अन्सारींचा घाट्याचा राजकीय व्यवसाय

05 Feb 2022 13:20:23

Ansari
 
 
मोहम्मद हमीद अन्सारी धार्मिक अर्थाने हिंदू परिवारात येत नाहीत. म्हणून अशा मुसलमानांचे हिंदूविरोधी बोलणे हे औरंगजेबी आणि अफजलखानी बोलणे होते. हिंदूमनावर त्याचा जबरदस्त नकारात्मक परिणाम होतो. कालपर्यंत स्वतःला हिंदुत्त्ववादी न समजणारे अशा मोहम्मद अन्सारी बोलण्याने हिंदुत्त्ववादी व्हायला लागतात. म्हणूनच ‘मोहम्मदभाई यह घाटे का धंदा है’, जरा समजून घ्या.
 
 
मोहम्मद हमीद अन्सारी हे अधूनमधून ठळक बातम्यांचा विषय होत असतात. कोण हे मोहम्मद हमीद अन्सारी, याची माहिती करुन घेऊया. मोहम्मद हमीद अन्सारी २००७ ते २०१७ या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणून अन्सारी राज्यसभेचेदेखील अध्यक्ष होते. भारतीय विदेश सेनेत त्यांनी ३८ वर्षे काढली. बगदाद, रबात, ब्रुसेल्स, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, युनो इत्यादी ठिकाणी त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे उपकुलगुरु म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला. थोडक्यात त्यांची प्रशासकीय कारकिर्द आणि सार्वजनिक कारकिर्द फार मोठी आहे. उपराष्ट्रपतीपद हे संवैधानिक पदातील दुसरे महत्त्वाचे पद आहे. या पदावर बसलेल्या व्यक्तीने विवादास्पद पक्षीय राजकारणात पडायचे नसते. निवडून येताना तो पक्षाचा प्रतिनिधी असतो. निवडून आल्यानंतर तो राष्ट्राचा प्रतिनिधी होतो. निवृत्तीनंतर पक्षीय राजकारणावर अशा व्यक्तीने टीका-टिप्पणी करु नये. पक्षीय राजकारण हे चिखलाचे राजकारण असते, म्हणजे एकमेकांवर चिखल फेकण्याचे राजकारण असते, अशा राजकारणात उतरले की, आपल्याही अंगावर चिखल उडणार आहे याचे भान ठेवावे लागते. उपराष्ट्रतींसमोर या महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या अशा चिखलाच्या राजकारणाची होळी खेळू नये.
 
 
सामान्य माणसाला चार समजुतीच्या गोष्टी सांगणे सोपे असते. पण, करिअर डिप्लोमॅटला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगणे निरर्थक असते. कारण, तो स्वतःला सर्व विषयातील तज्ज्ञ समजत असतो. मोहम्मद हमीद अन्सारीचे असे झाले आहे. त्यांच्यापूर्वी ए. पी. जे. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते. लोक असं म्हणतात की, त्यांच्यासारखा राष्ट्रपती झाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात आपले नशीब असेल तर होईलही. ते राष्ट्रपती असताना आणि निवृत्त झाल्यानंतरही सर्व प्रकारच्या विवादापासून शेकडो हात दूर राहिले. राष्ट्राची सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. ते जात, धर्म आणि पक्ष यांच्या पलीकडे गेले.
 
 
मोहम्मद हमीद अन्सारी आपण मुसलमान आहोत हे विसरत नाहीत, आपण काँग्रेसचे आहोत हे तर अजिबात विसरत नाहीत. मुसलमान आणि काँग्रेसचे असल्यामुळे हिंदूविरोध ते विसरत नाहीत. त्यांना जर थोडेसे जरी राजकीय शहाणपण असते तर सध्याचा कालखंड हिंदूविरोधी राजकारणाचा नाही. असे राजकारण वजाबाकीचे राजकारण असते, हे त्यांच्या लक्षात यायला हरकत नाही. हिंदूविरोधाचे राजकारण शशी थरुर, दिग्विजय सिंग अशी काँग्रेसची नेतेमंडळी करीत असतात. पण, ते हिंदू आहेत (नावापुरते का होईना) त्यामुळे त्यांचे बोलणे घरातील माणसाने शिव्या घातल्यासारखे होते. मोहम्मद हमीद अन्सारी धार्मिक अर्थाने हिंदू परिवारात येत नाहीत. म्हणून अशा मुसलमानांचे हिंदूविरोधी बोलणे हे औरंगजेबी आणि अफजलखानी बोलणे होते. हिंदू मनावर त्याचा जबरदस्त नकारात्मक परिणाम होतो. कालपर्यंत स्वतःला हिंदुत्त्ववादी न समजणारे अशा मोहम्मद अन्सारी बोलण्याने हिंदुत्त्ववादी व्हायला लागतात. म्हणूनच ‘मोहम्मदभाई यह घाटे का धंदा है’, जरा समजून घ्या.
नुकतेच मोहम्मद हमीद अन्सारी यांचे इंडियन-अमेरिकन मुस्लीम कौन्सिलपुढे एक भाषण झाले. ते म्हणाले,“देश आपल्या संविधान मूल्यांपासून दूर जात आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी चिंता व्यक्त केली. आताच्या काही वर्षांत असे वारे वाहताना आणि व्यवहार होताना दिसतो, जो प्रस्थापित नागरिक राष्ट्रवादाच्या विरोधात आहे. सांस्कृतिक, राष्ट्रवादाच्या काल्पनिक संकल्पनेला लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे. निवडणुकांती बहुमताला धार्मिक बुहमतात रुपांतरित करण्याचा हा प्रयत्न आहे. राजकीय शक्तीवर एकाधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा लोकांना राजकीय आणि कायदेशीर आव्हान देण्याची गरज आहे.”
 
