ राहिल्यावर त्यावर जे संस्कार, प्रभावी गुणांची वृद्धी होण्यासाठी जी चिकित्सा, उपक्रम, दिनचर्येचे पालन सांगितले जाते ते म्हणजे गर्भसंस्कार. पण, त्या आधी गर्भधारणेपूर्वी सुप्रजननासाठीदेखील काही उपाययोजना आयुर्वेदात सांगितल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतातच, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ तसेच शुद्ध बीज जर गर्भात आले, तर होणारे अपत्य हेदेखील उत्तम, आरोग्यपूर्ण असेल.
 
 
हल्ली बाळंतपणापूर्वी समुपदेशन केले जाते. याची जशी गरज आहे, तशीच गरज सुप्रजननाचीही आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये एक किंवा जास्तीत जास्त दोन अपत्ये जन्मास येतात. यांचे जर शारीरिक, मानसिक स्वास्थ्य नीट नसेल, तर संपूर्ण घर त्या अपत्याभोवती फिरत असते. पण, जर त्यांचे आरोग्य व उत्तम करता आले, बीजातील दोष बीजावस्थेतच निर्मूलित केले, तर होणारे अपत्य चांगलेच जन्माला येईल.
 
 
यासाठी आयुर्वेदात खूप विस्तृतपणे सांगितले आहे. गर्भधारणेची वयोमर्यादा, गर्भधारणेचा काळ, गर्भधारणेसाठी कोण योग्य - कोण अयोग्य इ. पुढील लेखमालिकेतून आपण यावर अधिक जाणून घेऊया...
 
Powered By Sangraha 9.0