धारावीचा काळा किल्ला मरणासन्न अवस्थेत

06 Feb 2022 21:07:25

dharavi



मुंबई:
धारावीतील ‘राज्य संरक्षित स्मारक’ असणारा 'काळा किल्ला' सद्यःस्थितीत मद्यपींचा अड्डा बनल्याचे चित्र आहे. परिसरातील गर्दुल्ले या गडाचा उपयोग मद्य पिणे, चरस, गांजा ओढणे यांसाठी करत असून गडावर दिवसाढवळ्या हे प्रकार चालू आहेत. गडावर मद्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे. पुरातत्व विभाग आणि शासनकर्ते यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या गडाचे ऐतिहासिक स्वरूप नष्ट झाले आहे.


मिठी नदीच्या पात्रात उभारण्यात आलेला काळा किल्ला मुंबईचे अध्यक्ष आणि गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी वर्ष १७३७ मध्ये बांधला,अशा आशयाची इंग्रजी अद्याक्षरात पाटी गडावर लिहिलेली आहे. हा किल्ला नदीच्या पात्रात असला, तरी सद्यःस्थितीत गडाच्या चारही बाजूने झोपडपट्टी आणि घरे बांधण्यात आली आहेत. हा गड सर्व बाजूंनी झोपडपट्टीने वेढल्यामुळे ‘येथे गड आहे’, हेच प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. गडावर चढण्यासाठी मार्ग नाही. गडावर चढण्यासाठी एक साधा लोखंडी पुलाची सोय करण्यात आली आहे. गडाची एकंदरीत दुरवस्था पाहिल्यास ‘पुरातत्व विभागाने हा गड मद्यपींसाठी आणि गर्दुल्यांसाठी सोडून दिला आहे का ?’ असा प्रश्न पडतो.


या किल्ल्यावर आत जाताच एक प्राचीन विहीर आहे. सध्या विहिरीवर लोखंडी जाळीचे झाकण बसवण्यात आले आहे; मात्र ही विहीर तरीही प्लास्टिक, कचरा आणि घाणीने भरून गेली आहे. गडाच्या एका कोपर्‍यात कोंबड्यांचा लोखंडी खुराडा आहे, सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच आणि घाणीचे साम्राज्य असून या गडाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मद्याच्या मेजवान्या, नशा करण्याचे ठिकाण तसेच आजूबाजूच्या खासगी कामांसाठी सध्या गडाचा वापर होत आहे.

पुरातत्व विभागाने गेल्यावर्षी आम्ही मागे लागल्यामुळे इथे स्वच्छता केली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही पुरातत्व विभागाच्या मागे लागलो आहोत की किल्ल्याचे संवर्धन करा. २०१२-१३ साली मी माझ्या मंडळाच्यावतीने १५ ट्रक कचरा काढला. पण पुरातत्व विभाग याकिल्ल्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. या किल्ल्याचे पालकत्व आम्हाला द्या अशी मागणी केली होती; मात्र जाचक अटी आमच्यावर लादल्या गेल्या. डीआरपीच्या अंतर्गत या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक कोटींचा निधी पास झालेला आहे. हा फंड कुठे गेला हेही दाखवायला तयार नाही.

- गणेश खाडे, सामाजिक कार्यकर्ते


आम्ही पाठपुरावा करून धारावीतील काळ्या किल्ल्याचे संवर्धन करावे यासाठी प्रयत्न केले. आमच्या पाठपुराव्याला यशही आले. राज्यात भाजपचे सरकार असताना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोदजी तावडे यांनी या किल्ल्याच्या जतन आणि दुरुस्तीसाठी 84 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली होती. मात्र त्यांनंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या गडाच्या संवर्धनासाठी काहिही केलं नाही.


- दिव्या ढोले, भाजप नेत्या
Powered By Sangraha 9.0