सावरकरांनी बापट, हेमचंद्र दास नि अब्ब्बास यांना पॅरिसला पाठवण्याआधी एक अट घातली होती की, ही बॉम्बची विद्या शिकून भारतात परत गेल्यावर कमीत कमी एक वर्ष तरी त्यांनी बॉम्बचा उपयोग इंग्रजांवर करायचा नाही. त्याचप्रमाणे कमीत कमी १०० युवकांना ही बॉम्बची विद्या शिकवायला हवी. म्हणजे सावरकर हे उतावीळ क्रांतिकारक नव्हते. त्यांच्या क्रांतीकार्याला संयमी विचारांची बैठक होती. त्यांच्याकडे क्रांतीयोजनेची संपूर्ण रुपरेषा स्पष्ट स्वरुपात तयार होती.
गोविंदराव बापटांचे बॉम्बचे प्रयोग
दिनांक १८ फेब्रुवारी १९०८ रोजी टिळकांनी गोविंदराव बापट यांच्याशी वर्मा यांचा परिचय करुन दिला. गोविंदराव बापटांनी स्वतःच माहिती मिळवून त्याचे प्रयोग करून यशस्वी बॉम्ब बनवला होता. टिळकांनी वर्मांना त्यांनी आणलेली पुस्तिका गोविंदराव बापटांना देण्यास सांगितले, जेणेकरून दोन्ही पुस्तिका एकमेकांशी ताडून बघता येतील. गोविंदरावांचा जन्म १८८७ मध्ये धुळ्याला झाला होता. १८९० ला त्यांचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर कुटुंब पुण्याला स्थायिक झाले होते. मॅट्रिकपर्यंत शिकलेले गोविंदराव १९०६ मध्ये ‘सबओव्हरसियरसी’ परीक्षा उत्तीर्ण झाले होते. नंतर वर्षभर आजारीच होते. केशव आगाशे, वामन फडके, रामचंद्र रामकृष्ण गद्रे आणि चिंतामण गोविंद पेटकर हे त्यांचे मित्र. पेटकर कधीकधी टिळकांकडे जात असत, त्यांनीच गोविंदरावांना टिळकांकडे नेले होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर १९०७ मध्ये गोविंदरावांनी आगपेट्या तयार करण्याबद्दल वाचले होते. सल्फ्युरिक अॅसिड, कापूस पोटॅश, क्लोराईड व साखर यांचे मिश्रण करून गोविंदरावांनी बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न केला होता. १९०७ डिसेंबरमध्ये त्यांचे मित्र चिंतामण पेटकर प्लेगला बळी पडले, मग नंतर गोविंदराव एकटेच टिळकांना भेटू लागले. अशा एका भेटीत त्यांनी बॉम्ब बनवण्याची आपल्याला एक नवीन कल्पना सुचली असल्याचे सांगितले. म्हणजे गोविंदराव बॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न करीत आहेत, याची टिळकांना कल्पना होती. आठ-दहा दिवसांनी टिळकांनी त्यांना वर नमूद केल्याप्रमाणे १८ फेब्रुवारी १९०८ रोजी दुपारी दोन वाजता बोलावून घेतले आणि वर्मांशी त्यांची ओळख करून दिली. ब्रिटिश अधिकारी वॉलिंजरनी गोविंदराव बापट यांच्या बरोबर कोल्हापूरच्या शिवाजी क्लबचे धुरीण दामोदर उपाख्य दामूअण्णा जोशी यांचाही उल्लेख केला आहे, कारण, फेब्रुवारी १९०८ मध्ये दामूअण्णांच्या उपस्थितीतच गोविंदरावांनी बॉम्बनिर्मितीचे यशस्वी प्रयोग केले होते. तसेच तेव्हा दामूअण्णांसोबत त्यांचे सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातील शिपोशीचे गणेश गोपाळ आठल्ये उपाख्य जी. अण्णा देखील उपस्थित होते. बापटांच्या माहितीनुसार, गणपतराव आठल्ये बॉम्ब तयार करण्याचे सर्व काम शिकले होते. १९ फेब्रुवारीला गोविंदरावांनी टिळकांच्या घरी जाऊन वर्मांना आपण बनवलेला एक बॉम्ब दिला. आणखीन एक पुरावा वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या दिनकरशास्त्री कानडे यांच्या आठवणीत आढळतो. इंग्रजीत टंकलिखित केलेला एक कागद टिळकांनी गायकवाड वाड्यात दिनकरशास्त्रींना वाचायला दिला. त्या कागदावर बॉम्ब तयार करण्याची कृती लिहिलेली होती. दिनकरशास्त्री लिहितात,’‘रात्र इतकी झाली होती तरी मी तो वाचेपर्यंत ते स्वस्थ बसले होते. नंतर ते म्हणाले, पुन: हा कागद तुम्हास पाहावयास मिळणार नाही. तुम्ही बेळगावास जा आणि गंगाधररावांना हे सर्व सांगून लवकर घेऊन या.”
दि. १६ मे १९०८ रोजी पुण्यात शनिवार पेठेतल्या विष्णू विनायक आपटे यांच्या घरातील तिसर्या मजल्यावरच्या मोकळ्या व्हरांड्यात स्फोट झाला. गोविंदराव बापट आणि त्यांचे मित्र रामचंद्र गद्रे यांना पकडण्यात आले. पण, बापट यांच्या घराची झडती घेऊनही पोलिसांना त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे दोघांनाही सोडून देण्यात आले. बापट यांचे पालक कृष्णाची मोरेश्वर वैशंपायन हे महसूल खात्यात नोकरी करत होते. त्यांनी त्वरित गुन्हा अन्वेषण विभागाच्या प्रमुखास पत्र पाठवून खुलासा केला की, मुंजीच्या वेळी उडवण्यासाठी आणलेले भुईनळे मडक्यात घालून सहज गंमत म्हणून बापटांनी उडवून पाहिले तेव्हा स्फोट झाला. पण, गुप्तचर अधिकार्यांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. कारण, भुईनळे उडवल्याने स्फोट झाला तर इतके नुकसान होत नाही, असा स्फोटक पदार्थांबाबतच्या तज्ज्ञांनी अभिप्राय दिला होता.
दि. १७ मे १९०८ ला गद्रे आणि बापट यांची मुक्तता झाल्यावर त्याच दिवशी दुपारी १ वाजता दामूअण्णा जोशी गोविंदरावांना भेटले. त्यांच्या सांगण्यावरुन वामन फडके आणि केशव आगाशे या त्यांच्या मित्रांना भेटून कृष्णराव कळंबे यांनी आगाशे यांच्याकडून बॉम्बपुस्तिका घेतली आणि दामूअण्णांना दिली. ही इंग्रजी बॉमबम्पुस्तिका २५ पानांची होती आणि आणि त्यात ९० परिच्छेद आणि सुमारे दहा आकृत्या होत्या. दामूअण्णांना इंग्रजी फारसे येत नसल्याने सर्वोत्तम जनार्दन शेणोलीकरांकडून मराठी भाषांतर करवून घेतले. गंगाधरराव देशपांडे, गोविंदराव याळगी, हणमंतराव देशपांडे वगैरेंना आपण बॉम्बनिर्मितीचे इंग्रजी हस्तलिखित दाखवले होते, असे दामूअण्णांचे म्हणणे होते. गोविंदरावांनी तयार केलेला पत्र्याचे कवच असलेला एक बॉम्ब लोकमान्य टिळकांच्या घरी होता. १६ मे ला गोविंदरावांच्या घराची झडती घेण्यात आल्यानंतर टिळकांच्या घरात तो बॉम्ब ठेवणे धोक्याचे होते. तसे दामूअण्णांनी वासुकाकांना सांगताच तो टिळकांचे घरातून आपण आधीच हलविला असल्याचे वासूकाकांनी दामूअण्णांना सांगितले. न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक नागपूरकर, मेडिकल शाळेतील ग. रा. वाशीकर आणि गंगाधर गोखले हे गोविंदराव बापटांना साहय्य करत असत.
