वृक्षसंवर्धनाच्या कामाचा वसा घेऊन आपल्या ‘ग्रीन अंब्रेला’ संस्थेअंतर्गत देशी वृक्षांच्या रोपणाची चळवळ उभी करणाऱ्या विक्रम सुधाकर यंदे यांच्याविषयी...
वृक्षारोपणाचे पेव सध्या फुटले आहे. दरवर्षी शासन आणि सेवाभावी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वनीकरणाचे उपक्रम राबवले जातात. मात्र, वृक्षारोपण करताना बऱ्याचदा देशी वृक्षांकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच लागवड करण्यात आलेल्या रोपट्यांच्या भविष्याबाबतही कानाडोळा केला जातो. मात्र, मुंबईतला एक तरुण देशी झाडांचे शास्त्रोक्त संवर्धन आणि त्यांच्या रोपणासाठी झटतो आहे. आपल्या ’ग्रीन अंब्रेला’ या संस्थेअंतर्गत विविध झाडांच्या बिया गोळा करून त्यांची रोपटी बनवतो. मग रस्त्यांच्या कडेला किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत त्यांची लागवड करतो. इमारतींवर उगवलेल्या वनस्पती काढून त्यांचे तो पुनर्रोपण करतो. या उपक्रमात विशेषतः भारतीय झाडांच्या बिया गोळा करण्यावर भर दिला जातो. कारण, भारतीय झाडे ही जैवविविधतेची निर्माती आहेत. दरवर्षी १५ ते १८ हजार रोपटी तयार करुन त्यांचे रोपण करणारा हा तरुण म्हणजे विक्रम यंदे!
विक्रम यंदे यांचा जन्म दि. १७ सप्टेंबर, १९८४ साली ठाण्यात झाला. ठाण्याच्या बेडेकर विद्यामंदिरात त्यांचे शिक्षण झाले. त्यावेळी ठाणे आणि त्यांच्या शाळेचा आसपासचा परिसर वनसमृद्ध होता. शिवाय शाळेच्या परिसरात जुने वाडे आणि त्याठिकाणी पुरातन वृक्षदेखील होते. विक्रम त्याठिकाणी आपल्या मित्रांसमेवत फेरफटका मारण्यास जात असत. त्यातूनच त्यांना जुन्या वास्तूंची आवड निर्माण झाली आणि पर्यायाने निसर्गाप्रती उत्सुकताही वाढली. ही उत्सुकता शमवण्यासाठी हे मित्र येऊरच्या जंगलात ‘सायकलिंग’ करायला जायचे. त्यामुळे विक्रम यांची पर्यावरणाची आवड जपली गेली. बेडेकर महाविद्यालयामध्ये असताना त्यांनी ’नेचर क्लब’चे सदस्यत्व स्वीकारले. त्या क्लबच्या वृक्षरोपणाच्या मोहिमांमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर एका सामाजिक संस्थेसाठी वृक्षारोपणाच्या मोहिमा राबविताना त्यांना वृक्षासंबंधी जिव्हाळा निर्माण झाला. हे सगळं करताना देशी झाडे आणि विदेशी झाडे यांमधील फरक त्यांच्या लक्षात आला. आपल्या आसपास विदेशी झाडांची लागवड होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या देशी झाडांच्या रोपणाची चळवळ उभारण्याचा विचार त्यांच्या मनी आला. त्यासाठी त्यांनी झाडांचा अभ्यास सुरू केला. वटपौर्णिमेला सगळीकडे वडाच्या फांद्या तोडल्या जात असल्याचे विक्रम यांच्या लक्षात आले. या समस्येवर उत्तर शोधत असताना त्यांना इमारतींच्या भिंतींमध्ये वडाची रोपटी आढळली. तिथून मित्रांच्या मदतीने अशी झाडे त्यांनी काढली आणि ती कुंडीत लावली आणि जगवलही. विक्रम यांच्या आईने या कुंडीतील वडावरच वटपौर्णिमेची पूजा केली. यामुळे आपण अशा प्रकारे इमारतीवर नैसर्गिकरित्या उगवलेली झाडे काढून त्यांचे योग्य पद्धतीने आणि मोकळ्या जागेत रोपण करु शकतो, याबाबत त्यांना निश्चिती मिळाली. त्यामुळे इमारतीवर उगवलेली झाडे ‘रेस्क्यू’ करण्याची मोहीम सुरू झाली. त्या माध्यमातूनच २०१२ पासून विक्रम यांनी ’ग्रीन अंब्रेला’ या संस्थेची सुरुवात केली. संस्थेच्या इतक्या वर्षांच्या प्रवासानंतरही आणि वृक्षसंवर्धनातील अनेक प्रयोगांनंतर आजही विक्रम यांनी ही ‘रेस्क्यू’ मोहीम सुरू ठेवली आहे. अशा ‘रेस्क्यू’ मोहिमांसाठी २५ हजार रोपट्यांचे लक्ष्य संस्थेने निर्धारित केले आहे. शिवाय उंच इमारतींवर उगवलेल्या झाडांना ‘रेस्क्यू’ करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे.
