उद्या, शनिवार, दि. २६ फेब्रुवारी हा क्रांतिसूर्य स्वा. वि. दा. सावरकर यांचा आत्मार्पण दिन. त्यानिमित्ताने अक्षय जोग लिखित 'स्वातंत्र्यवीर सावरकर : परिचित-अपरिचित (२०२१)' या पुस्तकातील सावरकरांसह इतर क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांतीतील अमूल्य योगदानाचा आजपासून रविवारपर्यंत सलग तीन भागांत विस्तृत आढावा घेणार आहोत. त्यापैकी लेखाचा हा पहिला भाग...
सावरकर हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यासाठी बंदुका, पिस्तुले आणि शस्त्रास्त्र गोळा करणे हे ओघाने आलेच. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या ब्राउनिंग पिस्तुलाचा उपयोग करून अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा वध केला होता. पण, सावरकर आणि इतर भारतीय क्रांतिकारक एका संहारक अस्त्राची विद्या मिळवण्याच्या मागे होते. ते संहारक अस्त्र म्हणजे बॉम्ब!
बॉम्ब हे पिस्तुल किंवा बंदुकीप्रमाणे तयार स्वरुपात मिळणे अवघड होते आणि मिळाले तरी ते जवळ बाळगणे जिकरीचे नि धोकादायक होते. कारण, एका लहानशा चुकीने कधीही त्याचा स्फोट होऊन निरपराध व्यक्तींचा जीव जाण्याची शक्यता होती. म्हणून मग सावरकरांनी बॉम्बची विद्या म्हणजे बॉम्बनिर्मितीचे तंत्र शिकून घ्यायचे ठरवले, म्हणजे मग ते तंत्र भारतभरच्या क्रांतिकारकांमध्ये प्रसारित करून ठिकठिकाणी बॉम्बचे कारखाने स्थापन करता येतील आणि मग योग्य सिद्धत्ता झाल्यावर एकाच वेळी भारतभर विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणून इंग्रजांना जोरदार दणका देऊन ब्रिटिश साम्राज्य खिळखिळे करता येईल, अशी सावरकरांची योजना होती. त्यामुळे सावरकरांच्या मनात प्रथमपासून बॉम्बनिर्मितीची कल्पना घोळत होती.
१९०७ मध्ये मदनलाल धिंग्राने बॉम्ब बनविण्याची कल्पना प्रथम लंडनमध्ये सावरकरांनी स्थापन केलेल्या 'फ्री इंडिया' सोसायटीच्या सदस्यांच्या बैठकीत मांडताच, सावरकरांनी ती लगेच उचलून धरली. हरिश्चंद्र कृष्ण कोरेगावकरने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, धिंग्रा त्या बैठकीत स्पष्टपणे म्हणाला होता की, “बॉम्ब फेकण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.” मग सावरकरांनी बॉम्बविद्या मिळवण्याचे मनावर घेतले आणि त्यादिशेने शोध सुरू असता त्यांना कळाले की, निर्वासित रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बनिर्मितीचे तंत्र मिळू शकेल. त्यांच्याशी संपर्क कसा करायचा याचे प्रयत्न सुरू असताना सावरकरांना असे समजले की, त्यांचा पत्ता प्रिन्स क्रोपॉटकीन यांना माहीत आहे. महत्त्वाचे म्हणजे, श्यामजी कृष्ण वर्मा आणि मादाम कामा यांचा या प्रिन्स क्रोपॉटकीनशी चांगला परिचय होता. तसेच, हेन्री मायर्स हिंडमन हे सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे एक समाजवादी इंग्रज नेते होते. भारताच्या जहालवाद्यांशी एकरुप झालेले हिंडमन हे श्यामजी कृष्ण वर्मांनी स्थापन केलेल्या भारत भवन (इंडिया हाऊस)च्या उद्घाटन समारंभाला दि. १ जुलै, १९०५ ला उपस्थित होते. बिपीनचंद्र पाल यांच्या कॅक्स्टन सभागृहात झालेल्या भाषणाला इंग्रज सरकारच्या रोषाची पर्वा न करता त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. हिंडमन यांच्या 'जस्टिस' या वृत्तपत्रातील क्रांतिकारक मजकूरामुळे त्या पत्राच्या आयातीवर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. त्यांचे इंग्लंडमधील हँपस्टीड भागातील '१३, वेलवॉक' हे घर भारत भवनपासून तसे जवळच होते. त्यामुळे त्यांचे भारत भवनमध्ये नेहमी येणे-जाणे होत असे आणि सावरकर तर भारत भवनेचे जणू नेतेच होते आणि श्यामजींनीदेखील तेथील सर्व दायित्व सावरकरांवर सोपवले होते. बिपीनचंद्र पाल यांचे सुपुत्र आणि सावरकरांचे सहकारी नि मित्र निरंजन पाल यांच्या आठवणीनुसार, हिंडमन यांचा सावरकरांशी चांगला परिचय होता आणि सावरकर बरेचदा त्यांच्याशी चर्चा करत असत. हिंडमन यांनीच सावरकरांचा वर उल्लेख