पुण्याजवळच्या मुंढव्याच्या कागद गिरणीचे व्यवस्थापक फर्दूनजी पदमजी शेठ सल्फ्युरिक अॅसिड विकत असत. त्यांच्या गिरणीत काम करणारे वामनराव फडके हे त्यांच्याकडून अॅसिड आणून गोविंदराव बापटांना देत असत. वामनराव फडके यांचे नाव सावरकरांच्या सहकार्यांमध्ये देखील आढळून येते. यांचा जन्म १८८६ झाला होता. त्यांचे वडील बेळगावला प्रथम श्रेणी कनिष्ठ (र्डीलेीवळपरींश) न्यायाधीश होते. वामनराव बुद्धीमान विद्यार्थी होते. १९०४ मध्ये ते डेक्कन महाविद्यालयातून पहिल्या वर्गात बीए झाले होते. याच काळात पुण्यात त्यांची सावरकरांशी ओळख झाली. वामनरावदेखील तसे चळवळ्या विद्यार्थी होते आणि सावरकर तर या विद्यार्थ्यांचे नेतेच होते. नंतर वामनराव ‘आयसीएस’ होण्यासाठी विलायतेला गेले. तिथे ते पुन्हा म्हणजे ऑक्टोबर १९०६ मध्ये सावरकरांच्या संपर्कात आले आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. तसेच आपला ‘आयसीएस’ न होता ‘बॅरिस्टर’ होण्याचा निर्णय घरी कळवून टाकला. पण, अखेर घरच्यांच्या आग्रहामुळे ते नावाला ‘आयसीएस’ परिक्षेला बसले आणि अनुत्तीर्ण झाले. भारतीय राष्ट्रवाद्यांची बाजू मांडण्यासाठी ते सदैव पुढे असत. दि. ३१ ऑक्टोबर १९०७ ला ऑक्सफर्ड विद्यापीठातील वादविवाद सभेत त्यांनी भारतातील पोलिसांच्या लाचबाजीवर झोड उठवली होती. फडके हे बहुश्रुत आणि उत्तम वक्ते होते. त्यांचे इंग्रजी अतिशय उत्तम होते. सावरकरांच्या प्रभावामुळे व्याख्यानातून क्रांतीपक्षाची बाजू ते जनतेपुढे हिरीरीने मांडत.
भारतात बॉम्बचा पहिला यशस्वी स्फोट
दुसरी बॉम्बपुस्तिकेची प्रत घेऊन हेमचंद्र दास कोलकात्याला (तेव्हाचे कलकत्ता) पोहोचले. त्याआधी बंगालमधील क्रांतिकारकांचे देखील बॉम्बनिर्मितीचे प्रयोग सुरुच होते. ऑक्टोबर १९०७ मध्ये बॉम्बस्फोटाचा उपयोग करून बंगालच्या लेफ्ट. गव्हर्नरची गाडी उडवून देण्याचे दोन प्रयत्न झाले होते. दि. ६ डिसेंबर १९०७ ला मिदनापूरजवळ आगगाडी स्फोटाने रुळावरून घसरली होती आणि ५ फूट रुंद नि ५ फूट खोल खड्डा पडला होता. हेमचंद्र त्यांचे सहकारी बारिंद्र घोष आणि अरविंद घोष यांच्याकडे आले. बंगालमध्ये बॉम्बनिर्मितीसाठी या हस्तलिखिताचा वापर करण्यात आला होता. त्यांच्या उलाढाल्यांची परिणती प्रसिद्ध अलिपूर बॉम्ब खटल्यात किंवा ’माणिकतोळा बॉम्ब कटात’ झाली. मुझफ्फूरमध्ये ३० एप्रिल १९०८ रोजी किंग्जफोर्डच्या गाडीवर अंधारात बॉम्ब फेकण्यात आला आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बॉम्ब या संहारक अस्त्राचा पहिला यशस्वी वापर झाला. प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस यांनी अंमलात आणलेल्या या कृत्यामागे अरविंद घोष, त्यांचे बंधू बारिंद्र घोष आणि गुप्त संस्था अनुशिलन समितीच्या अनेक तरुण क्रांतिकारकांचा हात होता.