 
मोहम्मद अन्सारी यांचा संकेत भाजप आणि भाजपच्या विचारधारेकडे आहे, हे न सांगताच शेंबड्या पोरालादेखील समजेल. याचा अर्थ असा झाला की, माजी उपराष्ट्रपतींनी राजकीय धुळवड सुरु केली आहे. त्यांनी चिखल फेकला, मग भाजपवाले स्वस्थ कसे बसणार? मुख्तार अब्बास नक्वींपासून ते परराष्ट्र व्यवहार उपमंत्र्यांपर्यंत सर्वांनी हमीद अन्सारी यांना झोडून काढले आहे. ही अशी धुळवड राजकारणात रोजच चालते. योगी आदित्यनाथ विरुद्ध अखिलेश, उद्धव-संजय राऊत विरुद्ध भाजप, राहुल गांधी विरुद्ध भाजप, अशी होळी आपण रोज पाहत असतो. एका वाक्यात सांगायचे तर लोकांना आता या सर्वांचा वीट आलेला आहे. लोकं म्हणतात, ‘बडबड बंद करा आणि कामं करा.’
 
 
मोहम्मद हमीद अन्सारी यांनी खेळात उतरुन उपराष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळविली आहे, याचे वाईट वाटते, असे असले तरी मोहम्मदभाईंनी जी चिंता व्यक्त केली आहे, तिचा आपण राजकारणापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. क्षणभर आपण असे मानूया की, मोहम्मद हमीद अन्सारी यांनी मुसलमान म्हणून ही चिंता व्यक्त केली नसून या राष्ट्राचा एक घटक म्हणून ही चिंता व्यक्त केली आहे. या भूमिकेतून या चिंतेकडे बघितले तर हिंदुराष्ट्र मांडणार्‍यांपुढे प्रश्न उपस्थित होतो की, आपल्या विचारासंबंधी अशी शंका दुसर्‍याच्या मनात का निर्माण व्हावी? आपण आपले प्रतिपादन करीत असताना कुठे कमी पडतो का? ही कमतरता कशी दूर करता येईल? मुळात सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार हा आपल्या देशापुरता मर्यादित नाही, तो जागतिक आहे. प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रवाद हा सांस्कृतिक राष्ट्रवादच असतो. ब्रिटनचा राष्ट्रवाद हा प्रोटेस्टंटपंथीय राजघराणे आणि संसद यातून तयार होतो. या सांस्कृतिक राष्ट्रवादाची हजार वर्षांची परंपरा आहे. आयरिश राष्ट्रवाद, कॅथोलिक पंथातून निर्माण होतो. आयरिश राज्यघटनेच्या उद्देेशिकेत ‘होली ट्रिनिटी’ हे शब्द आहेत. त्याचा अर्थ असा की, आम्ही बायबल, आकाशस्थ पिता, त्याचा पुत्र येशू आणि पवित्र आत्मा यांना मानणारे आहोत, यातून त्यांचा ‘सिव्हील राष्ट्रवाद’ म्हणजे ‘नागरी राष्ट्रवाद’ याचा जन्म झालेला आहे. अमेरिकेमध्ये जोेसेफ नाय यांनी ‘सॉफ्ट पॉवर’चा सिद्धांत मांडला. ते म्हणतात की, “अमेरिकेची एक संस्कृती आहे आणि ही सांस्कृतिक मूल्ये घेऊन अमेरिकेने जगापुढे गेले पाहिजे.”
 
 
दुसर्‍या भाषेत ते सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी करतात. अलिगढ विद्यापीठाचे उपकुलगुरु असणार्‍याला हे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. हिंदुराष्ट्राची मांडणी करीत असताना आपल्यालाही ती काळाच्या संदर्भात करता आली पाहिजे. हिंदू राष्ट्रवाद हा उपासना पंथधारी राष्ट्रवाद नाही. अन्सारींच्या भाषेत सांगायचे तर धार्मिक राष्ट्रवाद नाही, तो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. ही संस्कृती साहित्य, कला, संस्कृती, भाषा, तत्त्वज्ञान, कुटुंबव्यवस्था अशा अनेक अंगातून व्यक्त होते. ती समृद्ध करण्याचे काम ज्या ज्या लोकांनी केले ते सर्व राष्ट्रपुरुष! बडे गुलाम अली खाँ जरी खान असले तरीही या संस्कृतीचे ते महान रक्षक आणि पुजारी होते. बिसमिल्ला खाँ यांच्या सनई वादनाशिवाय कोणतेही मंगलकार्य पूर्ण होत नाही. मदारी मेहतरशिवाय शिवचरित्र अपूर्ण आहे. राष्ट्रवादाशी धर्माचा काहीही संबंध नसतो. अन्सारी यांच्या डोक्यात जिनांचा मुस्लीम द्विराष्ट्रवाद असावा, म्हणून अधूनमधून ते आम्हाला हिंदूंपासून धोका आहे, अशी गरळ ओकत असतात. पण, या लेखाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे अन्सारींच्या अशा बोलण्याचा हिंदू माणसावर फक्त नकारात्मक परिणाम होतो. दूरचित्रवाहिन्यांना दिवसभर चालविण्यासाठी बातमी मिळते, पण तिचे राजकीय परिणाम काँग्रेसला अतिशय घाट्याचे आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे जाता जाता सुचवावेसे वाटते.
 
 
Powered By Sangraha 9.0