स्थानिक झाडे ओळखून विक्रमने त्यांच्या बिया गोळा करण्यास सुरुवात केली. त्याची रोपे तयार करुन मुंबई-ठाण्यातील उद्यानामध्ये ती लावण्यास सुरुवात केली. यादरम्यान आपल्याकडे रस्त्यांच्या बाजूला ८० टक्के झाडे ही शोभेची आणि उरलेली २० टक्के झाडे देशी प्रकारची लावली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे निसर्गाचा समतोल राखला जात नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी इतर झाडांच्या देशी प्रजाती शोधल्या. त्याची रोपे आणि लागवड प्रक्रिया सुरु केली. मात्र, या कामाकरिता रोपवाटिकेची जागा ही ’ग्रीन अंब्रेला’समोरची सर्वात मोठी समस्या होती. कळव्यामध्ये तीन वर्षे संस्थेची रोपवाटिका होती. परंतु, स्थानिक नगरसेवकाने त्या उद्यानाच्या जागेत शौचालय बनवायला घेतल्याने रोपवाटिका तेथून हटवावी लागली. त्यानंतर विक्रमला विक्रोळीत ‘गोदरेज’ने दिलेल्या जागेत नर्सरी तयार केली. शिवाय वसईतही रोपवाटिका आहे. महामार्गावरील वृक्षरोपणाची कमतरता विक्रम यांच्या लक्षात आली. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर योग्य जागा शोधून खड्डे खणणे, झाडे लावणे, गवत काढण्याचे काम त्यांनी सुरू केले. गेल्या सहा वर्षांमध्ये अडीच हजारांहून अधिक झाडांची त्यांनी या महामार्गालगत लागवड केली, तर साडेतीन हजार पिंपळाच्या झाडाचे रोपण त्यांनी केले. ही झाडे तीन-चार वर्षांची होईपर्यंत त्यांची काळजी घेतली. त्यामुळे लावलेल्या रोपांपैकी ९५ टक्के रोपे जगतात.
विक्रम आपल्या नर्सरीत दुर्मीळ देशी झाडांचे रोपणही करतात. यामध्ये काटेसावर, कौशी, किन्हई, नाद्रूक, नेवरी, मोई, धामण, मेडशिंगी, माकडलिंबू, फासला अशा अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. त्यांनी रोपवाटिकेत तयार केलेली रोपे अनेक संस्था घेऊन जातात. तसेच गृहनिर्माण संस्थांच्या आवारातही त्याची लागवड केली जाते. दरवर्षी रोपवाटिकेत १५ ते १८ हजार रोप विक्रम तयार करतात. निसर्गसंवर्धनाच्या कामातील योगदानासाठी संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विक्रमलाही ठाणे महापालिकेचा ‘ठाणे गुणिजन’ पुरस्कार मिळाला आहे. वृक्षसंवर्धनासाठी झटणाऱ्या या तरुणाला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!