सेनापती बापटांकरवी बॉम्बपुस्तिकेचा प्रचार-प्रसार
तिथे बापट फेब्रुवारी १९०८ ला भारतात येण्यास लंडनहून निघाले; ते प्रथम पॅरिसला गेले, श्यामजी कृष्ण वर्मा आणि राणा पती-पत्नी यांची भेट घेतली आणि मग भारतात जाताना त्यांनी ‘जोशी’ या बनावट नावाने मुंबईचे तिकीट काढले. सोबत दोन चांगली भरलेली पिस्तुले, काडतुसांची पिशवी नि बॉम्बपुस्तिका या महत्त्वाच्या गोष्टी ट्रंकेत तळाशी ठेवल्या नि त्यावर कपडे ठेवले. मुंबई जवळ येताच दोन्ही पिस्तुले नि काडतुसांची थैली अंगावरच्या कपड्यात लपवली. ते २६ मार्च १९०८ ला मुंबईला उतरले. सीमाशुल्क अधिकार्यांच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे या सर्व वस्तू आणणे आवश्यक होते. या क्रांतिकारकांनी माणसांच्या मानसिकतेचा चांगलाच अभ्यास केला होता, त्यामुळे सीमाशुल्क अधिकारी तपासणीसाठी पुढे येताच बापटांनी स्वतःहून ट्रंकेची किल्ली काढून दिली आणि शांतपणे उभे राहिले. जणूकाही आपल्याकडे जोखमीचे असे तपासण्यासारखे काहीच नाही हे दर्शविण्यासाठी! त्यांची ही चाल यशस्वी ठरली. त्या अधिकार्याने त्यांचे सामान तपासलेच नाही आणि त्यांना जाण्यास अनुमती दिली.
सावरकरांनी सेनापती बापटांना मुंबईत शीव येथे राहणार्या खिमजी असर यांच्या बंगल्यात राहणार्या हरी अनंत थत्ते यांची भेट घेण्यास सांगितले होते. तेथे ते आठवडाभर राहिले. त्यांचे जिवलग मित्र भुसावळचे वासुदेव विठ्ठल उर्फ अण्णासाहेब दास्ताने यांनी कृष्णाजी दत्तात्रय भोसेकर या तरुणास बापटांकडे पाठवले. बापटांनी भोसेकर यांना बॉम्बपुस्तिका दाखवली. भोसेकर जेमतेम २५ वर्षांचे होते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या तारळे गावचा. धुळ्याला गरुड हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. नंतर ते मुंबईच्या व्हीजेटीआयमध्ये तांत्रिक शिक्षण घेत असताना जॅक्सन वधाचे सूत्रधार अण्णा कर्वे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. कर्वे यांच्याप्रमाणे त्यांची भुसावळच्या दास्ताने यांच्याशीही चांगली ओळख होती. भोसेकरांशी प्रथमच भेट झाल्यानंतर बापट पारनेरला घरी जाण्याऐवजी सरळ कलकत्त्याला हेमचंद्र दास यांना भेटायला गेले. धुळ्याचे विष्णू सिताराम (आप्पासाहेब) व महादेव सीताराम (भाईसाहेब) हे दोघे रणदिवे बंधू तसेच दास्ताने हे सेनापती बापट यांचे डेक्कन महाविद्यालयामध्ये सहाध्यायी होते. या सर्वांना गुप्त मंडळींना सदस्यत्वाची शपथ १९०२ मध्ये चापेकर बंधूंचे सहकारी दामोदर बळवंत भिडे यांनी दिली होती. आप्पासाहेब नि भाईसाहेब या रणदिवे बंधूंचे चुलते काशिनाथ आत्माराम रणदिवे आणि त्यांचे चिरंजीव गोपाळराव यांनी शीव येथील आपल्या बंगल्यासमोरच्या एका चाळीतल्या खोलीत पिस्तुले नि बॉम्बपुस्तिका लपवून ठेवल्या होत्या. तसेच विख्यात गांधीवादी केदारनाथ यांच्या नोंदीनुसार पुढे तिथून काही सामान त्यांच्याकडे पालीला तर काही चाळीसगावला महादेव वैद्यांकडे तर काही धुळ्याला पाठवण्यात आले. बापटांनी या बॉम्ब हस्तलिखिताच्या हजारो सायक्लोस्टाईल प्रती मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औंध, सातारा, ग्वाल्हेर, बडोदा, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि इतर ठिकाणी वितरीत करण्याची सोय केली होती. त्यानुसार या विविध ठिकाणी बॉम्बनिर्मितीचे प्रयोग देखील सुरु झाले होते.
