लोकसंगीतावर अपार श्रद्धा ठेवणारा आनंद

27 Feb 2022 20:43:47

Anand Patil
 
 
बालपणापासून आगरी कोळी संगीतात गोडी असलेल्या आनंद पाटील यांचे नाव आगरी कोळी लोकसंगीतात एक गायक म्हणून सुपरिचित आहे. जाणून घेऊया त्यांच्या संगीतमय प्रवासाविषयी...
 
 
आनंद पाटील यांचा जन्म डोंबिवली पश्चिमेकडील चिंचोड्याचा पाडा येथे झाला. वडील परशुराम पाटील हे संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील त्या जमान्यातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाव. महाराष्ट्र शासनाने त्यांना कलावंत दर्जा देऊन मानधनदेखील दिले होते. घरात वडिलांकडून आलेला संगीत आणि क्रीडा क्षेत्राचा वारसा आनंद यांच्या अंगीदेखील होता. बालपणापासून कबड्डी, क्रिकेट या मैदानी खेळांसोबत आनंद यांनी लोकसंगीताचा कित्ताही गिरवला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे जिल्हा परिषदेच्या रागाई मंदिर परिसरातील शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यामंदिर येथे झाले. वडिलांच्या सोबतीने आनंद नेहमी गायनाचा सराव करीत असत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मध्य रेल्वेमध्ये नोकरी पत्करली. नोकरीसोबत त्यांनी गायनदेखील सुरू ठेवले. पुढे नोकरीत त्यांचे मन रमेना झाले. संगीत आणि गायनाच्या आवडीपायी त्यांनी रेल्वेतील नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ संगीत क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. त्यादरम्यान त्यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन ‘आदर्श ग्रुप ऑर्केस्ट्रा’ तयार केला. नियमित सराव आणि जुन्या नव्या गाण्याचा संगीत कार्यक्रम सुरू केला. आगरी कोळी समाजात लग्नसमारंभ आणि हळदीला संगीत कार्यक्रम ठेवण्याची प्रथा आहे. अल्पावधीतच आनंद यांच्या ऑर्केस्ट्राला अनेक कार्यक्रमांच्या ऑर्डर मिळू लागल्या. या कार्यक्रमातून मराठी, कोळीगीतांसोबत हिंदी चित्रपट गीतेदेखील आनंद सादर करू लागले. गायनाबरोबर आनंद की-बोर्डदेखील उत्तम वाजवतात. आपल्या म्युझिक ग्रुपच्या कार्यक्रमाची मुख्य जबाबदारी आनंद सांभाळतात. गायनासोबत वाद्यवृंद, साऊंड आणि लाईट व्यवस्था, गायकांची निवड असा त्यांच्या कार्यक्रमाचा पसारा असतो.
 
 
 
गायनाचा रियाझ ते स्वतः रोज करतात. कार्यक्रमाची ऑर्डर असली की, दोन-तीन दिवस आधी पूर्ण सेटअपसह ते आपल्या पूर्ण ग्रुपची सराव फेरी घेत असतात. आनंद साईभक्त असून साईबाबांची गाणी ते गातात. त्यांचे बंधू पायी चालत शिर्डी पदयात्रेचे आयोजन करीत असत तेव्हा आनंद त्या पदयात्रेत साईबाबांची गीते गात असत. सात दिवसांच्या पदयात्रेत रात्री मुक्काम असे त्या ठिकाणीदेखील ते साईभजने गात असत. कोळीगीत हा त्यांचा हातखंडा असला, तरी त्यांना किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांची गाणी गायला आवडतात. विविध खासगी संगीत अल्बमसाठी त्यांनी आतापर्यंत नऊ गाणी गायली आहेत. आपल्या गायनाविषयी सांगताना ते म्हणतात की, “आपण कधीही कोणत्या गायकांची नक्कल करत नाही. नेहमी स्वतःच्या शैलीत गात असतो. त्यामुळे गायकाची स्वतःची एक वेगळी छाप पडते. गायक आनंद शिंदे यांच्या शैलीचे मला नेहमी आकर्षण वाटते,” असेही ते आवर्जून सांगतात. संगीताव्यतिरिक्त आनंद हे एक उत्तम कबड्डीपटू आणि क्रिकेटपटू आहेत. शालेय जीवनापासून त्यांनी कबड्डी खेळातदेखील भरपूर प्रावीण्य प्राप्त केले. विविध राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. कबड्डीप्रमाणे ते क्रिकेटही उत्तम खेळतात. आतादेखील त्यांचे खेळणे सुरू आहे. खेळ खेळण्याने शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न राहते. त्याचा फायदा संगीत कार्यक्रम करताना होतो. उत्साह वाढतो, असे आनंद आवर्जून सांगतात.
 
 
 
आनंद यांच्या पत्नीला संगीताची ओढ नसली, तरी पत्नीची आपल्याला खूप मोलाची साथ मिळाल्याचे ते सांगतात. सरकारी नोकरी सोडून गाण्यात करियर करण्याच्या निर्णयावर पत्नीने कधीही आक्षेप घेतला नाही. या क्षेत्रात आपण कोणाला गुरू मानता, असे विचारल्यावर त्यांनी आपले वडील परशुराम पाटील यांना आपण आपले आदर्श मानतो, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षे हा संगीतमय प्रवास सुरू असताना कोरोनाच्या काळात मात्र इतर कलाकारांना जी झळ बसली तीच आनंद यांनादेखील बसली. मुळात कोरोनाच्या पहिल्या वर्षात तर लग्न सोहळे झालेच नाहीत. नंतर जे झाले त्यात असलेल्या निर्बंधामुळे संगीत कार्यक्रम करण्यास मनाई होती. अशा परिस्थितीत डगमगून न जाता आनंद यांनी कोरोनाच्या जाण्याची वाट पाहिली. त्यादरम्यान घरीच गाण्याचा सराव सुरू ठेवला. आनंद यांचे थोरले बंधू उत्तम आणि धाकटे बंधू प्रताप यांनादेखील संगीतात गोडी आहे. कोरोनाच्या काळात बाहेर पडण्यास मनाई असल्याने आम्ही घरातच ‘कराओके’च्या सीडीवर गाणी सादर करायचो, ही आठवण आनंद अगदी प्रेमाने सांगतात. आता पुन्हा नव्या जोमाने त्यांनी कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्यांच्या ‘आदर्श ग्रुप’मध्ये १२ जणांचा समावेश आहे. कोरोनाचे निर्बंध उठताच आता लग्न समारंभ, हळदी समारंभ, विविध मंडळाचे कार्यक्रम, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम नियमित सुरू झाले आहे. त्यामुळे आनंद यांच्या ‘आदर्श ग्रुप’ला मोठ्या
 
 
 
‘ऑर्डर’ मिळत आहेत. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आनंद गाण्याची निवड करतात. प्रत्येक जाहीर कार्यक्रमाआधी सराव मात्र नक्की करतात. समोर उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळाली की, गाणे म्हणणार्‍या गायकापासून ते वाद्यवृंद सहकार्‍यांना खूप जोश येतो. लग्न आणि हळदी समारंभात अशावेळी सलग तीन तासदेखील कार्यक्रम चालतात. गेल्या अनेक वर्षांच्या या प्रवासात असे अनेक कार्यक्रम आठवणीत आहेत, जिथे कार्यक्रम संपता संपत नाहीत. प्रेक्षकांची दाद आणि टाळ्या शिट्ट्या हेच आपल्या कामाची पोचपावती असल्याचे आनंद मानतात. गळा साथ देईपर्यंत ते गात राहणार आहेत. संधी मिळाली तर मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. आनंद पाटील यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0