किशोरी पेडणेकरांना आपले म्हणणे, आपली स्वप्ने शिवसेना नेतृत्वासमोर घेऊन जायची आहेत का? तसे करुन महापौर पदापेक्षा वरचढ पद-प्रतिष्ठा मिळवायची आहे का? पेडणेकरांच्या वागण्या-बोलण्यातून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला घरातूनच म्हणजे शिवसेनेतून सुरूंग लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे का? पण, त्यात किशोरी पेडणेकरांनी पुढाकार घेतलाय की, त्या फक्त चेहरा आहेत आणि सूत्रधार आणखी दुसरा कोणी?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपचे वाक्युद्ध चांगलेच रंगले आहे. वाद-प्रतिवाद, दावे-प्रतिदावे दोन्ही बाजूंनी सातत्याने सुरु आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत की नाहीत, असा प्रश्न पडावा इतके हे दोन्ही पक्ष संदर्भहीन ठरताना दिसतात. पण, या सगळ्या प्रकाराला निराळीच कलाटणी मिळाली ती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन प्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे. अत्यंत संभ्रम निर्माण करणारी त्यांची पत्रकार परिषदेतील विधाने थेट राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीला काळा ठिपका लावणार्या किणी प्रकरणाची आठवण करून देणारी ठरली. दिशा सालियन या सुशांतसिंह राजपूतच्या माजी व्यवस्थापिकेच्या विस्मयकारक मृत्यूनंतर त्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव जोडले गेले. त्यावर चर्चाही खूप झाली आणि माध्यमेही या विषयावर बरेचसे बोलून गेली. कुठल्याही उगवत्या राजकीय नेतृत्वावर महिलेचा मृत्यू किंवा असे काही बालंट लागले की, ते तितक्या चटकन पुसले जात नाही. वारंवार त्याची चर्चा होतच राहते. राज ठाकरेंच्या बाबतीतही किणी प्रकरणाचे असेच झाले. मृत्यू कोणाचाही वाईट आणि त्याबाबत राजकारण, तर मुळीच व्हायला नको. पण, किणी प्रकरण घडले तेव्हा शिवसेनेचे कोणते नेते सक्रिय होते, सत्तेत कोण होते आणि या प्रकरणाची माहिती माध्यमांना कोणी पुरविली, हे त्यावेळचे ‘ओपन सिक्रेट’ होते. हा सगळा प्रकार पुन्हा आठविण्याचे कारण म्हणजे, पुन्हा पुन्हा सांगून, सुचवूनही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनचा विषय काढला आणि माध्यमांत त्यावर चर्चाही घडवून आणली. संजय राऊत यांनी महापौरांना त्या विषयावर बोलू नका, असे बजावले होते. तशा क्लिपही समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. मात्र, त्यांनी न जुमानता तो विषय काढला आणि पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला.
वर वर पाहता हा खूपच साधा मुद्दा वाटतो. कदाचित काही चुकभूल झाली असावी, असेही वाटते. मात्र, हा सगळा घटनाक्रम पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, इंग्रजीत ज्याला ‘मेथड इन मॅडनेस’ म्हणतात तसाच काहीसा हा प्रकार आहे. किशोरी पेडणेकर अशी विधाने करतात त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. मागे असेच त्या विनाकारण अहमदाबादला जाऊन तिथल्या पेंग्विन पाहायला गेल्या होत्या आणि मग त्यांनी माध्यमांशी बोलताना आदित्यना ‘पेंग्विन’ संबोधले जाते, असे स्वत:च सांगून टाकले होते. नको असताना पेंग्विनचा मुद्दाही ऐरणीवर आणला होता. आता नेमके काय झाले आहे की, किशोरी पेडणेकर यांच्यात अशाप्रकारे कली संचारला आहे. जे मुद्दे विरोधकांनी उचलले