दि. ७ एप्रिल १९०८ रोजी हेमचंद्र दास यांच्या नभकृष्ण मार्गावरील निवासस्थानी सेनापती बापट त्यांना भेटले. बारिंद्रकुमार घोष, उल्हासकर दत्त, प्रफुल्ल चक्रवर्ती, उपेंद्रनाथ बॅनर्जी, नरेंद्र गोस्वामी या क्रांतिकारकांशी तिथेच परिचय झाला. हे सर्वजण हेमचंद्रांनी दिलेल्या पुस्तिकेवरून बॉम्बनिर्मितेचे प्रयोग करत होते. हेमचंद्र दास यांच्या घरावर गुप्तचरांची पाळत होती हे नंतर अलीपूर बॉम्ब खटल्याच्यावेळी उघडकीस आले. कारण त्यांना भेटायला येणार्यांच्या नोंदी पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या होत्या. काही व्यक्तींची हत्या केल्याने फारसे काही साध्य होणार नाही, गुप्त संघटनांचे जाळे देशभर विणून बॉम्बनिर्मितीचे कारखाने ठिकठिकाणी उभारण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, तसेच देशभर सशस्त्र लढा देण्यासाठी शिस्तबद्ध संघटना चिकाटीने बांधावी लागेल, असे बापटांनी त्यांना सांगितले. या विचारामागे नक्कीच सावरकरांचे मार्गदर्शन नि प्रभाव कारणीभूत असणार. कारण, बापटांनी एका मुलाखतीत असा उल्लेख केला आहे की, त्यांनी लंडनमध्ये सावरकरांकडे ब्रिटिश संसद बॉम्बने उडवायची इच्छा व्यक्त केली. पण, सावरकरांनी त्यांना परावृत्त केले आणि त्याऐवजी बॉम्ब हस्तलिखिताची प्रत भारतात घेऊन जाण्यास सांगितले, जिथे त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच सावरकरांनी बापट, हेमचंद्र दास नि अब्ब्बास यांना पॅरिसला पाठवण्याआधी एक अट घातली होती की, ही बॉम्बची विद्या शिकून भारतात परत गेल्यावर कमीत कमी एक वर्ष तरी त्यांनी बॉम्बचा उपयोग इंग्रजांवर करायचा नाही. त्याचप्रमाणे कमीत कमी १०० युवकांना ही बॉम्बची विद्या शिकवायला हवी. म्हणजे सावरकर हे उतावीळ क्रांतिकारक नव्हते. त्यांच्या क्रांतीकार्याला संयमी विचारांची बैठक होती. त्यांच्याकडे क्रांतीयोजनेची संपूर्ण रुपरेषा स्पष्ट स्वरुपात तयार होती.
बापटांनी प्रत्यक्ष रशियन क्रांतिकारकांकडून ही बॉम्बची विद्या शिकून घेतली होती, त्यामुळे केवळ बॉम्बपुस्तिका लंडनहून भारतात नेऊन वितरण करणे इतक्यापुरताच त्यांचा यातील सहभाग मर्यादित नव्हता. त्यांनी बॉम्बनिर्मितीच्या विद्येत प्रावीण्य मिळवले होते. २३ डिसेंबर १९१२ ला दिल्लीत व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर जेव्हा बॉम्ब फेकण्यात आला, तेव्हा याचे सूत्रधार बापटच असणार, असे भारत सरकारचे गुप्तचर प्रमुख सर चार्ल्स क्लीव्हलँडला प्रथमदर्शनी वाटत होते; यातून बापट ब्रिटिशांमध्ये बॉम्बविद्येतील कुशल क्रांतिकारक म्हणून विख्यात होते असे दिसून येते. (क्रमश:)
(संदर्भ : अक्षय जोग लिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : परिचित-अपरिचित (२०२१)’)