तामिळनाडूत ‘कमळ’

24 Feb 2022 10:36:04

BJP in Tamilnadu
 
 
 
भारतीय जनता पक्ष हा केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित असून त्याची दक्षिण भारतात डाळ शिजणार नाही, या विरोधकांच्या (गैर) समजाला सुरूंग लावला तो तामिळनाडूमध्ये दि. १९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने. द्रमुक, अण्णाद्रमुक या तामिळनाडूतील पारंपरिक प्रादेशिक पक्षांनंतर सर्वाधिक जागा जिंकत भाजप हा तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे तामिळनाडूत कधीही ‘कमळ’ उमलणार नाही, या विरोधकांच्या दाव्याला भाजपने जोरदार धक्का दिला असून, आपणही या राजकीय स्पर्धेत एक प्रमुख दावेदार असल्याचे सिद्ध केले. के. अण्णामलाई या तरुण, तडफदार पक्षाध्यक्षांच्या नेतृत्वात भाजपने तामिळनाडूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगर पंचायतील २३० प्रभाग, ५६ नगरपालिकेचे प्रभाग आणि २२ महानगरपालिका प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यातही इरॅनियल नगर पंचायतीत १५ पैकी १२ जागा आणि कन्याकुमारी जिल्ह्यात २०० प्रभागांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली. तसेच, चेन्नईसारख्या राजधानीच्या महानगरातही सत्ताधारी द्रमुकनंतर भाजपला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळून, काही ठिकाणी अगदी कमी फरकाने पराभव पत्करावा लागला. २०११ सालच्या तामिळनाडूतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानुसार, भाजपला मिळालेली एकूण मतांची टक्केवारी ही १.७४ टक्के होती, तर आता २०२२ साली हेच प्रमाण २.४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कासवगतीने का होईना, भाजपने तामिळनाडूमध्ये संघटनेवर भर देऊन आणि स्वबळावर निवडणुका लढवत द्रमुक आणि अण्णाद्रमुकसमोर तगडे आव्हान उभे केले, हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे जे राहुल गांधी काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूत भारतीय जनता पक्ष कधीही जिंकू शकत नाही म्हणून तावातावाने लोकसभेत ओरडून प्रांतवादाला खतपाणी घालत होते, त्यांना या निकालामुळे एक सणसणीत चपराक बसली आहे. तसेच या निवडणुकांच्या निकालानंतर द्रमुकच्या पाठीशी लपलेल्या काँग्रेस पक्षानेही आत्मचिंतन करण्याची हीच ती वेळ! एकूणच भाजपची तामिळनाडूतील कामगिरी निश्चितच समाधानकारक आणि कार्यकर्त्यांमध्ये नवऊर्जेचा संचार करणारी असून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते का, ते आता पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
 
 
हिंदुत्वाची जेथ प्रचिती...
 
२३ वर्षीय हर्ष कर्नाटकच्या शिमोग्याचा रहिवासी. बजरंग दलाचा एक धडाडीचा तरुण कार्यकर्ता. मुखी नेहमी रामनाम. अवैध गोमांस तस्करी असेल अथवा ‘हिजाब’वरून उद्भवलेला वाद, या सगळ्यात हर्ष सुरुवातीपासून प्रचंड सक्रिय होता. ‘हिजाब’च्या वादानंतर कर्नाटकमधील बर्‍याच महाविद्यालयांमध्ये हिंदू तरुणांनी भगवा स्कार्फ परिधान करून ‘हिजाब’धार्‍यांचा विरोध केला. त्या मोहिमेतही हर्ष अगदी आघाडीवर होता. हर्षचे हेच प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि कृती जिहाद्यांच्या फार पूर्वीपासूनच टार्गेटवर होती आणि म्हणूनच ‘हिजाब’वादाच्या पार्श्वभूमीवर जिहादी मानसिकतेच्या धर्मांधांनी दि. २० फेब्रुवारी रोजी हर्षची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी आजवर सहा मुस्लीम तरुणांना अटकही करण्यात आली असून, काही जणांना चौकशीसाठीही पोलिसांनी ताब्यात घेतले. हर्षच्या हत्येनंतर शिमोग्यामध्ये तणाव वाढला आणि दंगलसद़ृश परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पोलिसांनीही ‘कलम १४४’ लागू करत शहरातील शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश दिले. पण, हर्षच्या हत्येवरून मात्र पुरोगाम्यांचा ढोंगीपणा नेहमीप्रमाणे चव्हाट्यावर आला. कारण, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विचारसरणीचे एरवी गोडवे गाणार्‍यांपैकी एकानेही हर्षच्या हत्येचा साधा निषेधही नोंदवला नाही. याचे कारण अगदी साहजिकच. हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कर्ता असल्याने हर्षला अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे सगळे गैरलागू! पण, हर्षऐवजी ‘एमआयएम’च्या एखाद्या कार्यकर्त्याची अशीच हत्या झाली असती, तर याच पुरोगामी टाळक्याने ट्विटरला हिरव्या रंगात रंगवले असते. त्यामुळे ज्या पुरोगाम्यांना भारतावरील दहशतवादी हल्लेखोर, काश्मीरचे दगडफेकू यांचा मानवाधिकाराच्या नावाखाली कळवळा येतो, त्यांच्या केसालाही धक्का लागला की, ही मंडळी मोदी सरकारवर तुटून पडतात. पण, यापूर्वी बंगाल, केरळमध्ये झालेल्या भाजप-संघ कार्यकर्त्यांच्या हत्या असतील आणि आता हर्षचा खून, या प्रकारणांत पुरोगाम्यांकडून निष्पक्ष भूमिकेची अपेक्षाच मुळी बाळगणे व्यर्थ! म्हणूनच यानिमित्ताने देशभरातील हिंदुत्ववादी हर्षच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले. हर्षच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचे आवाहन हिंदुत्ववाद्यांनी केले आणि तब्बल १६ लाख अल्पावधीत देशभरातून जमवलेही! हे आहेत हिंदुत्वाचे संस्कार आणि हिंदुत्वाचे सामूहिक शक्तिदर्शन!
 
 
Powered By Sangraha 9.0