केलेल्या प्रिन्स क्रोपॉटकीनशी परिचय करून दिला होता. हे निर्वासित रशियन क्रांतिकारक पॅरिसमध्ये होते. सावरकरांचे सहकारी बॅरिस्टर सरदारसिंह राणा हेदेखील पॅरिसमध्ये होते. मग सावरकरांनी सगळी योजना आखून क्रोपॉटकीनच्या मध्यस्थीने पॅरिसमधील रशियन बॉम्बतज्ज्ञांना देण्यासाठी परिचय-पत्रे मिळवून देऊन ती पॅरिसला असणार्या बॅ. राणा यांच्याकडे पाठवली. सावरकरांनी सेनापती बापट, 'नाभा' संस्थानचे मिर्झा अब्बास आणि लंडनला आलेल्या बंगालच्या अनुशिलन समितीच्या हेमचंद्र दास कनुंगो यांना त्या रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बनिर्मितीचे तंत्र शिकून घेण्यासाठी त्यांच्या पैशाची व्यवस्था करून पॅरिसला पाठवले. दि. ११ जून, १९०७ ला बापट नि अब्बास लंडनहून निघाले.
रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बपुस्तिका मिळाली
राणांनी पॅरिसमधील रशियन क्रांतिकारक निकोलस सफ्रान्स्कीशी संपर्क साधला. तो बॉम्बनिर्मितीच्या कृतीची पुस्तिका (मॅन्युएल) देणार होता. हा सफ्रान्स्की रशियन सैन्याच्या यंत्रतज्ज्ञांच्या तुकडीत सैन्याधिकारी होता. राणांनी हेमचंद्र दास यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. पॅरिसमध्ये एका साबणाच्या कारखान्यात त्यांनी प्रत्यक्ष बॉम्बनिर्मितीचे प्रयोग करुन दाखवले. पण, तरी त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्याची पुस्तिका (मॅन्युएल) मिळणे आवश्यक होते, जेणेकरून त्याआधारे इतर क्रांतिकारक बॉम्ब तयार करू शकतील. मग त्यांनी दास यांना बॉम्बनिर्मितीच्या कृतीचे हस्तलिखित दिले. त्यात बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे घटक, त्याची उत्पादन प्रक्रिया आणि उपयोग याविषयी सविस्तर सूचना दिल्या होत्या. ही पुस्तिका ५० पृष्ठांची होती. पण, ती रशियन भाषेत होती. हेमचंद्र दास यांना पाठवण्याचे कारण ते एक कुशल छायाचित्रकार होते. त्यांनी या बॉम्ब पुस्तिकेची छायाचित्रे काढून राणांना आणून दिली. आता या रशियन पुस्तिकेचा इंग्रजीमध्ये अनुवाद करणे आवश्यक होते. हा इंग्रजी अनुवाद कोणी केला याच्या तीन कथा प्रचलित आहेत. एक म्हणजे राणांनी एका वृद्ध रशियन प्राध्यापकाला हे भाषांतर करण्याची विनंती केली. कारण, या प्राध्यापकाचे इंग्रजी चांगले होते आणि त्याला संस्कृतही येत होते. त्याने भाषांतर करून हेमचंद्र यांच्याकडे प्रत दिली.
दुसरी कथा म्हणजे बापटांची ऍना खोस नावाची एक रशियन मैत्रीण होती, तेव्हा ती बर्लिनला होती. बापटांनी तिला इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याची विनंती करताच, तिने तिची एमबीबीएसची सहामाही परीक्षा बुडवून अनुवाद करून दिला. बापटांनी त्याच्या २० हस्तलिखित प्रती केल्या. तिसरी कथा अशी आहे की, बापटांची देखील राणांनी त्या रशियन क्रांतिकारकांशी ओळख करून दिली होती, ते त्यांच्या पॅरिसमधील गुप्त तळावर गेले. त्यातील तिघांनी बापट नि दास यांना आपल्या घरी नेले. तिथे ते गुप्तपणे राहात होते. या तिघांपैकी एक वर उल्लेख केलेला वृद्ध रशियन प्राध्यापक होता, तो राजकीय हत्येत सहभागी होता, स्पेनला पळून गेला होता आणि त्याने स्वत:चे नाव कधीही उघड केले नव्हते, दुसरा तत्त्वविवेचक होता आणि तिसरा एक सुशिक्षित शिंपी (टेलर) होता. तो त्या गटाचा प्रमुख होता. याने दोन रशियन युवतींशी त्यांचा परिचय करून दिला, त्यातील एकीने एमए पूर्ण केले होते आणि दुसरीने एमबीबीएस केले होते. दुसरी अमाया ही बर्लिनमध्ये शिकत असल्याने तिने त्यांना तिथे येण्यास सांगितले, जेणेकरून ती त्यांना भाषांतरास साहाय्य करू शकेल. बापट व इतरांनी छायांकित, हस्तलिखित बेल्जियम व हॉलंडमधील जकात नाक्यापासून चुकवून, लपवून आणले व बर्लिनला पोहोचले, तिथे ते पोलीस चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी सतत घर बदलत राहिले आणि अखेरीस अमायापर्यंत पोहोचले. तिने भाषांतर करण्यासाठी बराच कालावधी घेतला आणि अखेरीस अनुवादित प्रत लंडनला आणली.