पाहिजे ते त्याच उचलत आहेत. या सगळ्या वागण्याला एक कारण आहे. मागे आदित्य ठाकरे यांनी तरुण रक्ताला वाव देणार असल्याचे सूतोवाच केले होते. खरी गंमत इथूनच सुरू झाली. भाजपच्या विरोधात रान उठविण्याचा जो पवित्रा शिवसेनेने आज घेतला आहे, त्याचे नीट निरीक्षण केले, तर लक्षात येईल की, या सगळ्या व्यक्तिगत लढायाच चालू आहेत. संजय राऊत असोत किंवा किशोरी पेडणेकर हे आपापल्या लढाया लढत आहेत. राजकारणाचा आणि पुन्हा घराण्याच्या राजकारणाचा एक अलिखित नियम असतो. बदलते पिढीजात नेतृत्व आपली माणसे आणत राहते. बाळासाहेब ठाकरेंनी आपली माणसे शोधली आणि उभी केली. उद्धव ठाकरेंनीदेखील मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांसारखी स्वत:ची माणसे आणली. आता पाळी आदित्यची आहे. वरूण सरदेसाईसारख्या आपल्या सहकार्याला त्यांनी यापूर्वीच पक्ष संघटनेत यशस्वीरित्या आणून बसविले आहे. आता त्यांना 45 वर्षांवरील नव्या दमाच्या मंडळींना शिवसेनेत आणून स्थापित करायचे आहे. खरा कळीचा मुद्दा हाच आहे. नवे येणार म्हणजे जुने जाणार! आजचा नगरसेवक उद्याचा आमदार होण्याची स्वप्ने पाहात असतो. आज जे असे आहेत, त्यांना उद्याच्या राजकीय भवितव्याची स्वप्ने पडतच आहेत. आता या सगळ्यांसमोर मोठे प्रश्न उभे आहेत. कारण, त्यांचे राजकीय भवितव्यच पणाला लागले आहे.
स्वप्ने पाहणार्यांत किशोरी पेडणेकर यांचाही समावेश होतो. आज त्या मुंबईच्या महापौर आहेत, उद्या आमदार, मंत्री होण्याची त्यांचीही इच्छा स्वाभाविकच. त्याला हरकत घेण्याचे कारणही नाही. पण, त्यांच्या या स्वप्नांवर शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाची मोहर उमटणे आवश्यक आहे. मुंबईचे शिवसेनेचे निवडक महापौर हे नंतर आमदार, मंत्री झालेले आहेत, तर बरेचसे त्यानंतर कुठेही दिसलेले नाहीत. भविष्यात आपलीही तशीच गत होऊ शकते, असे किशोरी पेडणेकरांना वाटत असेल, तर त्यात काही वावगे नाही. त्यांच्या तसे वाटण्याला नव्या दमाच्या, तरुण रक्ताच्या नेत्यांना संधी देण्याच्या विधानाचा आधार आहे. त्यापेक्षा आदित्य ठाकरे अडचणीत येतील, त्यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांची वाच्यता केल्याने ते निराळ्याच मुद्द्यावरुन चर्चेत राहतील किंवा पेंग्विनचा उल्लेख करण्यातून त्यांची प्रतिमा बालिश राजकारण्याचीच राहील, अशी विधाने करण्याचे धोरण किशोरी पेडणेकरांनी स्वीकारले आहे का? त्यातून किशोरी पेडणेकरांना आपले म्हणणे, आपली स्वप्ने शिवसेना नेतृत्वासमोर घेऊन जायची आहेत का? तसे करुन महापौर पदापेक्षा वरचढ पद-प्रतिष्ठा मिळवायची आहे का? किशोरी पेडणेकरांच्या वागण्या-बोलण्यातून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला घरातूनच म्हणजे शिवसेनेतून सुरूंग लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे का? पण, त्यात किशोरी पेडणेकरांनी पुढाकार घेतलाय की, त्या फक्त चेहरा आहेत आणि सूत्रधार आणखी दुसरा कोणी? कारण, हे काम त्या एकट्याच करतील, असे वाटत नाही. त्यांच्यामागे इतरही कोणाचा तरी हात असू शकतो. ते यथावकाश समोर येईलच, पण हा सगळा खेळ जनतेसाठी खेळला जात नाहीये, हे महत्त्वाचे. त्यांचे उद्दिष्ट फक्त आपापसात शह-काटशहाचे राजकारण करुन स्वतःचे भले करून घेण्याचे आहे. आता शिवसेना याचा कसा ‘सामना’ करते, हे येत्या काळात पाहावे लागेल.