ऐकावा आत्म्याचा बोलू!

24 Feb 2022 11:57:15
 

aradhya 
 
 
आज सबंध व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, राष्ट्र व विश्वाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आत्म्याचा आवाज ऐकणारे संतसुजन हवेत. ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याची ध्वनी न ऐकता मनात येईल, तसे व्यर्थ बोलल्यामुळे व वागल्यामुळे सार्‍या जगाची प्रचंड हानी होत आहे. सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरत चालले आहे. ईश्वर करो... सर्वांच्या हृदयात ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याचा आवाज ऐकण्याचे सामर्थ्य वाढत राहो!
 
आकूतिं देवीं सुभगां पुरो दधे
चित्तस्य माता सुहवा नो अस्तु।
यामाशामेमि केवली सा मे अस्तु
विदेयमेनां मनसि प्रविष्ठानम्॥
(अथर्ववेद १९.४.२)
 
अन्वयार्थ
(सु + भगाम्) उत्तम प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण असलेल्या, सौभाग्ययुक्त अशा (आ+कूतिं देवीम्) आत्मध्वनी, आंतरिक वाणीरूपी देवीला (पूर: दधे) मी नेहमी समोर ठेवतो, तिचा साक्षात्कार करतो. (चित्तस्य माता) चित्ताची ती जननी (न:) आमच्याकरिता (सु + हवा अस्तु) अगदी सहजपणे हाक मारण्यायोग्य बनो. मी (याम् आ शाम् एमि) ज्या कोणत्या दिशेला जाईल किंवा जी कोणती आकांक्षा बाळगेल, (सा मे) ती माझ्या करिता (केवली) एकमेव अद्वितीय (अस्तु) ठरो. (मे मनसि) माझ्या मनामध्ये (प्रतिष्ठाम्) प्रविष्ट झालेल्या (एनाम्) या वाणीला (विदेयम्) मी प्राप्त करु इच्छितो.
 
विवेचन
आजकाल माणूस हा फार वाचाळ बनत चालला आहे. तो जे काही बोलतो आहे, त्याचे त्यालाच भान राहिलेले नाही. मनात येईल तसे व्यर्थ बरळणे हा जणू काही माणसाच्या सवयीचाच भाग बनलेला दिसतोय. आपल्या बेफाम बोलण्याने समोरच्याला काय वाटेल? किंवा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय नुकसान किती होईल? याचा कदापि तो विचार करीत नाही. त्याचे बोलणे ऐकून लगेच समोरचाही तितक्याच आवेगाने प्रतिक्रिया देतो. तोही भलतेसलते बोलून जातो. म्हणूनच म्हटले आहे - वाणी हे एक अमोघ शस्त्र आहे, त्याचा जपून वापर करावा. वाणीच्या दुरुपयोगाची सवय मात्र आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि सामान्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांनाच झाली आहे. ही मंडळी जे काही बोलते आहे, ती म्हणजे फक्त वैखरी! सदरील मंत्रात सामान्यपणे माणसाच्या बुद्धीतून, मनातून किंवा मुखातून बाहेर पडणार्‍या वाणींविषयी नव्हे, तर आत्म्यातून निघणार्‍या वाणीचे माहात्म्य वर्णिले आहे. ‘आकूती’ म्हणजेच आत्मध्वनी किंवा आत्म्याचा आवाज! ‘आ’ उपसर्गपूर्वक ‘कूति’ म्हणजेच ’आकूती’ हा शब्द बराच उत्तम अर्थ सांगून जातो. ’आ’ उपसर्गाचा अर्थ पूर्ण, गहन, परा तर ’कूति’ म्हणजे शब्द, ध्वनी, आवाज, वाणी व बोलणे होय. ’आकूती’ म्हणजेच अंतरात्म्याचा आवाज. संकल्पशक्तीचा ध्वनी. पवित्र व शुद्ध अशी समृद्ध वाणी. अशीही वाणी ऐश्वर्याचे प्रतीक असते. याच आकूतीदेवीची उपासना करण्याचा मोलाचा संदेश इथे अभिव्यक्त झाला आहे.
 
परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार आहेत. मंत्रात प्रतिपादित केलेली आकूती म्हणजेच परा वाणी! हिलाच तर ब्रह्मशक्तीने युक्त शाश्वत वाणी असेही म्हणतात. ही नेहमीच ईश्वरीय सत्य विचारांना प्रकट करणारी असते. दुसरी पश्यंती वाणी ही बुद्धी किंवा मस्तिष्कातून बाहेर पडते. तिच्यात नेहमी विचारांचे तरंग उठतात. तिसरी मध्यमा वाणी मनातून प्रकट होते. ही संकल्प- विकल्पांच्या माध्यमाने भावनात्मक तरंग निर्माण करते, तर चौथी वैखरी वाणी म्हणजे मुखातून शब्दांच्या रूपाने प्रकट होते. या चारही वाणींमध्ये परा म्हणजेच ‘आकूती’ ही खरीखुरी सर्वोत्तम वाणी होय. शरीरातील प्रत्येकाचा आत्मा हा पवित्र व शुद्ध असतो. तो नेहमीच सर्वकल्याणमय असा मानवतेचा संदेश देतो. एखादी वाईट कृती घडत असेल, तर आत्मा हा आतून रोखण्याची इच्छा करतो. एखादा अपराध घडला, तर लगेच पश्चातापाची भावना आतून अभिव्यक्त होते. आपल्या वाईट कृत्यांमुळे इतरांची हानी झाली किंवा दुसर्‍याचे मन दुखावले, तर आतून दुःख होऊ लागते आणि पवित्र आवाज बाहेर पडू लागतो. पण, हा ध्वनी नि:शब्द असून फक्त भावनात्मक आहे. जे आत्मकल्याणाच्या मार्गावरचे योगी पथिक, ब्रह्मज्ञानी व वेदविद असतात, तेच या ‘आकूती’ म्हणजेच परा वाणीला ऐकतात. इतर सामान्य लोक मात्र आत्म्यातून बाहेर पडणार्‍या शाश्वत आवाजाचा विचार करत नसतात. ते फक्त पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांचाच उपयोग करून असत्य, वाईट, कठोर, अप्रामाणिक वाणीच्या मायाजाळात अडकतात. परिणामी, सर्वत्र दुःखाचेवातावरण पसरते. शत्रुत्वाची भावना वाढीला लागते.
 
‘आकूती’ ही आत्म्याची वाणी असल्याने ती सर्वांना योग्य तो न्याय देणारी असते. कधीही कोणाचा पक्षपात करीत नाही. ती कामक्रोधादी षड्रिपूंपासून दूर असते. ‘आकूती’ देवीला धारण करणार्‍या महापुरुषांचे संकल्प हे ‘सत्यं, शिवं सुंदरम्’ असतात. स्वार्थाचा लवलेशही त्यांच्यात नसतो. समग्र प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे, अशी मंगलमय भावना त्यांच्यात विद्यमान असते. ते जे काही कार्य करतात, ते आत्म्याला, परमात्म्याला व वेदज्ञानाला प्रमाण मानूनच. ईश्वराची भक्ती, उपासना व योगाच्या माध्यमाने ज्याने ‘आकूती’ शक्तीला जागृत केले, अशांपैकी एक महात्मा या वेदमंत्रात म्हणतो- ‘’मी सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण अशा आकूती देवीचा नेहमी साक्षात्कार करतो.” सौभाग्याचे लेणे या ‘आकूती’ शक्तीत म्हणजेच आत्म्याच्या वाणीत आहे. सर्वप्रकारचे दिव्य तेज आणि सुखाचे आगर म्हणजे आत्मध्वनी होय. ही ‘आकूती’ आमच्या चित्ताची माता म्हणजेच चैतन्यदायी शक्तीची जननी आहे. 
 
चित्ताच्या दोन अवस्था असतात. चेतन व अचेतन, मृत व अमृत, सुप्त व जागृत! ‘आकूती’वंत सत्पुरुषांचेच चित्त हे जागृत, उत्साही, अमृतमय व चैतन्यदायी असते. म्हणूनच ते महात्मे या ‘आकूती’ देवीला नेहमीच अगदी सहजपणे हाक मारतात. तिचा साक्षात्कार करतात. यामुळेच ते नेहमी आनंदी व सुखी असतात. ज्या दिशेने हे सुजन जातात, तिथे त्यांना यश व आनंद मिळत असतो. त्यांच्याकरिता दहाही दिशा उत्साहाचे केंद्रबिंदू बनतात. त्याचबरोबर त्यांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ततादेखील होत असते. आज सबंध व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, राष्ट्र व विश्वाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आत्म्याचा आवाज ऐकणारे संतसुजन हवेत. ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याची ध्वनी न ऐकता मनात येईल, तसे व्यर्थ बोलल्यामुळे व वागल्यामुळे सार्‍या जगाची प्रचंड हानी होत आहे. सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरत चालले आहे. ईश्वर करो... सर्वांच्या हृदयात ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याचा आवाज ऐकण्याचे सामर्थ्य वाढत राहो व सर्व मंगलमय वातावरण बनो!
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
Powered By Sangraha 9.0