निकोलस सफ्रान्स्की पॅरिसमध्ये काही भारतीय क्रांतिकारकांना बॉम्बची विद्या देत आहेत हे पॅरिसच्या पोलिसांनी दि. १ जानेवारी, १९०८ ला भारतातील गुप्तचर विभागाच्या संचालकांना तारेने कळवले होते आणि त्यातील मजकूर सर्व प्रांतातील गुप्तचर विभागांना कळविण्यात आला होता. म्हणजे भारतीय क्रांतिकारक बॉम्बची विद्या मिळवत आहेत, याची कुणकुण इंग्रजांना लागली होती. पण ते नक्की कोण भारतीय क्रांतिकारक आहेत, याची इंग्रजांना कल्पना नव्हती. बहुदा सफ्रान्स्की हा रशियन निर्वासित क्रांतिकारक असल्याने आणि त्याला बॉम्बचे तंत्र माहीत असल्याने ब्रिटिश गुप्तहेर त्याच्यावर पाळत ठेऊन असावेत. पण, सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी भारतातून लंडनला जाण्यासाठी निघताच त्यांच्याविषयीची फाईल लंडनला पोहोचलेली असूनही आणि त्यांच्या लंडनमधील हालचालींवर गुप्तहेरांची बारीक नजर असूनही त्यांना गुंगारा देऊन सावरकरांनी आपल्या सहकार्यांना बॉम्बविद्या मिळवण्यासाठी पॅरिसला पाठवले होते आणि यामागे सावरकर नि सहकार्यांचा हात आहे, हे तोपर्यंत इंग्रजांना समजले नव्हते.
सावरकर बॉम्बची विद्या हस्तगत करण्याच्या मागे असतानाच सावरकर पिस्तुले मिळविण्याचे प्रयत्नही करत होते. तेव्हा त्यांना असे कळाले की, बेल्जियमला उत्तम प्रकारची पिस्तुले मिळतात. तेव्हा तिथेही काही तरुणांना पाठवण्याची योजना सावरकर आखत होते. अखेर बॉम्बपुस्तिकेच्या प्रती घेऊन तिघेजण लंडनला परत आले. स्वत: सावरकरांनी या पुस्तिकेवरून बॉम्बनिर्मितेचे प्रयोग भारत भवनमध्येच वरच्या मजल्यावर सुरू केले होते. या प्रयोगशाळेत पिक्रिक ऍसिडने त्यांचे हात पिवळे झालेले असत आणि तसेच हात न धुता घाईघाईने सावरकर 'फ्री इंडिया सोसायटी'च्या बैठकीला किंवा तिथे भाषण देण्यासाठी येत असत.
बॉम्बपुस्तिकेचे वितरण
आता ही पुस्तिका भारतात वितरीत करणे आवश्यक होते. म्हणून मग सावरकर आणि बापट यांनी या प्रती भारतात पाठवण्याची व्यवस्था केली. एक प्रत हेमचंद्र दास यांच्यासोबत पाठवली, तर दुसरी होतीलाल वर्मा यांच्यासमवेत पाठवली. त्यांना ती प्रत महाराष्ट्रात पुण्याला जाऊन लोकमान्य टिळकांना देण्यास सांगितले. टिळक म्हणजे सर्व क्रांतिकारकांचे आश्रयस्थान, त्यामुळे बॉम्बची पुस्तिका देण्यासाठी टिळकांसारखी दुसरी योग्य व्यक्ती असूच शकत नव्हती. इंग्रजांना संशय येऊ नये, म्हणून वर्मा लंडनहून थेट भारतात न जाता आधी ते अमेरिकेला गेले, मग तिथून जपान-चीन या देशांना भेटी देत हाँगकाँगला काही दिवस राहिले. बरं, तिथेही ते स्वस्थ न बसता पलटणीतल्या शिपायांमध्ये पत्रकांचा प्रसार करून राजद्रोहाचा प्रचार करण्याचे प्रयत्न करत होते, असे सप्टेंबर १९०८ मध्ये प्रयाग येथे होतीलाल वर्मा यांच्यावरील खटल्याचे काम सुरू असताना हाँगकाँगमधील एका सुभेदार मेजरने साक्षीमध्ये सांगितले होते. अखेर वर्मा १९०७च्या डिसेंबरमध्ये भारतात आले आणि सुरत काँग्रेसच्या अधिवेशनापूर्वी पुण्याला येऊन पोहोचले. तेव्हा टिळक सिंहगडावर होते. न. चि केळकरांसह ते टिळकांना भेटायला सिंहगडावर गेले आणि ती बॉम्बपुस्तिका त्यांच्याकडे सुपूर्द केली.
