मुंबई (ओंकार देशमुख) : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यविधी आणि स्मारकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. लतादीदींच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांमध्ये विविध राजकीय मंडळींमुळे स्मारकाराच्या विषयावर चर्चांना तोंड फुटले आहे. दरम्यान, दादर शिवाजी पार्क परिसरातील स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी शिवाजी पार्कवरील स्मारकांच्या विरोधात याचिका दाखल केली असून, आम्ही रहिवासी कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्क मैदानाची स्मशानभूमी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मंगळवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी प्रकाश बेलवाडे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मैदानाचा राजकीय वापर नको
“शिवाजी पार्क मैदानावर शांतता असावी, कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला परवानगी न देता या मैदानाचा वापर खेळासाठी व्हावा, यासाठी स्थानिक दादरकर आणि ज्येष्ठ नागरिक आग्रही आहेत. त्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरही लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदेखील होण्याची शक्यता आहे. मैदानाच्या संदर्भातील याचिकेला स्थानिकांचा पाठिंबा आहे. त्याला समर्थन देण्यासाठी दादरकरांच्यावतीने स्वाक्षरी अभियानदेखील राबविण्यात आले होते. तेव्हा शिवाजी पार्क या मैदानाचा वापर कुठल्याही राजकीय कार्यक्रमासाठी न करता मैदान केवळ खेळासाठीच वापरले जावे,” अशी आग्रही भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.
शिवाजी पार्कवरील स्मारकांना विरोध कायमच !
"लता मंगेशकर यांच्या मृत्यूच्या काही तासांमध्येच त्यांच्या स्मारकावरून राजकीय मंडळींनी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केली होती. भावनात्मकतेचा आधार घेऊन लोकांना भावनात्मक बनवून त्या भावनेच्या आधारे या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी कदाचित राज्य सरकारदेखील त्यावर सहमत होऊ शकेल, अशी शक्यता आहे. त्याला विरोध करण्यासाठी मी प्रातिनिधिक स्वरुपात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली असून, अशा प्रकारच्या स्मारकांना स्थानिकांचा विरोध कायम राहील, हे मात्र निश्चित आहे."
- प्रकाश बेलवाडे, स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते