विविध क्रीडाप्रकारांतील खेळांडूबरोबरच क्रीडा पत्रकार आणि क्रीडा समालोचकही तो खेळ जगत असतात. असेच एक ‘खेळिया’ म्हणजे क्रीडा पत्रकारितेत तब्बल ४० वर्षं यशस्वीपणे पूर्ण करणारे नितीन मुजुमदार...
"उपजीविकेसाठी आवश्यक असणार्या विषयाचे शिक्षण जरुर घ्यावे. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करावा. पण, एवढ्यावरच न थांबता साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, क्रीडा यातील एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवावी. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल..." पुलंचे हे वाक्य सार्थ ठरवतात क्रीडा पत्रकारितेत तब्बल ४० वर्षं यशस्वीपणे पूर्ण करणारे नाशिकमधील नितीन मुजुमदार. भारतीय आयुर्विमा महामंडळात कार्यरत असलेल्या नितीन यांनी एकीकडे नोकरी व दुसरीकडे स्वतःची प्रतिभा ओळखून तिला न्याय दिला. स्पोर्ट्स, फोटो जर्नलिझम करत क्रीडा समालोचन आणि लेखन करणारे ते महाराष्ट्रातील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व. १९९६ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकात सर्वांत तरुण पत्रकार म्हणून अधिस्वीकृती मिळवणार्या नितीन यांचे विविध मराठी, इंग्रजी साप्ताहिके आणि वृत्तपत्रांत आजवर एक हजारांहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.
खरंतर खेळांची विशेष आवड नसणारे नितीन यांचे घर. परंतु, ते ज्या सहजीवन कॉलनीत राहत होते, तिथे क्रिकेट आवडीने खेळले जायचे. त्यावेळी स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांच्या संघाचा मोठा दबदबा होता. १९८० मध्ये दहावी झाल्यानंतर विज्ञान शाखा निवडण्यामागे सामान्यपणे घरांमध्ये असतो तसा अभ्यास व नोकरीचा विचार होता. परंतु, विज्ञान शाखेत आपल्याला रस नाही, हे ओळखत नितीन वाणिज्य शाखेकडे वळले व विशेष गुणवत्ता त्यांनी कायम राखली. बारावीत असताना एका वृत्तपत्राच्या कार्यालयीन भेटीदरम्यान ’तुम्ही लेखन का करत नाही?’ असे तेथील संपादकांनी विचारले. आपल्याला क्रिकेटची आवड असूनही त्यात करिअर करणे शक्य नाही, लेखनाद्वारे मात्र खेळाशी निगडित राहणे शक्य असल्याचे नितीन यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ होकार दिला. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी 'लिली व बॉयकॉट'वरील त्यांचा लेख प्रसिद्ध झाला व क्रीडा पत्रकारितेची सुरुवात झाली. नाशिक हीच आपली कर्मभूमी, हे त्यांनी ठरविले असल्यामुळे काही मर्यादा येत गेल्या. तरी चार दशके क्रीडा पत्रकारितेत लीलया संचार करीत त्यांनी क्रिकेट विश्वचषक, कसोटी सामने, एकदिवसीय सामने, ‘प्रीमियर बॅडमिंटन लीग’पासून ‘मोटो क्रॉस’पर्यंत अनेक ‘इव्हेंट’ प्रत्यक्ष पाहिले व त्यावर लेखन केले. लेखन हा त्यांचा मूळ पिंड व पहिली आवड असली तरी मुलाखती, सामने, पत्रकार परिषदा या दरम्यान अनेक दिग्गज खेळाडू व कलाकार कॅमेर्यात टिपत फोटोग्राफीची आवड जोपासण्याची संधीही नितीनना मिळाली. अगदी व्ही. आनंद, विदित गुजराथीपासून ते अमिताभपर्यंत, सचिनपासून ते सिंधूपर्यंत आणि गावसकर, विजयअमृतराजपासून लिएंडर पेस यांसारख्या कित्येक कलाकारांची सुरेख छायाचित्रे त्यांच्या संग्रही आहेत.
नाशिक येथील ’स्पोर्ट्स पॅराडाइज’ म्हणून क्रीडा क्षेत्रात ओळखल्या जाणार्या नितीन यांच्या संग्रहात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी, पत्रकारांच्या मौल्यवान स्मृतिचिन्ह भेटींचा समावेश आहे. दर १२ वर्षांनी नाशिकमध्ये भरणार्या कुंभमेळ्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना मुजुमदारांकडील खजिन्याला भेट देण्याचे वेध लागतात. दिग्गजांनी दिलेले ‘मेमेंटोज’, स्विस सरकारने फेडररच्या सन्मानार्थ काढलेले विशेष चांदीचे नाणे त्यांच्या संग्रहाचा मानाचा भाग आहेत. आजवरच्या नितीन यांच्या प्रवासात अनेक प्रसंग त्यांच्या आठवणींच्या कप्प्यात कायमस्वरूपी कोरले गेले. त्यापैकी वडिलांचे खूप दुर्मीळ छायाचित्र पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या डोळ्यातून उमटलेले भाव व त्यावेळी त्याने दिलेल्या त्याच्या हस्ताक्षरातील पत्राचे स्थान खूप वरचे आहे, हे नितीन आवर्जून सांगतात. मोबाईल नसलेल्या काळात बेंगळुरुला १९९६ मध्ये भारताने पाकिस्तानला ‘वर्ल्ड कप’ उपांत्यपूर्व सामन्यात हरविले तेव्हा रात्री ११ वाजता पत्रकार व फोटोग्राफर म्हणून एकाच वेळी काम करताना उडालेली तारांबळ, एका हातात रेकॉर्डर व एका हातात छोटा कॅमेरा घेऊन घेतलेल्या मुलाखती या त्यापैकी विशेष संस्मरणीय. आपले शहर कायमस्वरूपी सोडायचे नाही हा विचार आणि एक ‘फ्रीलान्सर’ म्हणून आपला छंद जोपासताना वेगवेगळ्या स्तरावर येणारी आव्हाने पार करत त्यांची कारकिर्द घडली. ते म्हणतात, की, "क्रीडा क्षेत्राच्या नकाशावर तुलनेने नाशिकचे स्थान ठळक नाही. मुंबई-पुणे तसे जवळ असल्याने अनेक महत्त्वाच्या स्पर्धा, कार्यक्रमांना हजर राहणे सोपे जात असले तरी ‘फ्रीलान्सर’ म्हणून तुमचे स्थान, तुमच्या लेखनाचा दर्जा व ते प्रसिद्ध होण्याची वेळ, तुमचा तुमच्या क्षेत्रातील जनसंपर्क अशा बर्याच बाबींवर अवलंबून असते. छंद म्हटला की, आर्थिक गणिते खूप अवघड, पण मिळणारे समाधानाचे बॅलन्स शीट समाधानाचा तुडुंब प्रॉफिट दाखविणारे," असे नितीन सांगतात. विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी व क्रीडा तज्ज्ञ म्हणून नितीन यांना बोलावणी येऊ लागली, हादेखील त्यांच्या या क्षेत्रातल्या वाटचालीचा एक टप्पा ठरला. प्रारंभीच्या काळात वि. वि. करमरकर, द्वारकानाथ संझगिरी या दोन्ही दिग्गजांनी आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच, एलआयसीतील वरिष्ठ, सहकारी यांनीही वेळोवेळी मदत केली, अमूल्य प्रोत्साहन दिले, आत्मीयतेने साथ देणारे क्रीडा सहपत्रकार, मित्रमंडळ यांचाही आपल्या कारकिर्दीत मोलाचा वाटा आहे, असे नितीन नमूद करतात.