होतीलाल वर्मा यांनी कोलकात्याची 'अमृत बझार पत्रिका', 'स्वराज्य', अजमेरचे 'राजस्थान समाचार', लाहोरचे 'स्वदेशबंधू' व 'पंजाबी' या वृत्तपत्रात काम केले होते. हरिद्वारला साधू वेशात राजद्रोही विचारांचा प्रचार करताना ते आढळले होते. पॅरिसमध्ये ज्याप्रमाणे निर्वासित रशियन क्रांतिकारकांकडून ही बॉम्बची विद्या मिळवली होती, त्याप्रमाणेच काही भारतीय क्रांतिकारक काच, साबण किंवा आगपेट्यानिर्मिती शिकण्याचे निमित्त करून जपानमध्ये गेले होते आणि येताना काच, साबण वा आगपेट्यानिर्मिती तंत्रासोबत बॉम्बनिर्मितीचे तंत्रदेखील शिकून आले होते. जपानची 'शिना रोनीन' नावाची गुप्त संघटना पहिल्या महायुद्धापूर्वी जपानमध्ये फार प्रभावी होती. तोयामा मित्सुरा हा संघटनेचा नेता भारतीय क्रांतिकारकांचा पाठीराखा होता. 'इंडो रोनीन' नावाच्या विशेष शाखेमार्फत भारतीय क्रांतिकारकांशी संपर्क साधला जात असे. या शाखेला जपानचे सरकार आर्थिक साहाय्य देत, असे यांची इंग्रजांना कल्पना होती.
वर्मा जपानमध्ये गेलेले असताना त्यांचा गोविंदराव पोतदार आणि वासुदेवकाका जोशी यांचे पुतणे महादेवराव जोशी यांच्याशी परिचय झाला होता. वर्मा बॉम्बपुस्तिका घेऊन पुण्याला आल्यावर जपानमध्ये ओळख झालेल्या महादेवराव जोशींना भेटले, तेव्हा महादेवराव जोशींनी जपानहून आणलेले बॉम्बचे रिकामे कवच त्यांनी वर्मांना दाखवले. महादेवरावांच्या आधी त्यांचे काका म्हणजे वासुदेवकाका जोशीदेखील जपानला जाऊन आले होते. तसेच, वर्मा यांच्याशी जपानमध्ये परिचय झालेले गोविंद नारायण पोतदार हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट संस्थानचे रहिवासी होते. काचनिर्मिती तंत्र शिकण्यासाठी ते जपानला गेले होते नि १९०७ ला भारतात परतून माहीमला एक कारखाना स्थापन केला होता. जपानमध्ये शिक्षण घेत असताना ते बॉम्ब तयार करण्यास शिकले होते. कोल्हापूरच्या शिवाजी क्लबचे के.डी.भागवत पोतदारांकडेच बॉम्बनिर्मिती शिकले होते. त्यांनी नंतर १९०८ ला कृष्णाजी दामोदर लिमये या 'शिवाजी क्लब'च्या दुसर्या सभासदास बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी पोतदारांकडे पाठवले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक विष्णूपंत पिंगळे अमेरिकेत जाण्यापूर्वी पोतदारांच्या माहिमच्या कारखान्यात काही दिवस काम करत होते. १९०७ पासून पोतदारांचा निरनिराळ्या गुप्त क्रांतिकारक संघटनांशी संपर्क होता आणि त्यांनी त्यांना बॉम्बची विद्या शिकवली होती. जपानमध्ये काही काळ वास्तव करणार्या क्रांतिकारकांमध्ये 'विहारी'चे संपादक रामभाऊ मंडलिक नि पांडुरंग सदाशिव खानखोजे हेदेखील होते. (क्रमश:)